सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

सरलेल्या सप्ताहात एचडीएफसी समूहातील कंपन्या आणि बँकांच्या पाठबळाने भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक पुन्हा एकदा सकारात्मक पातळीवर बंद झाले. अमेरिकी बाजारात रिटेल क्षेत्राच्या मिळकतीचे सकारात्मक आकडे आणि देशांतर्गत पातळीवर परदेशी गुंतवणूकदारांकडून समभाग विक्रीचा मारा कमी झाल्यामुळे दोन्ही बाजारांना बळ मिळाले. व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिडकॅप व स्मॉलकॅप कंपन्यांमधे मात्र पडझड सुरूच राहिली. धातू क्षेत्रातही मोठी घसरण झाली.

वेस्टलाइफ डेव्हलपमेंट : मॅकडोनाल्ड्स या जगप्रसिद्ध खाद्यपदार्थ विक्री साखळीची भारतातील प्रतिनिधी असलेली ही कंपनी आहे. मार्चअखेरच्या व आधीच्या अशा दोन्ही तिमाहींत कंपनीने विक्री आणि नफ्याचे समाधानकारक आकडे जाहीर केले आहेत. पदार्थामध्ये भारतीयांना अनुकूल असे बदल कंपनी करत आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीने दहा नवी दालने उघडली असून येत्या तीन ते चार वर्षांत दोनशेहून अधिक दालने उघडून कंपनी व्यवसाय वाढविणार आहे. आता सर्वत्र कार्यालये, महाविद्यालये सुरू होऊन दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत त्यामुळे कंपनीची व्यवसायात जोमाने वाढ सुरू आहे. सध्या ४५० ते ४६० रुपयांच्या दरम्यान या समभागांत गुंतवणुकीची संधी आहे.

ग्रासिम इंडस्ट्रीज : कंपनीने मार्चअखेरच्या वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. कंपनीचे उत्पन्न ६८ टक्क्यांनी वाढून २० हजार कोटी तर नफा जवळजवळ तिप्पट होऊन २,५०० कोटींवर पोहोचला आहे. अर्थात ही तुलना करोनाकाळातील गेल्या वर्षांशी आहे. कंपनीच्या रासायनिक उत्पादनांनी व्हिस्कोजच्या व्यवसायातील नफ्याची कसर भरून काढली. कंपनीने रंग उत्पादन प्रकल्पातील गुंतवणूक दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. चांगली नफाक्षमता आणि पुरेशी रोखता असल्यामुळे या गुंतवणुकीचा फारसा ताण जाणवणार नाही. बिर्ला समूहातील आदित्य बिर्ला कॅपिटल आणि  सिमेंट व्यवसायातील अग्रणी अल्ट्राटेक सिमेंटमधे ग्रासिमची गुंतवणूक आहे. सध्या १,४०० रुपयांच्या खालच्या पातळीमध्ये कंपनीच्या समभागात गुंतवणुकीची संधी आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याजदर नियमनाच्या बरोबरीने केंद्र सरकारदेखील महागाई आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना करते आहे. खाद्यतेलाच्या आयात शुल्कातील कपात, गहू, साखर व पोलादाच्या निर्यातीवर निर्बंध असे काही उपाय आणि इंधन दरातील मोठी कपात या सगळय़ाचा परिणाम म्हणून महागाई कमी होऊन वस्तूंची मागणी कायम राहणे अपेक्षित आहे. मात्र केवळ आपल्या देशातील नव्हे तर जगभरातील महागाई आटोक्यात राहणे गरजेचे आहे.  रिझव्‍‌र्ह बँकेकडून अचानक करण्यात आलेल्या व्याजदर वाढीच्या दणक्याने बाजाराने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. आणखी व्याजदर वाढीचे संकेत मध्यवर्ती बँकांनी दिले आहेत. मात्र आगामी व्याजदर वाढ बाजाराने काही अंशी गृहीत धरली आहे. यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याजदर वाढीच्या घोषणेनंतर  बाजारात फार मोठी घसरण होण्याची शक्यता कमी आहे. मात्र रशिया-युक्रेनचे लांबलेले युद्ध आणि त्याचे परिणाम जगाला बराच काळ चिंताग्रस्त ठेवतील. यामुळे तेजीचा शाश्वत हंगाम सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागेल.

सप्ताहातील काही निवडक घटना : 

* पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करून सरकारने महागाई रोखण्यासाठी एक पाऊल उचलले. त्याचा फायदा सिमेंट आणि वाहतूक कंपन्यांना होईल. कारण त्यांच्या एकूण खर्चात इंधनावरील खर्चाचा वाटा अनुक्रमे २० आणि ३० टक्के असतो. याचबरोबर तेल वितरण कंपन्यांनादेखील याचा लाभ मिळेल. मात्र यामुळे सरकारचे उत्पन्न घटून वित्तीय तूट वाढेल.

* सरकारने लोह खनिज आणि पोलादाच्या काही उत्पादनांवर निर्यात शुल्क लावल्यामुळे व पोलाद निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात शुल्क कमी केल्यामुळे पोलादाच्या देशातील किमती कमी होतील. वाहने व बांधकामासारख्या क्षेत्रांना याचा फायदा होईल. पण आघाडीच्या पोलाद कंपन्यांच्या समभागात मोठी घसरण झाली.

* डिव्हीज लॅबने उत्तम आर्थिक कामगिरी बजावूनदेखील कंपनीच्या समभागात मोठी घसरण झाली. रशिया-युक्रेन युद्ध, बंदरांमधील वाहतूक कोंडी, तसेच काकिनाडा येथील प्रकल्प अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्यामुळे संचालकांनी कंपनीच्या नजीकच्या भवितव्यावर भाष्य करायचे टाळले. याचा परिणाम समभागांच्या घसरणीत झाला. या मोठय़ा घसरणीनंतर कंपनीचे समभाग एक ते दोन वर्षांच्या गुंतवणुकीसाठी पुन्हा आकर्षक बनले आहेत.

सप्ताहातील या घडामोडींकडे लक्ष ठेवा

*  सन फार्मा, अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स, अरिबदो फार्मा, दिलीप बिल्डकॉन, आयआरसीटीसी, जिंदाल स्टील अँड पॉवर, जुबिलंट फूडवर्क्‍स, एलआयसी, लक्स इंडस्ट्रीज, माझगाव डॉक्स, एलटी फूड, एनबीसीसी, नाटको फार्मा, डिश टीव्ही या कंपन्या गेल्या आर्थिक वर्षांचे निकाल जाहीर करतील. *  मे महिन्याचे वाहन विक्री व वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) संकलनाचे आकडे