‘‘आम्ही प्रामुख्याने भविष्यात क्षमतेत वाढ होऊ घातलेल्या परंतु सुदृढ ताळेबंद असणाऱ्या कंपन्या निवडून त्यांचा आमच्या गुंतवणूकांत समावेश करीत आहोत. हे करीत असतानाच जोखीम नियंत्रणाला आमचा कायम अग्रक्रम राहिला आहे.’’
प्रदीप गोखले, निधी व्यवस्थापक, टाटा इक्विटी अपॉच्र्युनिटी फंड
फंडाविषयक विवरण
फंडाचा गुंतवणूक प्रकार : समभाग गुंतवणूक
जोखीम प्रकार : समभाग गुंतणूक असल्याने धोका अधिक (मुद्दलाची शाश्वती नाही)
गुंतवणूक : या फंडाची पहिली एनएव्ही २९ मार्च २००३ रोजी जाहीर झाली. हा फंड लार्जकॅप व मिडकॅप या दोन्ही प्रकारच्या समभागात गुंतवणूक करतो. या दोन प्रकारात गुंतवणूक करतानाच व्हॅल्यू व ग्रोथ या समभाग निवड पद्धतींचा समतोल साधला जातो. गुंतवणूक केल्यापासून एका वर्षांच्या आत गुंतवणूक काढून घेतल्यास एक टक्का निर्गमन अधिभार आकारण्यात येईल. मुंबई शेअर बाजाराचा एस अँड पी बीएसई २०० निर्देशांक या योजनेचा संदर्भ निर्देशांक आहे. ३१ मे २०१५ अखेर या फंडातील मालमत्ता रु. १,०६६ कोटी आहे.
निधी व्यवस्थापक : टाटा म्युच्युअल फंडात सप्टेंबर २००४ पासून कार्यरत वरिष्ठ निधी व्यवस्थापक प्रदीप गोखले हे जून २०१३ पासून या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. ते सनदी लेखापाल असून त्यांना एकूण २४ वर्षांचा अनुभव आहे. टाटा म्युच्युअल फंडात दाखल होण्याआधी ते केअर या पत निर्धारण कंपनीत उपमहाव्यवस्थापक होते. गुंतवणूक विषयातील चार्टर्ड फिननशियल अॅना लिस्ट (सीएफए) ही अर्हता त्यांनी प्राप्त केली आहे. रुपेश पटेल हे सह निधी व्यवस्थापक आहेत.
गुंतवणूक पर्याय : वृद्धी (ग्रोथ) व लाभांश (डिव्हिडंड : पे आउट व रिइंव्हेंस्ट)
फंड खरेदीची पद्धत : 1800 209 0101 या क्रमांकावर (सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यत) संपर्क केल्यास कंपनीचा गुंतवणूकदार सेवा प्रतिनिधी संपर्क करेल. अथवा mutualfund.arthvruttant@gmail.com या संकेतस्थळावरून थेट खरेदी करता येईल.
मागील दोन आठवड्यात मिळून सेन्सेक्स निर्देशांकात जवळपास १,४०० अंशाची घट झाली. ४ मार्च रोजी ३०,०२४.७७ चे शिखर गाठलेल्या सेन्सेक्सची मागील दोन आठवड्यात पार धूळधाण उडाली. शुक्रवार १२ जून रोजी कामकाज बंद होताना निर्देशांक २६,४२५.३० वर स्थिरावला होता. म्हणजे सेन्सेक्सची शिखरापासून ११ टक्क्यांची घसरण झाली आहे. शेअर बाजारात तेजी वाजत गाजत तर मंदी नेहमीच चोर पावलांनी येते. परंतु कसलेल्या गुंतवणूकदारांना मंदीचा सुगावा लागतोच. ‘अच्छे दिना’चा गाजावाजा करीत वर गेलेल्या निर्देशांकाचा प्रवास उलटय़ा दिशेने सुरूझाला आहे याची निश्चिती झाल्यानेच २७ एप्रिल रोजी या स्तंभातून तसा सूचक परंतु स्पष्ट उल्लेख केला होता. म्हणूनच सुरू झालेल्या नवीन आíथक वर्षांपासून प्रामुख्याने ज्या म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीत मोठय़ा प्रमाणात मिडकॅप समभागांचा समावेश आहे अशा म्युच्युअल फंडांच्या योजनांची शिफारस टाळण्याकडे कल होता. आजचा फंड हा लार्जकॅप व मिडकॅप समभागांचे गुंतवणुकीत संतुलन साधलेला व म्हणूनच ३१ मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत ‘क्रिसिल रँकिंग १’ प्राप्त झालेला असल्याने दिशाहिन बाजारात गुंतवणूक करण्यास योग्य वाटतो. या फंडाने ३० एप्रिल २०१५ च्या गुंतवणूक विवरणानुसार (Fund Fact Sheet) १६ उद्योग क्षेत्रात मिळून एकूण ६१ समभागांमध्ये गुंतवणूक केली आहे. फंडाने या गुंतवणुका प्रामुख्याने ताळेबंदाच्या निकषांवर आधारीत केल्या आहेत. फंडाने जोखीम नियंत्रणाच्या दृष्टीने एस अँड पी बीएसई २०० निर्देशांकात उद्योगक्षेत्राच्या कमाल मर्यादेपेक्षा कमी ठेवणे हे जोखीम नियंत्रणाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. तथापि एकूण गुंतवणुकीच्या २.६० टक्के गुंतवणूक व्यवस्थापन खर्च असणे हे मात्र या फंडात नव्याने गुंतवणूक करणाऱ्यांना नक्कीच विचार करण्यास लावणारे आहे.
mutualfund.arthvruttant@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 15th Jun 2015 रोजी प्रकाशित
टाटा इक्विटी अपॉच्र्युनिटी फंड
आम्ही प्रामुख्याने भविष्यात क्षमतेत वाढ होऊ घातलेल्या परंतु सुदृढ ताळेबंद असणाऱ्या कंपन्या निवडून त्यांचा आमच्या गुंतवणूकांत समावेश करीत आहोत.
First published on: 15-06-2015 at 01:04 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata equity opportunities fund