रपेट बाजाराची : घसरण पर्व

आठवडाभरात बाजाराचे प्रमुख निर्देशांक पुन्हा एकदा साधारण ४ टक्क्यांनी घसरले

सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

अमेरिकी व जागतिक बाजारांच्या पावलावर पाऊल टाकत भारतीय बाजाराची गेल्या सप्ताहातील वाटचाल सुरू होती. चीनमधील धातूंची मागणी कमी होण्याच्या धास्तीने लंडनच्या बाजारातील धातू निर्देशांकांत मोठी घसरण झाली व त्याबरोबर आपल्याकडील धातू कंपन्यांचे समभाग कोसळले. एप्रिल महिन्यात अमेरिकेच्या किरकोळ दरांवर आधारित महागाईच्या निर्देशांकात ८.३ टक्क्यांची वाढ झाली. आपल्याकडेदेखील एप्रिल महिन्यात हा दर ७.७९ टक्के झाला. त्यामुळे मध्यवर्ती बँकांकडून जून महिन्यात व्याजदर वाढीचा मोठा दणका अपेक्षित आहे. त्यामुळे सप्ताहातील प्रत्येक दिवशी शेअर बाजारात तुफानी विक्री सुरू राहिली. आठवडाभरात बाजाराचे प्रमुख निर्देशांक पुन्हा एकदा साधारण ४ टक्क्यांनी घसरले. बाजारातील घसरणीचा हा पाचवा सप्ताह होता. निर्देशांक आता ऑगस्ट २०२१ च्या पातळीला आले आहेत.

*  डाबर इंडिया : या आयुर्वेदिक औषधे, खाद्यपदार्थ व आरोग्यनिगा क्षेत्रातील अनेक नामवंत उत्पादने बनविणाऱ्या कंपनीने सरलेल्या आर्थिक वर्षांत विक्रीमध्ये १४ टक्के, तर नफ्यात ७ टक्के वाढ साधली. नफ्याचे प्रमाण गेल्या वर्षांपेक्षा कमी राहिले. महागाईचा फटका जाहिरातीवरचा व कर्मचाऱ्यांवरील खर्च कमी करून थोडा सुसह्य झाला. एफएमसीजी कंपन्यांत चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या या कंपनीकडे पुदीन हरा, डाबर च्यवनप्राश, ग्लुकोज डी, डाबर लाल तेल, ओडिनिल, ओडोमोस, ओडोपिक, वाटिका, गुलाबरी, डाबर रेड टूथपेस्ट इत्यादी नाममुद्रांची मालकी आहे. सध्याचा उन्हाळय़ाचा जोर, शेतकी उत्पादनातील वाढ कंपनीच्या व्यवसायासाठी फायदेशीर आहे. गेल्या वीस वर्षांत समभागांची किंमत दर पाच वर्षांनी दुप्पट होण्याचा इतिहास आहे. सध्याच्या बाजारभावात दोन वर्षांच्या मुदतीसाठी गुंतवणुकीची संधी आहे.

* टाटा कन्झ्युमर कंपनी : कंपनीची (आधीची टाटा ग्लोबल) सरल्या आर्थिक वर्षांत विक्रीमध्ये सात टक्के वाढ (७,९३२ कोटी रुपये ) तर नफ्यात १२ टक्के वाढ (१,३२० कोटी रुपये) झाली. नफ्याचे प्रमाण कायम राखण्यात कंपनीला यश आले. कंपनीचा तयार अन्न व्यवसायात १७ टक्के वाढ झाली. कंपनीने टाटा केमिकल्सच्या अन्नपदार्थविषयक उद्योगांच्या केलेल्या विलगीकरणाचे आता फायदे दिसू लागले आहेत. त्यामुळे मिठाच्या व्यवसायात चार टक्के तर चहामध्ये एक टक्क्याची वाढ झाली. कंपनीकडून संपन्न, टाटा क्यू, सोलफुल अशा नाममुद्रांखाली तयार सेवनास सिद्ध पदार्थाची बाजारपेठ काबीज केली जात आहे. सध्या कंपनीच्या समभागाची पातळी गुंतवणुकीसाठी योग्य वाटते.

* गुजरात गॅस : कंपनीच्या एकूण विक्रीत मार्चअखेर तिमाहीत ३९ टक्के वाढ झाली, तर नफा २६ टक्क्यांनी वाढला. गॅसच्या वाढत्या किमतींमुळे संपूर्ण वर्षांच्या तुलनेत नफ्याचे प्रमाण कायम राहिले. कंपनीने १५५ नवीन गॅस स्टेशन्सची भर घालत एकूण संख्या ७११ वर नेली आहे. मोरबी या गुजरातमधील सिरॅमिक व इतर लहान उद्योग मोठय़ा प्रमाणात सीएनजी वापराकडे वळले आहेत. अमृतसर व भटिंडाच्या उद्योग क्षेत्रातील गॅसपुरवठा कंपनीच्या ताब्यात आला आहे ज्यामध्ये वाढीला वाव आहे. बाजारात सर्वत्र पडझड होत असताना कंपनीच्या समभागात वाढ होत आहे. या समभागांमध्ये खरेदीची संधी अजूनही आहे.

सध्या बाजारातील परिस्थिती भल्या-भल्यांना गोंधळात टाकणारी आहे. गेल्या दोन वर्षांत बाजारात प्रवेश केलेल्या गुंतवणूकदारांसाठी तर ती भयावह आहे. करोनानंतर आलेल्या तेजीच्या लाटेमध्ये या गुंतवणूकदारांनी सहजतेने नफा कमावला. बाजाराची दुसरी बाजू आता त्यांना कळते आहे. गेल्या जानेवारी महिन्यापासून बाजारावर परिणाम करणाऱ्या काही अपेक्षित तर काही अनपेक्षित अनेक घटना घडल्या. करोनाकाळात अडचणीत आलेल्या उद्योगांना रोकड सुलभता असावी म्हणून, जगभरातील मध्यवर्ती बँकांनी उपलब्ध करून दिलेली तरलता (ईझी मनी) आता याच बँकांनी कमी करण्यास सुरुवात केली आहे. त्या बरोबरीने व्याजदर वाढवायला सुरुवात केली आहे. रशिया युक्रेनचे युद्ध व त्याचे इंधन तसेच शेतकी मालाच्या किमतींवर व विनिमयावर झालेले परिणाम जग सोसत आहे. महागाईचे उच्चांक, रोखे बाजारातील घसरण, वाढणारे व्याजदर यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा परदेशी गुंतवणूकदारांनी लावला आहे. जानेवारीपासून १.४५ लाख कोटी रुपयांची विक्री त्यांनी केली आहे. कच्चा माल, वाहतूक व पगार अशा सर्वच खर्चात वाढ होत असल्यामुळे कंपन्यांना सामान्यपणे नफ्याचे प्रमाण टिकवणे कठीण जात आहे. त्यामुळे निकालांनंतर समभागात मोठी घसरण हीच एक प्रतिक्रिया बाजार देत आहे. ज्यांचे निकाल चांगले येत आहेत त्याही कंपन्यांमध्ये निकालानंतर नफा वसुली होऊन घसरण पाहायला मिळते आहे. परिणामी, गुंतवणूकदारांच्या आत्मविश्वासाला कुठे तरी धक्का बसला आहे. पण अशी अनेक वादळे बाजाराने पाहिली आहेत. या परिस्थितीत संयम राखणे, घाबरून विक्री न करणे, दीर्घ मुदतीसाठी चांगल्या कंपन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे श्रेयस्कर ठरेल. 

सप्ताहातील या घडामोडींकडे लक्ष ठेवा

*  भारत फोर्ज, एमसीएक्स, ग्रीन प्लाय, सेंच्युरी प्लायबोर्डस, रेमंड, अ‍ॅबट, भारती एअरटेल, इंडियन ऑइल, कजारिया, पीआय इंडस्ट्रीज, आयटीसी, ल्युपिन, एलआयसी हाऊसिंग, पिडिलाइट, रूट मोबाइल, इंद्रप्रस्थ गॅस, अशोक लेलॅन्ड, गोदरेज कन्झ्युमर, डॉ. रेड्डीज लॅब या कंपन्या सरलेल्या आर्थिक वर्षांचे निकाल जाहीर करतील.

*  इंडियन ऑइल आणि रत्नमणी मेटल बक्षीस समभागांची घोषणा करतील.

*  एलआयसीच्या समभागांची बाजारात सूचिबद्धता *  मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसकडून समभागांच्या पुनर्खरेदीची घोषणा

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Weekly stock market analysis weekly stock market summary zws

Next Story
Retail Inflation: महागाईनं पुन्हा RBIची निश्चित मर्यादा ओलांडली, ७.७९ टक्क्यांवर पोहोचला किरकोळ महागाई दर
फोटो गॅलरी