छत्रपती संभाजीनगर – राज्यात सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा असून, मागणीच्या तुलनेत ६० टक्केच रक्ताचा साठा उपलब्ध आहे. जेमतेम साठ्यावर गरज भागवली जात आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात ३३ हजार ७३९ युनिट तर मुंबईत ४ हजार ६२६ एवढाच साठा उपलब्ध आहे. रक्ताचा साठा वाढवून उपलब्धता करण्यासाठी ‘वाढदिवस साजरा’ करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रसूतीसाठी आलेल्या महिलांमधील रक्त प्रथिनांची (हिमोग्लोबिन) कमतरता पाहता त्यांना तातडीने पुरवठा करण्यासाठी रक्त वेळेत उपलब्ध नसल्याची परिस्थिती शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये असून, बहुतांशवेळा पुणे, अहिल्यानगर, जालना येथून आवश्यक त्या रक्तगटाची पिशवी मागवावी लागत आहे.
सध्या शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही सुटीकाल सुरू असून, उद्योग क्षेत्र आणि उद्योजक संघटनांकडूनही आयोजित करण्यात येणारे रक्तदान शिबिरे थांबली आहेत. दिवाळीसारख्या उत्सवाच्या सुटी काळात अनेक जण पर्यटनावर गेलेले आहेत. शिबिरांसाठी दातेही उपलब्ध होत नाहीत. दिवाळीपूर्वीच्या गणपती, नवरात्रोत्सव, तत्पूर्वीच्या १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरच्या कालावधीतही रक्तदान शिबिरांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत रक्तदान केलेले दाते पुन्हा नोव्हेंबरमध्ये रक्तदान करू शकत नाही. तीन महिन्यात रक्तदान करता येत नाही. अशा काही कारणांमुळे रक्तदान शिबिरांची संख्या घटली असून, दात्यांना गरजेनुसार फोन करून आवाहन केले जात असल्याचे रक्त तुटवड्यामागचे कारण रक्तपेढ्यांमधून सांगितले जात आहे.
प्रसूतीच्या आठ टक्के महिलांना गरज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) प्रसूतीसाठी आलेल्यांपैकी आठ टक्के महिलांना रक्त चढवण्याची गरज असते. काही महिलांमध्ये पांढऱ्या पेशींची कमतरता असते. प्लाझ्माची अडचण असते. दररोज ६० ते ७० महिला प्रसूतीसाठी दाखल होतात. त्यातील दहा महिलांची प्रकृती गंभीर असते. त्यांना रक्तांची गरज असते. विशिष्ट गटाचे रक्त अहिल्यानगर, जालना येथून मागवावे लागले. – डाॅ. एस. एन. गडाप्पा, प्रमुख, प्रसूती विभाग, घाटी.
दरवर्षी नोव्हेंबरमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवतो. राज्यात ३३ हजार ७३९ युनिट तर मुंबईत ४ हजार ६२६ एवढा उपलब्ध साठा आहे. आणखी साठा अपेक्षित आहे. सुट्टीकालामुळे शिबिरे थांबलेली असली तरी रक्तदान करून वाढदिवस साजरा करण्याविषयीचे आवाहन एका पत्राद्वारे करण्यात आले आहे. – डाॅ. पुरुषोत्तम पुरी, सहायक संचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद.
अगदीच नाही असे चित्र नसले तरी रक्ताची मुबलकता कमी आहे. रक्ताच्या शंभर पिशव्यांची मागणी असेल तर ६०-७० पर्यंतच उपलब्धता होत आहे. फोन करून दात्यांना बोलावून रक्तदान करावे लागत आहे. – डाॅ. अनंत पंढेरे, विश्वस्त, डाॅ. दत्ताजी भाले रक्तपेढी
साधारण ६०० ते ७०० पिशव्यांचा एरव्ही साठा उपलब्ध असतो. परंतु सध्या १५० च्या आसपासच उपलब्धता आहे. पांढऱ्या पेशींची कमतरता, एफएफटीच्या रुग्णांसाठी मागणी होते. – डाॅ. मंजूषा कुलकर्णी, प्रमुख, डाॅ. दत्ताजी भाले रक्तपेढी.
