साडेतीन शक्तिपीठापकी पूर्ण पीठ असलेल्या तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेस रविवारी प्रारंभ झाला. तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रात्री दह्या-दुधाचे अभिषेक संपल्यानंतर तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस विधिवत प्रारंभ झाला आहे. भवानीमातेची ही मंचकी निद्रा १२ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत चालणार असून पहाटे घटस्थापना होणार आहे.
तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वतयारीला तुळजाभवानी मंदिर संस्थान गेल्या १५ दिवसांपासून कार्यरत आहे. तुळजाभवानीचे धार्मिक विधी संदर्भात संस्थानने कार्यक्रम जाहीर केला आहे. रविवारी सायंकाळी ७ वाजता देवीच्या मूर्तीस भाविकांचे दही व दुधाचे अभिषेक झाले. अभिषेकानंतर सिंह गाभाऱ्यासमोरील पलंगावर तुळजाभवानीची विधिवत मंचकी निद्रा सुरू झाली. तत्पूर्वी पुजाऱ्यांनी परंपरेप्रमाणे चांदीच्या मुख्य सिंहासनापासून साडीचे भिंड गुंडाळून आई राजा उदो उदोच्या जयघोषात मूर्ती पलंगावर आणली. तेथे तुळजाभवानी देवीस सुगंधी तेलाचा अभिषेक घालण्यात आला. सकाळी तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेसाठी वापरण्यात येणाऱ्या गादी भरण्याच्या कामासाठी परिसरातील महिला भाविक भक्तांनी हातभार लावला. कापूस िपजणे व गादी तयार करणे यालादेखील या दिवशी विशेष महत्त्व आहे. लोकांनी भक्तिभावाने यामध्ये सहभाग नोंदविला. रविवारी सुरू झालेली देवीची मंचकी निद्रा घटस्थापनेच्या मध्यरात्रीपर्यंत चालणार आहे.
गेल्या १५ दिवसांपासून मंदिरातील सर्व परिसर स्वच्छता करण्याचे काम सुरू आहे. परंपरेने चालत आलेल्या विधिवत पद्धतीने ही नवरात्रापूर्वीची स्वच्छता केली जात आहे. नवरात्रापूर्वीची ही स्वच्छता देवीच्या नवरात्रोत्सवासाठी अत्यंत महत्त्वाची असून छबिन्यासाठी वापरण्यात येणारी वाहने यांची रंगरंगोटी, पूजेसाठी वापरण्यात येणारी सामग्री यांचीही स्वच्छता केली जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Oct 2015 रोजी प्रकाशित
तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ
साडेतीन शक्तिपीठापकी पूर्ण पीठ असलेल्या तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेस रविवारी प्रारंभ झाला.
Written by दया ठोंबरे

First published on: 05-10-2015 at 01:53 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tuljabhawani shardiya navratrostav