जीवचित्र : कोणास ठाऊक कसा, पण घडय़ांचा होतो ससा

आज तुम्हाला शिकवली जात असलेली साधी ओरिगामी जगात सर्वत्र शिकवली जाते.

या कलेतील महान गुरू लोकांनी ओरिगामीच्या अधिक कठीण वस्तू बनवल्या.

‘‘बाई बाई बाई बाई, काय हे? तुला अजून साधी रुमालाची घडी नीट घालता येत नाही?’’

हे वाक्य कुठल्याही वयात कोणाकडूनही कुणालाही ऐकवलं जाऊ  शकतं. पण आमच्या संशोधनानुसार, याची सुरुवात बहुतेक जपानमध्ये झाली असावी.

बारीक डोळ्यांच्या कुणा खाष्ट सासूने तिच्या घुम्या सुनेला असं म्हटलं असावं. आणि तिने रागारागात आपल्या छोटय़ा खोलीत येऊन वहीचे कागद टराटरा फाडत त्याच्यावर घडय़ांची प्रॅक्टिस करून राग शांत केला असावा. आणि अशा रीतीने जपानमध्ये ओरिगामीची सुरुवात झाली असावी.

जापनीज भाषेत ‘ओरी’ म्हणजे घडी व ‘कामी’ म्हणजे कागद! हे मात्र खरंय. पण या कागदी घडय़ांना आधी ‘ओरीसुई, ओरिमोनो, तातामीगामी’ असेही म्हणत. पण या शब्दांचे जापनीज स्पेलिंग लहान मुलांना लिहायला कठीण गेले असते म्हणून ‘ओरी-कामी’ (गामी) या सोप्या शब्दांना जपानमध्ये कायमचे स्थान मिळाले. चीनमध्ये याला ‘झे झी’ असे भलतेच नाव आहे. जपान, चीन, भारत, जर्मनी, अमेरिका, स्पेन अशा बऱ्याच देशांत ओरिगामी कला अभ्यासली गेली आणि मुलांना अभ्यासाला आली.

आज तुम्हाला शिकवली जात असलेली साधी ओरिगामी जगात सर्वत्र शिकवली जाते. पण काही देशांत मात्र नाही. त्यांना साधी घडय़ांची बोटदेखील बनवता येत नाही. पण किती मज्जा ना!

कात्री, गम वगैरे न वापरता आपण एक ओळखू येणारी, वापरता येऊ  शकणारी वस्तू बनवतो. आपले अनिल अवचट, अरविंद गुप्ता हे आजोबा लोक खूप गमतीजमती करतात या ओरिगामीतून.

या कलेतील महान गुरू लोकांनी ओरिगामीच्या अधिक कठीण वस्तू बनवल्या. विविध प्राणी-पक्षी बनवले. त्यांना डोळे, तोंड, नाक वगैरे नसतात. तरीही त्यात त्यांच्या हालचाली, शरीररचना इतक्या परफेक्ट पकडलेल्या असतात, की आपण या कलेपुढे नतमस्तक होतो. कारण यात कात्री, गम, तार असे काहीच वापरलेले नसते. केवळ एकाच कागदातून हे प्राणी बनतात.

हा ससाच पाहा ना! म्हणजे चंद्रावरच्या डागांतही आपल्याला ससा दिसतो; पण या ठिकाणी धावता, बसता अशा सर्व प्रकारांतील ससा मस्त बनवलाय. हात लावायला गेलो तर तो टुणकन् उडी मारून पळून जाईल असं वाटतं.

मुंबईत इंडो-जापनीज संस्थेतर्फे खूपदा ओरिगामी शिकवली जाते किंवा त्याची प्रदर्शनं लावली जातात. ती पाहण्यासाठी आपल्या पालकांजवळ हट्ट धरा.

श्रीनिवास आगवणे shreeniwas@chitrapatang.in

मराठीतील सर्व बालमैफल ( Balmaifalya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Guide to creating an origami style photos

Next Story
.. आणि वाघाचे अंग पट्टेरी झाले!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी