एका तळ्याकाठी अनेक मोठी झाडे होती. छोटी झुडपे होती. लव्हाळी होती आणि डोलणारे गवतही होते. या गवताच्या झाडांवर रंगीबेरंगी, निळी, जांभळी फुले फुललेली असायची. एकदा एक साळुंकी उडतउडत चालली होती. तिला ही गवतफुले दिसली. तिला वाटले, किती सुंदर फुले आहेत! निळी, जांभळी- किती मोहक रंग आहेत यांचे! साळुंकी फुलांकडे झेपावली आणि म्हणाली, ‘‘तुमचे रंग किती गोड आहेत. माझ्याशी मैत्री कराल?’’ फुले म्हणाली, ‘‘हो! आम्हाला खूप आवडेल तुझ्याशी मैत्री करायला.’’ साळुंकीने आपले पंख पसरून फुलांना हळुवार स्पर्श करून हस्तांदोलन केले.

आता साळुंकी रोज गवतफुलांना भेटायला येऊ लागली. रोज त्यांच्या गप्पा चालत. एक दिवस गवतफुले म्हणाली, ‘‘साळुंके, तू इतकी गोड बोलतेस. एखादं गाणं म्हणून दाखव ना!’’ साळुंकीने पंख हलवत म्हटले, ‘‘अरे बापरे! गाणं? बघते प्रयत्न करून. आठवावं लागेल.’’ ती विचार करायला लागली. ‘‘ऐका हं!’’ तिने गळा साफ केला. ‘‘गाणं तुमचंच आहे.’’

‘‘गवतफुला रे गवतफुला

रंग मखमली निळा, जांभळा

पाने हलती हिरवीगार

तुरा डोलतो झुपकेदार

गुवतफुला रे गवतफुला..’’

गवतफुलांनी टाळ्या वाजवल्या. ‘‘कित्ती गोड आहे तुझा गळा!’’

‘‘चला निघते आता. आज खूप वेळ गेला. पिल्लं वाट बघत असतील. त्यांना चारापाणी द्यायचा आहे. तुमचं आपलं बरं असतं. कुठे जायचं नाही, यायचं नाही. नुसतं डोलत राहायचं. एका जागी बसायचं. वाराच डोलवतो तुम्हाला. भूक लागली तर काय खाता? तहान लागली तर पाणी कसे पिता?’’

तिच्या या प्रष्टद्धr(२२४)्नाांवर गोड हसून गवतफुले म्हणाली, ‘‘अगं साळुंके, आम्हालाही भूक लागते. हे सोन्यासारखं ऊन आहे ना, हेच आमचं अन्न. सकाळचं कोवळं ऊन आम्हाला फारच आवडतं. ही मोठी मोठी झाडं आहेत ना, त्यांची मुळं पाणी साठवून ठेवतात. ती आम्हाला पाणी देतात. तू आत्ता म्हणालीस, तुम्ही फक्त डोलता. इकडून तिकडे हलत नाही. आता बघ हं गंमत. हे आमचं बी चोचीत घेऊन जा आणि एखाद्या जागी टाकून दे. पावसाळा आला की बघ आमची जादू.’’

साळुंकी चोचीत बी धरून निघाली. हे कुठे टाकावे, ती विचार करीत होती. उडताउडता तिला रानातलं शंकराचं देऊळ दिसलं. तिने देवळाच्या पाठीमागच्या बाजूला बी टाकलं. उन्हाळा संपला. पावसाळा सुरू झाला आणि साळुंकीनं पाहिलं की शंकराच्या देवळाच्या मागे निळी, जांभळी फुले फुलली होती. साळुंकीला नवल वाटलं. ती लगबगीनं गवतफुलांकडे आली. ती गवतफुलांना म्हणाली, ‘‘तुमच्यासारखीच निळी, जांभळी फुलं शंकराच्या देवळाच्या मागे फुलली आहेत.’’ गवतफुले हसून म्हणाली. ‘‘आता कळलं ना आम्ही इकडून तिकडे कसे फिरतो. आम्हीच काय, सर्वच झाडे, झुडपे, वेली यांच्या बिया तुम्ही पक्षी, मधमाश्या, कीटक आणि फुलपाखरं इकडून तिकडे टाकता. मग आम्ही रुजतो. गेलो की नाही आम्ही इकडून तिकडे!’’ साळुंकीने मान डोलावली आणि गाऊ लागली-

‘‘गवतफुला रे गवतफुला

जादू तुमच्या रुजण्याची

गंमत तुमच्या फुलण्याची

गवतफुला रे गवतफुला..’’