फॉक्सकॉन कंपनीने तामिळनाडूत १५ हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री टीआरबी राजा यांनी दिली होती. दरम्यान याबाबत कंपनीने स्पष्टीकरण देत अशी कुठलीही गुंतवणूक आम्ही करणार नाही असं स्पष्टीकरण दिलं आहे. टीआरबी राजा यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या चोवीस तासात कंपनीने स्पष्टीकरण देत अशी कुठलीही नवी गुंतवणूक आम्ही करणार नाही असं म्हटलंय.
कंपनीने काय स्पष्टीकरण दिलं आहे?
फॉक्सकॉन या तैवानच्या कंपनीने आता स्पष्टीकरण दिलं आहे की तामिळनाडू सरकारसह आमची १५ हजार कोटींच्या गुंतवणुकीबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही. तामिळनाडूचे उद्योग मंत्री टीआरबी राजा यांनी हे सांगितलं होतं की फॉक्सकॉन ही कंपनी १५ हजार कोटींचं गुंतवणूक करणार आहे. ज्यामुळे १४ हजार नोकऱ्या राज्यात निर्माण होणार आहेत. मात्र या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी कंपनीने हा दावा खोडून काढला आहे.
अधिकृत पत्रकात कंपनीने काय म्हटलं आहे?
फॉक्सकॉनने अधिकृत पत्रक जारी केलं आहे त्यात असं म्हटलं आहे की फॉक्सकॉनने भारतासाठीचे नवे प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. त्यांचं नाव रॉबर्ट वू असं आहे. रॉबर्ट वू यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांशी त्यांच्या कार्यालयात चर्चा केली. मात्र या चर्चेदरम्यान नव्या कुठल्याही गुंतवणुकीबाबत काहीही ठरलेलं नाही. फायानान्शिअल एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
टीआरबी राजा यांनी काय म्हटलं होतं?
टीआरबी राजा यांनी सोशल मीडिया पोस्ट केली होती आणि हे म्हटलं होतं की फॉक्सकॉन ही कंपनी १५ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. १४ हजार नोकऱ्यांची संधी आता निर्माण होणार आहे. इंजिनिअर्सनी आता तयार रहावं. कारण ही कंपनी आयफोनच्या निर्मितीसाठी ओळखली जाते. फॉक्सकॉनच्या क्लाएंटसमध्ये अॅपल, गुगल, सोनी, अॅमेझॉन, डेल, मायक्रोसॉफ्ट अशा कंपन्यांचा समावेश आहे. दरम्यान या घोषणेनंतर दुसऱ्याच दिवशी स्पष्टीकरण देत फॉक्सकॉन या कंपनीने १५ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा दावा खोडला आहे. अशी कुठलीही गुंतवणूक आम्ही करणार नसल्याचं स्पष्टीकरण कंपनीने दिलं आहे.
स्टॅलिन सरकारने याबाबत कुठलंही पत्रक जारी केलेलंं नाही
फॉक्सकॉनच्या पत्रकात हे नमूद करण्यात आलं आहे की आमचे प्रतिनिधी वू हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना भेटले. त्यांच्यासह कंपनीचं प्रतिनिधी मंडळही होतं. मात्र ही एक औपचारिक भेट होती. या भेटीत कुठलीही गुंतवणूक विषयक चर्चा झालेली नाही. १५ हजार कोटींची कुठलीही नवी गुंतवणूक आम्ही करणार नाही. दरम्यान फॉक्सकॉनकडून हे स्पष्टीकरण आल्यानंतर तामिळनाडू सरकारने वेगळं कुठलंही स्पष्टीकरण किंवा त्यांचं याबाबत म्हणणं काय हे अद्याप सांगितलेलं नाही.