Why Did Gold Prices Fall After Record High In India: गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या किमतींना आता ब्रेक लागला असून, गुरुवारी २३ ऑक्टोबर रोजीही भारतातील सोन्याच्या किमतीत घसरण सुरूच राहिली आहे. अमेरिका-चीन व्यापार तणाव कमी झाल्यामुळे आणि या आठवड्याच्या अखेरीस यूएस फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीच्या निर्णयापूर्वी गुंतवणूकदारांनी नफा बुक केल्याने किमतींमध्ये बदल झाल्याचे म्हटले जात आहे.
गुड रिटर्न्सच्या मते, भारतात २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,२५,८९० रुपये झाली आहे, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,१५,४०० रुपये झाली आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९४,४२० रुपये आहे.
भूराजकीय जोखीम, व्यापारातील अनिश्चितता आणि सुरक्षित खरेदीमुळे काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वाढीनंतर ही घसरण झाली आहे. गेल्या दहा महिन्यांत सोन्याच्या किमती सातत्याने वाढत होत्या. विशेषतः गेल्या दोन महिन्यांत सोन्याच्या किमतींमध्ये वेगाने वाढ झाली होती. सध्या सुरू असलेल्या घसरणीपूर्वी सोन्याने विक्रमी उच्चांकही गाठला आहे.
घसरण अपेक्षित होती
सोन्याच्या किमतीत गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या घसरणीवर कामा ज्वेलरीचे व्यवस्थापकीय संचालक कॉलिन शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीतील विक्रमी वाढीनंतर ही घसरण अपेक्षित होती. त्यामुळे याकडे किमतीतील सुधारणा (प्राइस करेक्शन) म्हणून पाहायला हवे. त्यामुळे ही घसरण तात्पुरती आहे. जागतिक आर्थिक परिस्थिती पाहता सोने पुन्हा नव्या उच्चांकावर जाण्याची अपेक्षा आहे.”
अशा प्रसंगी भारतात सोन्याची खरेदी वाढते
कॉलिन शाह पुढे म्हणाले की, “याकडे गुंतवणूकदार संधी म्हणून पाहतात आणि किंमत घसरल्यानंतर खरेदी करण्यासाठी याचा वापर करतात. दुसरीकडे, ग्राहक लग्नासारख्या शुभ कार्यांसाठी दागिने खरेदी करण्यासाठी किंमतीतील या घसरणीचा फायदा घेतात. सोन्याच्या किमतीतील ही सुधारणा दोन्ही प्रकारच्या खरेदीदारांसाठी सकारात्मक ठरते. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा ट्रेंड वेगळा असू शकतो, परंतु अशा प्रसंगी भारतात सोन्याची खरेदी वाढते.”
चांदीही घसरली
भारतातील चांदीच्या दरातही घसरण सुरू आहे. बुधवारच्या घसरणीनंतर गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात चांदीची किंमत मंदावल्याचे दिसत आहे. चांदीची किंमत सध्या १ लाख ६० हजार रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे. या घसरणीनंतरही, २०२५ मध्ये चांदीने ७० टक्के वाढ नोंदवली आहे.
