Govt hikes Dearness Allowance by 3 pr cent for employees pensioners ahead of Diwali Dussehra : केंद्र सरकारने दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचार्यांना दिवाळीची भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी महागाई भत्ता (Dearness Allowance) आणि महागाई सवलत (Dearness Relief ) मध्ये ३ टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळणार आहे.
या सुधारणेनंतर महागाई भत्ता हा आता मूळ वेतन आणि पेन्शनच्या ५५ टक्क्यांवरून वाढून ५८ टक्क्यांवर पोहचला आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेले बदल हे १ जुलै २०२५ पासून लागू होणार आहेत, ज्यामुळे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील बाकी ही ऑक्टोबरच्या पगाराबरोबर कर्मचार्यांना दिला जाईल. यामुळे सणांच्या दिवसांमध्ये शेकडो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या हातात जास्त पैसा असणार आहे.
पगारात किती फरक पडेल?
३० हजार रुपये मूळ वेतन असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यासाठी यामुळे दर महिन्याला ९०० रुपये जास्त मिळतील. ज्याचा दर महिना पगार ४० हजार रुपये आहे त्याच्या पगारात महिन्याला १२०० रुपयांची वाढ होईल.
या निर्णयामुळे ४८ लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि ६८ लाख निवृत्ती वेतनधारकांना फायदा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे एकूण १.१६ कोटी नागरिकांना याचा थेट लाभ मिळेल.
महागाई भत्ता(कर्मचाऱ्यांसाठी) आणि महागाई सवलत (पेन्शनधारकांसाठी) यामध्ये महागाई लक्षात घेता गेल्या वर्षभरात जानेवारी आणि जुलै अशा दोन वेळा सुधारणा करण्यात आल्या आहेत. जरी ही वाढ जानेवारी आणि जुलैमध्ये मोजली जात असली तरी, त्याची घोषणा ही बऱ्याचदा उशिरा केली जाते आणि त्या कालावधीतील रक्कम नंतर कर्मचाऱ्यांना दिली जाते.
महागाई भत्त्यामध्ये झालेली ही ३ टक्क्यांची वाढ सातव्या वेतन आयोगांतर्गत केलेली शेवटची सुधारणा असण्याची शक्यता आहे, कारण जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे.