वृत्तसंस्था, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आगामी काळात भारत जागतिक वाढीचा मुख्य घटक बनण्यासह, खनिज तेलाच्या जागतिक मागणीत चीनलाही मागे टाकण्याचे संकेत आहेत. असे असले तरी इंधनाच्या हरित पर्यायांकडे जग वळत असताना भारतात त्या दिशेने तयारीचा वेग अतिशय कमी आहे. त्यामुळे जीवाश्म इंधनावर देशाची मदार पुढेही लक्षणीय प्रमाणात कायम राहण्याची शक्यता आहे.

चीनची खनिज तेलाची मागणी भारताच्या तिप्पट आहे. तेवढी मागणी निर्माण करणे भारताला शक्य नाही. परंतु, चीनकडून मागणी कमी होत जाणार असून, भारताकडून मागणी वाढत जाणार आहे. यामुळे जागतिक पातळीवरील तेल पुरवठादार पुढील काही दशके भारतावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतील. याबाबत जेपी मॉर्गन चेस अँड कंपनीचे ऊर्जा व रसायन संशोधन विभागाचे (आशिया) प्रमुख पार्सले आँग म्हणाले की, भारत हा काही कालावधीत चीनला मागे टाकणार आहे. जागतिक वाढीचा भारत हा मुख्य आधार बनेल. यात लोकसंख्या हा सर्वांत महत्त्वाचा घटक असेल.
भारतातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, लवकरच भारत चीनला याबाबतीत मागे टाकणार आहे. तथापि, पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून इंधनाच्या अन्य अपारंपरिक पर्यायांकडे वळण्याचा भारताचा वेग कमी आहे. त्याचवेळी चीनकडून अतिशय वेगाने विद्युत शक्तीवरील ई-वाहनांचा वापर वाढत आहे.

जागतिक तेल मागणीमध्ये चीनचा वाटा कमी होत आहे. पुढील दशकात विकसनशील बाजारपेठांच्या एकूण तेल मागणीतील चीनचा वाटा सध्याच्या ५० टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत खाली येईल. याचवेळी भारताचा वाटा दुपटीने वाढून २४ टक्क्यांवर जाईल. रशिया-युक्रेन युद्धानंतर जागतिक तेल बाजारपेठेत भारताचे महत्त्वाचे स्थान आहे. कारण भारत रशियाकडून सवलतीच्या दरात खनिज तेलाची खरेदी करीत आहे.

ई-वाहनांची विक्री भारतात नगण्य

चीनमध्ये मागील वर्षी २०२२ मध्ये ई-वाहनांची विक्री ६१ लाख होती. भारताचा विचार करता मागील वर्षी केवळ ४८ हजार ई-वाहनांची विक्री झाली. चीनकडून अतिशय वेगाने ई-वाहनांचा स्वीकार केला जात आहे. याचबरोबर हरित इंधनाला अनेक देशांकडून प्राधान्य दिले जात आहे. भारतात मात्र हा स्थित्यंतराचा वेग अतिशय कमी आहे.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India will overtake china in global mineral oil demand amy