देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील एक अपार्टमेंट ३६९ कोटी रुपयांना विकण्यात आले आहे. देशात विकले गेलेले हे सर्वात महागडे घर (Indias Costliest Apartment) आहे. दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरात हे लक्झरी ट्रिपलेक्स अपार्टमेंट खरेदी करण्यात आले आहे. याच्या एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला हँगिंग गार्डन आहे. गर्भनिरोधक उत्पादने बनवणाऱ्या फॅमी केअरचे संस्थापक जे. पी. तपरिया (JP Tapariya)यांनी ते घर विकत घेतले आहे. ही सदनिका खरेदी करण्यासाठी १९.०७ कोटी रुपये फक्त मुद्रांक शुल्क म्हणून भरण्यात आले आहेत. एवढ्या पैशातून अनेक आलिशान बंगले बांधता आले असते आणि नावाजलेल्या गाड्याही घेता आल्या असता, अशी सोशल मीडियावर चर्चा आहे.
हे अपार्टमेंट लोढा मलबार या सुपर-लक्झरी निवासी टॉवरचा एक भाग आहे. हे २६ व्या, २७व्या आणि २८व्या मजल्यावर आहे. लोढा टॉवर वाळकेश्वर रोडवर गव्हर्नर इस्टेटच्या समोर आहे. जे पी तापरिया यांनी विकत घेतलेले हे देशातील सर्वात महागडे अपार्टमेंट असून, अद्याप त्याचे बांधकाम पूर्ण झालेले नाही, त्याचे बांधकाम सुरू आहे. ते २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. याआधी देशातील सर्वात महागडे घर बजाज ऑटोचे चेअरमन नीरज बजाज यांनी खरेदी केले होते. त्याच टॉवरमधील पेंटहाऊससाठी त्यांनी २५२.५० कोटी रुपये दिले होते.
१९.०७ कोटी रुपये मुद्रांक शुल्क
या अपार्टमेंटचे एकूण क्षेत्रफळ २७,१६० स्क्वेअर फूट आहे आणि हा करार १.३६ लाख रुपये प्रति स्क्वेअर फूट दराने झाला आहे. प्रति चौरस फूट आधारावर हा देशातील सर्वात महागडा निवासी करार आहे. अपार्टमेंटची नोंदणी बुधवारी सायंकाळी झाली असून, मुद्रांक शुल्काच्या स्वरूपात १९.०७ कोटी रुपये भरण्यात आले आहेत. लोढा समूहाची लिस्टेड कंपनी मॅक्रोटेक डेव्हलपर्सद्वारे बनवण्यात येणारा आलिशान टॉवर लोढा मलबारच्या १.०८ एकरमध्ये पसरलेला आहे.
कोण आहेत जे पी तापरिया?
जे पी तापरिया हे फॅमी केअर या गर्भनिरोधक उत्पादन कंपनीचे संस्थापक आहेत. तापरिया कुटुंबाचे अनंत कॅपिटल, स्प्रिंगवेल आणि गार्डियन फार्मसीमध्येही भागीदारी आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये तापरिया कुटुंबाने आपला आयकेअर बिझनेस वायट्रिस इंकला २,४६० कोटी रुपयांना विकला. २०१५ मध्येही तापरिया यांनी त्यांचा महिला आरोग्य सेवा व्यवसाय ४,६०० कोटी रुपयांना मायलनला विकला होता. अशा प्रकारे त्यांनी आपले दोन व्यवसाय विकून ७,००० कोटींहून अधिक रक्कम जमा केली.