तृप्ती राणे
आपण कोणत्याही गोष्टीचे नियोजन करताना थोडी तरी अधिक आर्थिक तजवीज करतो. कुठे फिरायला जात असू तर थोडे जास्त पैसे, रेल्वे किंवा विमानातून प्रवास करायचा असेल तर अधिक वेळ, लांबचा प्रवास असेल तर थोडा जास्त खाऊ, लहान बाळ प्रवासाला निघाले असेल तर जास्तीचे कपडे अशी तयारी करतोच. आयत्या वेळी तयारी करण्याचे प्रसंग अगदी कमी वेळ येतात. आपल्यातील काही मंडळी तर योजना आखण्यात खूप तरबेज असतात. लहानसहान गोष्टीदेखील त्यांच्या आराखड्यातून सुटत नाहीत. मात्र कधी कधी नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच असते. अशा वेळी भले भले आराखडे चुकतात. अशा घटनांना आपण आर्थिक स्थित्यंतर म्हणतो. या घटनांना थोडे वेगळ्या पद्धतीने हाताळावे लागते आणि म्हणून आजचा हा लेख.
आर्थिक स्थित्यंतरे अशा घटनांमुळे होतात, जिथे आयुष्यामध्ये असे काही प्रसंग किंवा घटना घडतात की ज्यांचे, परिणाम मनावर, मेंदूवर, शरीरावर होतात आणि त्याचा संबंध आर्थिक परिस्थितीशी असतो. उदा. अकाली वैधव्य, अकल्पित मृत्यू, अचानक उद्भवलेला मोठा आजार, घटस्फोट, निवृत्ती, लॉटरी, वारसाहक्कातून मिळालेली मोठी रक्कम, इत्यादी. अशा प्रकारच्या आर्थिक स्थित्यंतरातून जाणारी व्यक्ती वेगवेगळ्या भावनांचा अनुभव घेत असते. कधी खूप आनंद, तर कधी खूप खिन्नता, कधी गोंधळलेली परिस्थिती तर कधी अति उत्तेजना! त्यामुळे या व्यक्तींना मिळणारे समुपदेशन हे मानसिक आणि आर्थिक दोन्ही बाजूंवर काम करणारे गरजेचे आहे. काही गोष्टींमधून आपण याचा आढावा घेऊया.
एका गृहस्थांची निवृत्ती होऊन साधारणपणे १०-१२ महिने झाले होते. निवृत्तीआधी सरकारी नोकरीमध्ये ते चांगल्या पदावर कार्यरत होते. पगार चांगला असल्याने निवृत्तिवेतनदेखील चांगले मिळत होते. आयुष्यभर चांगल्या प्रकारे गुंतवणूक केलेली असल्यामुळे आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती. आर्थिक घडी व्यवस्थित असूनदेखील ते गृहस्थ मात्र कधीच आनंदी दिसत नव्हते. घरात सतत चिडचिड करायचे. इतरांबरोबर त्यांचे पटत नसे. ज्या माणसाला कधी साधा सर्दी-खोकला नव्हता, तो आता सतत डोकेदुखीची गोळी घेऊ लागला होता. या गोष्टीचा खोलवर तपास केल्यावर कळले की, नोकरीत असताना हाताखालच्या लोकांकडून “सर सर” म्हणून घ्यायची त्यांना सवय लागली होती. ऑफिसमधले कोणतेही काम त्यांच्या मर्जीबाहेर होत नसे. शिवाय वेळेचे गणित पक्के असल्याने कामावर जायला उशीर आणि घरी परत यायला उशीर झाल्याचे कधीच घडले नाही. त्यांचे काम आणि त्यांचा हुद्दा हीच त्यांची ओळख झाली होती. त्यामुळे निवृत्तीनंतर सगळेच गणित बिघडले. हातात असणारा वेळ, हातात नसणारी कामे आणि हाताखाली नसणारी माणसे, यामुळे त्या गृहस्थांना हरवल्यासारखे वाटायला लागले.
आपला हुद्दा आता आपल्याकडे नाहीये आणि म्हणून आपल्याला किंमत नाही असे त्यांना वाटू लागले आणि ते निराशेच्या गर्तेत बुडाले. “मीच बरोबर आणि सगळं जग चुकीचं” वाटताना कधी ते चुकीच्या सल्ल्यांच्या आहारी गेले हे त्यांनाच समजले नाही. त्यांची काही गुंतवणूक गरजेपेक्षा जास्त जोखमीच्या झाल्या. त्यामुळे काही काळाने त्यांना मूळ मुद्दल रक्कमदेखील मिळविणे कठीण झाले. तेव्हा त्यांनी त्यांच्या बायकोला घडत असलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. मग त्यांनी आर्थिक आणि मानसिक समुपदेशन घेण्यास सुरुवात केली. त्यांना त्यांची किंमत कळायला थोडा वेळ लागला, मात्र जोपर्यंत मानसिक स्थिती ठीक नाही तोपर्यंत कोणतेही आर्थिक निर्णय घेऊ नये हे निश्चित केले. त्यांच्या मुलांना आणि बायकोला यात सामील करून हळूहळू त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यामधील ताण कमी करत आणला.
हल्लीच्या काळात घटस्फोटांचे वाढते प्रमाण आपल्या आजूबाजूला सहजपणे दिसते. अशा प्रसंगातून जाणारी व्यक्ती कधी कधी आर्थिक आणि मानसिक दोन्ही बाजूने अडकलेली असते. स्वतःकडची पुंजी कमी पडेल का? पुढे काय होणार? मुलांची जबाबदारी असेल तर त्यांना कोण बघणार? कधीच नोकरी केली नसेल तर आता कोण आणि कोणती नोकरी देणार? इत्यादी गोष्टींचा सतत मनावर ताण असतो. ज्या स्त्रियांनी नेहमीच घर सांभाळले असेल, त्यांना स्वाभाविक अधिक काळजी वाटते. शिवाय लोक काय म्हणतील, समाज आपल्याकडे कशा नजरेने पाहणार हेसुद्धा दडपण मनावर येते. त्यात पुढे जर कायद्याची कार्यवाही झाली तर जीव अगदी नकोसा करणारे अनुभव अनेक जणांच्या वाट्याला आलेले आहेत. तेव्हा अशा व्यक्तींच्या समुपदेशनामध्येसुद्धा मानसिक आणि आर्थिक समुपदेशन येते. पोटगी किती मागायची? मिळालेल्या पैशांची तरतूद कशी करायची? मनावरचे दडपण कमी करून पुढच्या आयुष्याची नव्याने सुरुवात कशी करावी? या बाबतचे निर्णय हे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने घेणे आवश्यक आहे.
अशीच काहीशी परिस्थिती ही अचानक वैधव्यामुळे आलेल्या स्त्रियांचीदेखील होते. जर ती सगळ्याच गोष्टींसाठी तिच्या जोडीदारावर अवलंबून असेल तर परिस्थिती आणखी कठीण होते. बायकोला आपल्या नवऱ्याने काय, कुठे गुंतवणूक केली आहे, हेदेखील माहीत नसते आणि साधे बँकेतील व्यवहार नीट जमत नसतात. त्यात अचानक आलेले एकाकीपण आणि जबाबदारी या दोन्हीमुळे ती स्त्री खूप खचते. एखाद्या पुरुषाने कधीच घरातील जबाबदारी पार पाडली नसेल तर त्याची पत्नी गेल्यानंतर त्याला घराची विस्कटलेली घडी बसवताना ताण येऊ शकतो. मग अशा ताणतणावात आर्थिक निर्णय घेणे अधिक जोखमीचे असते.
मानसिक समतोल बिघडायच्या कारणांमध्ये अपेक्षा नसताना मिळालेली मालमत्ता किंवा लागलेली लॉटरी ही कारणे मोठी आहेत. अचानक मिळालेला पैसा हा उगीच जोखीम घ्यायला उत्तेजित करतो. आपल्या नशिबाने आपल्याला संपत्ती मिळाली असून त्यासाठी मेहनत करावी लागली नसल्याने नुकसान झाले तरी चालेल अशी मानसिकता काही लोकांची होऊ शकते. मग गरजेपेक्षा जास्त खर्च, दिखावा, जास्त जोखीम असलेले गुंतवणूक पर्याय घेणे या प्रकारच्या घटना घडतात. त्यात जर किशोर वयात असलेल्या मुलांच्या हातात गरजेपेक्षा जास्त पैसे असल्यास, व्यवसानाधीन होण्याचा धोका वाढतो. अशा व्यक्तींचे समुपदेशन करताना त्यांच्या खऱ्या गरजांची ओळख पटवून देऊन पुढे त्यांच्या गरजेनुसार आणि जोखमीनुसार त्यांचे आर्थिक नियोजन करावे लागते.
इथे सर्वात महत्त्वाची भूमिका अशा व्यक्तींच्या कुटुंबातील इतर सदस्य बजावतात. ज्या व्यक्तीची मन:स्थिती ठीक नसेल तर अशा व्यक्तींना मोठ्या आर्थिक निर्णयांपासून लांब ठेवणे कुटुंबाच्या दृष्टीने फायदेशीर असते. म्हणून अशा वेळी त्यांचे मित्र/नातेवाईकांनी त्यांना सांभाळून घ्यायला हवे. लोक काय म्हणतील, किंवा अपराधीपणाच्या भावनेतून त्यांना बाहेर काढून मग पुढे योग्य सल्ल्याने हळूहळू पूर्वपदावर आणायला हवे. तेव्हा आपल्या आसपास जर अशा व्यक्ती असतील, तर त्यांना मदत करून त्यांच्या आयुष्याला एक चांगले वळण द्यायला मदत करा.
trupti_vrane@yahoo.com
