लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबईः देशात म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही अलिकडच्या वर्षात लक्षणीय वाढली आहे. तरी चीनमधील १५-२० टक्के आणि जपानमधील ६० टक्क्यांच्या तुलनेत, भारतातील म्युच्युअल फंडातील प्रवेश (पेनिट्रेशन) हे अद्याप ८ टक्क्यांच्या आसपासच आहे. देशातील जवळपास ५० म्युच्युअल फंड घराणी आणि त्यांच्याकडून दाखल हजारो योजनांना समजून घेणे आणि त्यानंतर त्यातील सर्वात सोयीच्या व फायदेशीर फंडात गुंतवणुकीचा निर्णय घेणे हे तितकेसे सोपे नाही, हेही तितकेच खरे.
गुंतवणूकदारांना मग ते अनुभवी असोत अथवा नव्याने आलेले असोत, म्युच्युअल फंड बाजारात प्रवेश करताना, फंडाची निवड ही मोठी आव्हानात्मक बाब ठरताना दिसून येते. यावर उपाय म्हणून युनियन म्युच्युअल फंडाने नवीन फंड ऑफ फंड्स (एफओएफ) योजना दाखल केली आहे जी किरकोळ गुंतवणूकदारांना लार्ज कॅप, मिड आणि स्मॉलकॅप इक्विटी (समभागसंलग्न) योजनांमध्ये त्यांनी गुंतविलेल्या पैशाचे गतिमानपणे वाटप करण्यास आणि त्या संबंधाने गुंतवणूक निर्णय सुलभ करण्यास मदत करेल.
युनियन डायव्हर्सिफाइड इक्विटी ऑल कॅप अॅक्टिव्ह एफओएफ’ या नावाची ही नवीन योजना बाजाराची नेमकी वेळ, पैशांचे वाटप आणि कर कार्यक्षमता याबाबत नेमका निर्णय घेण्याच्या सामान्य गुंतवणूकदारांना भेडसावणाऱ्या आव्हानांना तोंड देण्याचा प्रयत्न करते, असे कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. नवीन फंड प्रस्तुती (एनएफओ) गुंतवणुकीसाठी खुली झाली असून, येत्या १५ सप्टेंबर २०२५ रोजी ती बंद होणार आहे.
ही वाटप रणनीती “अँकर-एक्सप्लोरर” प्रारूपावर आधारित आहे. ज्यामध्ये दीर्घकालीन धोरणात्मक दृष्टिकोन आणि अल्पकालीन बाजार संधी यांचे मिश्रण केले गेले आहे, असे या फंड घराण्याचे मुख्य गुंतवणूक अधिकारी हर्षद पटवर्धन म्हणाले.
“म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक वाढत आहे, परंतु ती सखोल बनविण्यासाठी, साधी, सुबोध योजना दाखल करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून गुंतवणूकदारांना सूज्ञतेने निर्णय घेण्यास मदत मिळेल,” असे युनियन अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधु नायर या योजनेबद्दल म्हणाले.