मुंबई: माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या दोन कंपन्या – टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि इन्फोसिसने डिसेंबर तिमाहीच्या गुरुवारी जाहीर केलेल्या निकालांतून संमिश्र कल दर्शविला.या क्षेत्रातील देशातील क्रमांक एकची कंपनी ‘टीसीएस’ने ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत ११,७३५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावल्याचे गुरुवारी जाहीर केले. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला १०,८४६ कोटी रुपयांचा नफा झाला होता, त्यात यंदा ८.२ टक्के वाढ झाली आहे.
टीसीएसने नवीन कार्यादेशांमध्ये वाढ नोंदविल्याने नफ्यात वाढ साधली आहे. डिसेंबरअखेर तिमाहीत कंपनीचा महसूल ४ टक्क्यांनी वाढून, ६०,५८३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा महसूल ५८,२२९ कोटी रुपये होता.
भागधारकांना २७ रुपये लाभांश
कंपनीने एक रुपया दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक समभागासाठी ९ रुपये तिसरा अंतरिम लाभांशांसह, प्रत्येकी १८ रुपयांच्या विशेष लाभांशाची घोषणा केली आहे. यामुळे भागधारकांच्या पदरी प्रति समभाग एकूण २७ रुपये असा घसघशीत लाभांश पडणार आहे. पुढील महिन्यात ५ फेब्रुवारीला भागधारकांच्या खात्यात लाभांश जमा केला जाईल. यासाठी १९ जानेवारी ही रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे.
हेही वाचा >>>Money Mantra: फंड विश्लेषण- टाटा लार्ज कॅप फंड
इन्फोसिसच्या नफ्यात ७.३ टक्क्यांची घसरण
इन्फोसिसचा निव्वळ नफा डिसेंबरअखेर सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत ७.३ टक्क्यांनी घसरून ६,१०६ कोटी रुपयांवर घसरला. गेल्यावर्षी याच कालावधीत कंपनीने ६,५८६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला होता. यादरम्यान कंपनीचा एकत्रित महसूल सरलेल्या तिमाहीत १.३ टक्क्यांनी किरकोळ वाढून ३८,८२१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत ३८,३१८ कोटींचा महसूल प्राप्त झाला होता.
कंपनीने बेंगळूरुस्थित सेमीकंडक्टर डिझाइन सेवा प्रदाता इनसेमीचे सुमारे २८० कोटी रुपयांना अधिग्रहण करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. इनसेमीचे अधिग्रहण विद्यमान आर्थिक वर्षातील अखेरच्या तिमाहीत पूर्ण होण्याची आशा आहे.
हेही वाचा >>>गूगल, ॲमेझॉनमध्ये नोकरकपातीचे वारे
कर्मचारी संख्येला गळती
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना कर्मचारी गळतीच्या (ॲट्रिशन) वाढत्या समस्येने ग्रासले आहे. सरलेल्या तिमाहीत टीसीएसमधील कर्मचारी गळतीचे प्रमाण १३.३ टक्क्यांवर पोहोचले आहे. जे या आधीच्या तिमाहीत १४.९ टक्के नोंदवले गेले होते. सरलेल्या डिसेंबर तिमाहीत कंपनीतील कर्मचारी संख्या ५,६८० ने घटली आहे. आता कंपनीतील कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ६,०३,३०५ वर पोहोचली आहे. यापाठोपाठ इन्फोसिसने देखील सरलेल्या तिमाहीत ६,१०१ कर्मचाऱ्यांना कमी केले आहे. सलग चौथ्या तिमाहीत कर्मचारी संख्येत घसरण झाली आहे. कंपनीमध्ये डिसेंबर अखेर ३,२२,६६३ कर्मचारी कार्यरत आहेत.