सरलेल्या मे महिन्यात वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) माध्यमातून २.०१ लाख कोटींचे संकलन झाले. मे २०२४ मध्ये संकलित १.७२ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत हे संकलन १६.४ टक्क्यांनी अधिक आहे. तर एप्रिल २०२५ मध्ये २.३७ लाख कोटी रुपयांचे सर्वोच्च संकलन झाले. जीएसटी लागू झाल्यापासून १२.६ टक्क्यांचा सर्वोच्च वृद्धिदर एप्रिल महिन्यात (मार्च २०२५ चे संकलन) नोंदला गेला. मे महिन्याच्या संकलनातील वाढीची टक्केवारी भारतातील जीएसटी संकलनातील आतापर्यंतची सर्वाधिक वार्षिक वाढ आहे.

आयातीतून गोळा होणाऱ्या जीएसटीमध्ये वार्षिक २५.२ टक्के वाढ झाली आहे आणि देशांतर्गत व्यवहारांमधून मिळणाऱ्या जीएसटीमध्ये १३.७ टक्के वाढ झाली आहे. या संकलनातून एक गोष्ट लक्षात येते की, कमी झालेली महागाई, अपेक्षित दर कपातीचा परिणाम आणि बदलते घरगुती खर्चाचे स्वरूप लक्षात येते. खासगी भांडवली खर्चावर (प्रायव्हेट कॅपेक्स) आणि आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) वाढीच्या दृष्टिकोनावर या बदलत्या खर्चाचा संभाव्य परिणाम यांचा विचार करायला हवा. निर्देशांकांनी गेल्या वर्षी २७ सप्टेंबर २०२४ रोजी नवीन उच्चांक नोंदवला आणि त्यानंतर बाजाराने मोठी घसरण अनुभवली. जानेवारीपासून निर्देशांकात वाढ झाली असली तरी ही वाढ अशीच पुढे सुरू राहील किंवा निर्देशांक भविष्यात मोठी घसरण अनुभवतील हे आज सांगणे कठीण आहे.

जानेवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीत निर्देशांकात वाढ झाली असली तरी इक्विटी म्युच्युअल फंडांसाठी हा काळ संमिश्र राहिला असून, सक्रियपणे व्यवस्थापित फंडांपैकी केवळ ३८.४५ टक्के फंडांनी मानदंड सापेक्ष चांगली कामगिरी केली आहे. या कालावधीत लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप तसेच फोकस्ड मल्टीकॅप, फ्लेक्झीकॅप आणि व्हॅल्यू या फंड गटात सर्वात चांगली कामगिरी लार्जकॅप फंड गटात झालेली आहे. एका बाजूला सक्रिय व्यवस्थापित फंडाची चिंता वाटावी अशी कामगिरी तर दुसऱ्या बाजूला लार्जकॅप फंड गटाची आश्वासक कामगिरी अशी स्थिती आहे. या कालावधीत ७८.५४ टक्के लार्ज कॅप फंडांनी ‘निफ्टी १०० टीआरआय’ किंवा ‘बीएसई १०० टीआरआय’ सापेक्ष चांगली कामगिरी केली आहे. या निर्देशांकांचा विद्यमान पीई दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी असल्याने नव्या गुंतवणुकीसाठी लार्जकॅप आकर्षक वाटत आहेत.

सध्याच्या परिस्थितीत अमेरिका पुरस्कृत व्यापार युद्धाचे परिणाम, देशांतर्गत कंपन्यांच्या नफ्यात वाढीची चिंता, समाधानकारक नसलेले कंपन्यांचे निकाल आणि नजीकच्या काळात रुपयाची संभाव्य अस्थिरता शेअर बाजारात गुंतवणूकदारांसाठी खडतर आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये लार्जकॅप फंडात गुंतवणूक करणे हा योग्य पर्याय असू शकतो.

बंधन लार्जकॅप फंडाचा आज १९ वा वर्धापन दिन आहे. या फंडाची सुरुवात तीन वर्षांची मुदत बंद योजना म्हणून ‘स्टँडर्ड चार्टर्ड एंटरप्राइस इक्विटी फंड’ म्हणून झाली. फंडाची पहिली एनएव्ही ९ जून २००६ रोजी जाहीर झाली. मे २००८ मध्ये स्टँडर्ड चार्टर्ड म्युच्युअल फंडाचे आयडीएफसी इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सने अधिग्रहण केले. ११ फेब्रुवारी २०१३ रोजी या फंडाचे आयडीएफसी इक्विटी फंड असे नामकरण झाले. दहा वर्षांनी १३ मार्च २०२३ रोजी या फंडाला बंधन लार्जकॅप फंड अशी सध्याची ओळख मिळाली. या प्रवासात फंडाला आजपर्यंत केनेथ ॲड्र्यू, अंकुर अरोरा, मीनाक्षी दावर (सध्या निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडात निधी व्यवस्थापक) सुमित अगरवाल, सचिन रेळेकर (सध्या ॲक्सिस म्युच्युअल फंडात निधी व्यवस्थापक) आणि मनीष गुनवानी हे निधी व्यवस्थापक म्हणून लाभले. सध्या फंडाच्या निधी व्यवस्थापनाची धुरा मनीष गुनवानी, प्रतीक पोतदार, रितिका बेहरा आणि प्रतीक सूत्रा यांच्याकडे आहे. ९ जून २००६ ते ६ जून २०२५ दरम्यान केलेल्या ‘एसआयपी’वर फंडाने वार्षिक १२.८० टक्के दराने परतावा दिला आहे. ९ जून २००६ ला केलेल्या एकरकमी गुंतवणुकीवर ६ जून २०२५ च्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार ११.२८ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. १ एप्रिल २०२० ते ३१ मे २०२५ दरम्यानची ३ वर्षांची चलत सरासरी (रोलिंग रिटर्न) तपासली असता ८२.३४ टक्के वेळा या फंडाने मानदंड सापेक्ष अधिक परतावा मिळविला आहे. १ जुलै २००६ ते ३१ मे २०२५ या कालावधीतील ५ वर्षांची चलत सरासरी तपासली असता ६२.३४ टक्के वेळा या फंडाने मानदंड सापेक्ष अधिक परतावा मिळविला आहे.

वर्षांचे रोलिंग रिटर्न आधारावर फंडाची कामगिरी साधारण राहिली आहे. हा फंड मालमत्ता क्रमवारीत लार्जकॅप फंड गटात १५ व्या स्थानी आहे. बंधन लार्जकॅप फंडाच्या वार्षिक परताव्याची तुलना लार्जकॅप फंड गटाच्या सरासरी परताव्याशी केली असता, २००८ आणि २०११ मधील बाजार घसरणीचा काळ वगळता फंडाने जवळजवळ दरवर्षी (कॅलेंडर रिटर्न) फंड गटाच्या सरासरीपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. सर्वसाधारणपणे लार्जकॅप फंड गटात केवळ ३५ ते ४० टक्के फंड मानदंड सापेक्ष अधिक परतावा मिळवीत असतात. निफ्टी १०० टीआरआय किंवा बीएसई १०० टीआरआय सापेक्ष चांगली कामगिरी करण्यासाठी अनेक फंडांना संघर्ष करावा लागतो. फंडाची २००६ ते २०१८ कामगिरी नक्कीच समाधान देणारी होती. भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने फंड वर्गीकरण आणि गुंतवणूक नियम आणल्यानंतर २०१९ ते २०२४ या सहा वर्षांत फंडाने ‘निफ्टी १०० टीआरआय’सापेक्ष चांगली तर दोन वर्षे खराब कामगिरी केली आहे. जानेवारी २०१४ ते मार्च २०२५ या कालावधीत पाच वर्षांच्या ‘रोलिंग रिटर्न’चा विचार केला, तर फंडाने सरासरी १४.३ टक्के परतावा दिला आहे. याच कलावधीत ‘निफ्टी १०० टीआरआय’ने सरासरी १३.३ टक्के परतावा दिला आहे.

बंधन लार्जकॅपच्या पोर्टफोलिओमध्ये सरासरी ८५ टक्के लार्जकॅप कंपन्यांचा समावेश असतो. फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये सरासरी ५५ कंपन्यांचा समावेश असतो. बँकिंग वित्तीय सेवा आणि विमा (बीएफएसआय) क्षेत्रातील कंपन्या नेहमीच फंडाच्या गुंतवणुकीत आघाडीवर राहिल्या आहेत. बँकांत सर्वाधिक गुंतवणूक आहे. त्या खालोखाल ग्राहकोपयोगी वस्तू आणि माहिती तंत्रज्ञान निधी व्यवस्थापकांचे पसंतीची क्षेत्रे राहिली आहे. विद्यमान कॅलेंडर वर्षात विस्तृत बाजारात लार्जकॅपचे सापेक्ष मूल्यांकन नवीन गुंतवणूक पातळीवर आहे. अनेक गुंतवणूकदारांना दरवेळी नवीन फंडात गुंतवणूक करायची असते, अशा मानसिकतेचे गुंतवणूकदार या फंडात गुंतवणूक करू शकतात. म्हणूनच मध्यम जोखीम घेऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी, लार्जकॅप फंड हे दीर्घकालीन दृष्टिकोनातून (५ ते ७ वर्षे) कालावधीसाठी आदर्श गुंतवणूक साधन आहेत. अवास्तव जोखीम न घेता आणि तुलनेने स्थिर पोर्टफोलिओ राखून लार्जकॅप फंड हा एक चांगला विकल्प आहे. या फंडाला १९ वर्षांचा इतिहास आहे आणि फंडाचा मानदंड आणि फंड गट सरासरी सापेक्ष समाधानकारक परतावा आहे. भविष्यातील अस्थिरता लक्षात घेता फंडात ‘एसआयपी’ मार्गाने गुंतवणूक करणे हिताचे ठरेल.