रणजित कुलकर्णी
आयुर्विमा हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अविभाज्य घटक असला पाहिजे, मात्र तरीसुद्धा त्याबद्दल समाजात एक प्रकारची निरुत्साही मानसिकता आहे. अनेकदा विमा हप्ता महाग वाटून आयुर्विमा घेणे टाळण्याकडे लोकांचा कल असतो. तसेच वेगवेगळ्या विमा योजना, त्यांचे वेगवेगळे हप्ते आणि प्रत्येक कंपनीचा वेगवेगळा विमा हप्ता यामुळे या मानसिकतेत भरच पडते. त्यामुळे विमा हप्ता कसा ठरतो, त्याचे विवेचन हे महत्त्वाचे आहे. आयुर्विम्याचा हप्ता हा प्रामुख्याने आपले वय आणि विम्याची मुदत यावर अवलंबून असला तरी विमा हप्ता ठरताना अनेक घटकांचा विचार केला जातो. यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मृत्युदर. सोबत दिलेल्या तक्त्यामध्ये ‘ॲक्च्युरियल सोसायटी ऑफ इंडिया’ने प्रकाशित केलेले मृत्युदर वानगीदाखल खालील तक्त्यात दिला आहे.
तक्ता क्र. १
वय दहा लाखांमागे मृत्युदर
२० २८४
२५ ४०७
३० ५८६
३५ ७८७
४० १६८०
४५ २५७९
५० ४४३६
५५ ७५३१
६० १११६२
वरील तक्त्यावरून लक्षात येईल की, पंचवीस वर्षे वयाला ४०७ हा मृत्युदर आहे, तर चाळिशीमध्ये हा मृत्युदर दहा लाख लोकसंख्येमागे १६८० म्हणजे जवळजवळ पंचविशीच्या तरुणाच्या चौपट आहे. पन्नाशीच्या व्यक्तीसाठी तोच दर दहा लाख लोकसंख्येमागे ४,४३६ इतका आहे म्हणजे पंचविशीतील तरुणांच्या तुलनेत मृत्युदर मात्र अकरापट अधिक झाला आहे. अर्थात शुद्ध टर्म योजना यांचा विमा हप्ता त्यामुळेच वयाप्रमाणे वाढत जातो. अर्थात हे दरदेखील साधारणपणे दर दहा वर्षांनी आजूबाजूच्या परिस्थितीनुसार बदलत असतात. जसे की, करोनाकाळात हे दर वाढले होते, तर अर्थव्यवस्थेतील वाढत्या सुविधा आणि आरोग्य क्षेत्रातील सुधारणांमुळे भारतात आधीपेक्षा मृत्युदर काहीसे कमी झालेले दिसतात.
दुसरी बाब म्हणजे, विम्याची मुदत पंचवीस वर्षांच्या तरुणाने जरी २५ वर्षांसाठी पॉलिसी घेतली तरी त्याच्या मृत्यूची शक्यता या पंचवीस वर्षाच्या काळात खूपच कमी असते. पण पन्नास वर्षांच्या माणसाला पंचवीस वर्षांचा विमा देताना तो ७५ वर्षांचा होत असतो, त्यामुळे मृत्यू शक्यता खूपच वाढते. अर्थात आयुर्विमा घेतेवेळी ठरलेला हप्ता बदलत नाही. त्यामुळे योग्य वयात अधिकाधिक मुदतीचा विमा घेणे हे नेहमीच श्रेयस्कर ठरते. तेव्हा विमा हप्ता हा वय आणि मुदत यावर कशाप्रकारे अवलंबून असतो, हे या ठिकाणी स्पष्ट होईल.
हा झाला फक्त मुदत विम्याचा (टर्म इन्शुरन्स) प्रकार. पण इतरही अनेक योजना विमा कंपन्या आणत असतात. यामध्ये वेगवेगळ्या एंडोमेंट, मनी-बॅक योजना, लहान मुलांकरिता विमा योजना, युनिट लिंक पॉलिसी इत्यादी प्रकार असतात. युनिट लिंक पॉलिसीमध्ये हप्ता ठरलेला असतो, मात्र त्यातले शुल्क (चार्जेस) हे पुन्हा मृत्युदर, योजना व्यवस्थापन खर्च (फंड मॅनेजमेंट चार्जेस), प्रशासकीय खर्च, कमिशन इत्यादी वजा होत असतात आणि प्रत्यक्ष गुंतवणूक केलेली रक्कम त्याप्रमाणात कमी होते. म्हणजे हजार रुपये हप्ता असताना या सर्व खर्चामध्ये शंभर रुपये गेले तर ९०० रुपयांच्या ‘एनएव्ही’प्रमाणे युनिट मिळतात.
आता आपण प्रामुख्याने विमा हप्त्याचे जे इतर घटक आहेत ते पाहूया. विमा कंपन्यांचा खर्च निरनिराळ्या प्रकारचा असतो. उदाहरणार्थ, व्यवस्थापन खर्च, वितरण खर्च तसेच विक्रीनंतरची सेवा आणि मुद्रांक (स्टॅम्पिंग) इत्यादी कायदेशीर प्रक्रियेसाठीचा आवश्यक खर्च. आता वस्तू आणि सेवाकराचा अर्थात जीएसटीचा खर्च राहिला नसला तरी पॉलिसी स्टॅम्पिंग आणि इतर प्रकारचे अनेक खर्च विमा कंपन्यांना असतात. हे खर्च अर्थातच दोन प्रकारे मोजले जातात. पहिला म्हणजे प्रत्येक पॉलिसीमागे झालेला सरासरी खर्च. यात दोन प्रकार असतात, एक म्हणजे नवीन विमा पॉलिसी आणि जुन्या विमा पॉलिसी. यापैकी नवीन पॉलिसींवरील पहिल्या वर्षाचा खर्च हा जास्त असतो आणि जुन्या पॉलिसींवरील ‘रिन्युअल एक्सपेन्स रेशो’ हा कमी असतो. त्यामुळे पॉलिसीची संख्या जितकी अधिक तितका या सरासरी खर्चाचा बोजा कमी. विमा क्षेत्रातला पॉलिसी संख्या घटक किती महत्त्वाचा आहे, हे यावरून दिसून येते. या क्षेत्रात पॉलिसी संख्यामध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) कायमच आघाडीवर असते.
सरासरी खर्च मोजण्याची दुसरी पद्धत म्हणजे, विमा हप्त्याशी असलेले त्याचे प्रमाण. प्रत्येक पॉलिसीमागे साधारणपणे किती विमा हप्ता गोळा होतो याचे खर्चाशी असलेले गुणोत्तर हेही तपासले पाहिजे. तक्ता क्रमांक दोन पाहा. या गुणोत्तरात भारतीय आयुर्विमा महामंडळ हे खासगी कंपन्यांच्या पुष्कळच मागे आहे, असे वाटते. मात्र प्रत्यक्षात खोलात जाऊन पाहिले असता एलआयसीचा व्यवस्थापन खर्च कमी असून आयुर्विमा पॉलिसीची संख्या मात्र प्रचंड मोठी आहे.
तक्ता क्र.२
याशिवाय विमा हप्ता ठरवताना इतरही अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. जसे की, धूम्रपान करणारे आणि न करणारे यांचा विमा हप्ता वेगवेगळा असतो. कित्येकदा महिला आणि पुरुष असेही वर्गीकरण होते, हे झाले ढोबळमानाने. पण वैयक्तिक हप्ता हा इतर अनेकही गोष्टींवर अवलंबून असतो. तुमची शारीरिक क्षमता, आरोग्य हेही त्यात महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर सवयी आणि व्यवसाय याचाही विचार केला जातो. जोखमीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अनेकदा जास्त हप्ता द्यावा लागतो. उदा. खाण कामगार, पाणबुडीवर काम करणारे, महामार्गावर वाहतुकीसंदर्भात काम करणारे, वाहनचालक इत्यादी. तसेच काही बाबतीत आयुर्विमा हप्ता जीवनशैलीमुळे बदलतो. आज जरी मधुमेह आणि रक्तदाब हे अगदी सर्व दूर पसरलेले असले तरी एखादा नुसता मधुमेही, दुसरा मधुमेह आणि जास्त वजन लठ्ठ असलेला, तिसरा या दोन्हीबरोबरच अधून-मधून का होईना पण मद्यपान करणारा या तिघांचेही वर्गीकरण जोखमीच्या स्तरावर वाढत जाते. एवढेच नव्हे तर ही जोखीम आयुर्विमा कंपनीला पुढील अनेक वर्षांसाठी घ्यायची असते, त्याप्रमाणे हप्ता ठरतो.
ज्या विमा योजना कंपनीच्या नफ्यामध्ये सहभागी असतात किंवा ज्यांच्यामध्ये बोनस दिला जातो त्यांचा हप्ता ठरवताना त्याच्यावर हे लोडिंगही केले जाते.
भविष्यातील व्याजदर एका ठरावीक प्रमाणात गृहीत धरून हा हप्ता ठरवला जातो. वयानुसार मृत्युदर, वैयक्तिक जोखीमच्या बाबी याबरोबरच हप्ता हा आणखी एका घटकावरही अवलंबून असतो. तो घटक म्हणजे बंद पडणाऱ्या विमा योजना आणि मुदतीआधीच सोड किंमत द्याव्या लागणाऱ्या योजना.
कुठल्याही व्यवसायात ज्याप्रमाणे काही सामान हे खराब होईल किंवा तुटेल, फुटेल, अंगावर पडेल हे गृहीत धरून संपूर्ण किंमत आकारावी लागते. तसाच हा प्रकार आहे. ज्याला इंग्रजीत ‘लॅप्स अँड सरेंडर सपोर्टेड प्राइसिंग’ म्हणतात. अलीकडेच विमा नियामक महामंडळाने एक वर्षानंतर बंद पडलेल्या पॉलिसींना सोड किंमत द्यावी असा नियम आणला आहे. या नियमामुळे सर्व कंपन्यांचे विमा हप्ते वाढले हे आपल्याला आठवत असेलच. शेवटी विमा व्यवसाय हा संख्याशास्त्रातील मोठ्या संख्येचा सिद्धांत म्हणजे ‘लॉ ऑफ लार्ज नंबर’ यानुसार काम करत असतो. त्यानुसार जोखीम ही अनेक स्तरांवर विभागली जाते. यातील सर्वसामान्यांच्या पटकन लक्षात न येणारा मुद्दा म्हणजे, सर्व आयुर्विमा कंपन्या एका ठरावीक रकमेवरील विमा हा ‘री इन्शुरन्स’ कंपन्यांकडे जोखीम हस्तांतरित करत असतात. यासाठी म्युनिक री, जीआयसी री, स्विस री अशा अनेक कंपन्या कार्यरत असतात. याकरिता आयुर्विमा कंपन्यांकडून त्यांना दिला जाणारा हप्तादेखील आपण देत असलेल्या विमा हप्त्याचा एक भाग असतो. या सर्व संख्याशास्त्र, अर्थशास्त्र, ॲक्च्युरियल विश्लेषण यावर आधारित विमा हप्ता हा कमी किंवा जास्त नसून घेत असलेल्या जोखमीशी संलग्न असतो.