जानेवारीत ट्रम्प यांनी सत्ताग्रहण केल्यापासून, अमेरिकेला पहिल्या स्थानावर आणण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. मात्र त्यासाठी ज्या काही आर्थिक उपाययोजना त्यांनी केल्या, त्यात जग भरडलं गेलं आहे. आयात शुल्क, व्हिसा शुल्क वाढ अशा विविध कारणांनी जगात ट्रम्प यांची प्रतिमा मलिन तर झालीच पण देशांतर्गत, जनतेच्या विविध आंदोलनातून जनतेच्या रोषास सामोरे जावे लागले.
गेल्या वर्षीपर्यंत जगाचा तारणहार, शांतीदूत असे आपल्या प्रतिमेचे संवर्धन, जपणूक करणारा, आपल्या अ(न)र्थ नीतीने अवघ्या ११ महिन्यांत ‘नायक नहीं, खलनायक हु मैं!’ पर्यंत वाटचाल करता झाला. याची प्रत्यक्ष कबुली ते स्वतःच वेळोवेळी देतातदेखील. १० नोव्हेंबरच्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी स्वतःच सांगितलं की, मी भारतीयांच्या मनातून उतरून गेलेलो आहे, पण मी त्यांना खूश करण्यासाठी नवीन व्यापार धोरण लवकरच आणत आहे. हे ऐकल्यावर तसेच बिहार विधानसभा निवडणुकीचा सत्ताधारी पक्षाला सुखद धक्का ठरलेला प्रत्यक्ष निकाल पाहता, ‘आज कल पाँव जमीं पर नहीं पडते मेरे’ असं म्हणत, निफ्टीची पुन्हा तेजीची वाटचाल सुरू झाली आहे.
गेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे, निफ्टी निर्देशांकावर २५,५०० हा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर आहे. या स्तरावर टिकल्यास निफ्टी निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य २५,७०० ते २५,८०० असेल. जे सरलेल्या सप्ताहात साध्य झाले. येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांकाला २६,१०० च्या स्तरावर भरभक्कम अडथळा असून २५,८०० ते २६,१०० या परिघामध्ये पायाभरणी केल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य २६,३००, २६,५००, २६,८०० असे असेल.
चिकित्सा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ संकल्पनेची
हल्ली कामाच्या धकाधकीत गुंतवणूकदारांना इच्छा असूनही आपल्या समभाग संचाकडे (पोर्टफोलिओकडे) लक्ष्य द्यायला वेळ मिळत नाही, अशातच कंपन्याचे तिमाही वित्तीय निकाल या महत्त्वाच्या वळणबिंदूदेखील दुर्लक्षित राहतात. तथापि हल्ली होतं काय की, कंपनीचे तिमाही वित्तीय निकाल नितांत सुंदर असतात, पण निकाल जाहीर झाल्यावर त्या कंपनीचा भांडवली बाजारातील समभागाचा भाव गडगडतो. याच्या बरोबर उलट जाहीर झालेला वित्तीय निकाल निराशाजनक पण भांडवली बाजारातील समभागाच्या किंमतीत तात्पुरती आणि अल्प-स्वल्पशी घसरण होऊन नंतर भरीव सुधारणा दिसून येते.
मग खरं काय? या गोंधळाच्या परीस्थितीत गुंतवणूकदारांच्या पैशांची हेळसांड होऊ नये म्हणून गुंतवणूकदारांसाठी तांत्रिक विश्लेषण (टेक्निकल ॲनालिसिस) , मूलभूत विश्लेषण (फंडामेंटल ॲनालिसिस) यामधील सोनेरी संकल्पना (गोल्डन रूल) एकत्र करून, त्यावर अभ्यास करून गुंतवणूकदारांसाठी साधी, सोपी अशी ‘निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ ही संकल्पना विकसित केली.
प्रत्यक्ष निकालानंतर समभागाचा बाजारभाव ‘महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तराच्या वर’ पाच दिवस टिकल्यास जाहीर झालेला निकाल चांगला, तो समभाग राखून ठेवावा अथवा अल्पमुदतीसाठी खरेदी करून नमूद केलेले वरचे लक्ष्य साध्य झाल्यावर नफारूपी विक्री करावी. निकालानंतर समभागाचा भाव ‘महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तर’ राखण्यास अयशस्वी ठरल्यास, समभागाच्या खरेदीपासून काही काळ दूर राहावे.
गुंतवणूकदारांसाठी विकसित केलेली ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर संकल्पना’ काळाच्या कसोटीवर उतरली का? व त्याची चिकित्सा हा ‘सूर्य हा जयंद्रथ’ या न्यायाने होणे गरजेचे आहे. त्यासाठी या स्तंभातील ६ ऑक्टोबरच्या लेखात ‘माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील’ आघाडीची ‘पर्सिस्टंट सिस्टिम लिमिटेड’ या कंपनी समभागाचा निकालपूर्व आढावा घेतला होता. तिमाही वित्तीय निकालाची नियोजित तारीख ही १४ ऑक्टोबर होती. ३ ऑक्टोबरचा बंद भाव ५,०७० रुपये होता व निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर ४,८०० रुपये होता.
जर निकाल उत्कृष्ट असेल तर ४,८०० रुपयांचा स्तर राखत ५,५०० रुपयांचे वरचे लक्ष्य सूचित केले होते. प्रत्यक्ष निकालानंतर ४,८०० रुपयांचा स्तर राखत ५,५०० रुपयांचे वरचे लक्ष्य १५ ऑक्टोबरला समभागाने साध्य केले. अत्यल्प मुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांना त्याने ८ टक्क्यांचा परतावा दिला. तर दीर्घ मुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांसाठी ४,८०० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखत असल्याने समभाग राखून ठेवण्याची निश्चिंतता त्याने मिळवून दिली. पर्सिस्टंट सिस्टिम लिमिटेड समभागाचा १४ नोव्हेंबरचा बंद भाव ६,१०१ रुपये आहे.
(क्रमशः)
(लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत. ई-मेल: ashishthakur1966@gmail.com)
अस्वीकृती:- शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टाॅप लाॅस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
