कोजागरी पौर्णिमेच्या तेजस्वी पण शांत चंद्रबिंबाच्या आल्हाददायक प्रकाशाचा आप्तमित्रांसह आस्वाद घेताना, आपल्यापैकी अनेकांना (आजकालच्या बाजार आवर्तनाच्या पार्श्वभूमीवर) आपली गुंतवणुकीही अशीच स्थिर आणि निवांत कधी असेल का, असा प्रश्न नक्कीच पडेल! ‘माझ्यासाठी सही ठरशील?’ असे आपल्या स्तंभाचे शीर्षक असल्याने या विषयावर मला लिहिणे आवश्यक वाटले. आज आपण असे काही म्युच्युअल फंड प्रकार पाहणार आहोत, जे त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे सदाहरित ठरू शकतात आणि आपल्याला शरदाच्या चांदण्यासारखी सुखानुभूती देऊ शकतात. हे पर्याय पोर्टफोलिओमधील जोखीम पातळीच्या क्रमाने जास्त ते कमी अशा प्रकारे मांडले आहेत.
१) फ्लेक्सीकॅप फंड
फ्लेक्सीकॅप कोणत्याही जोखीम प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी योग्य ठरतात. कारण निधी व्यवस्थापकावर किमान मालमत्ता विशिष्ट कंपनी प्रकारात (लार्ज, मिड, स्मॉल) गुंतविण्याचे बंधन नसते. फक्त एकूण मालमत्तेच्या किमान ६५ टक्के मालमत्ता समभागसंलग्न गुंतवणूक साधनात असावी, हे बंधन आहे. निधी व्यवस्थापक बाजाराच्या परिस्थितीनुसार लार्ज, मिड, स्मॉल यांच्यातील वाटप बदलतो. उदाहरणार्थ, स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये मूल्यांकन वाढवल्यावर लार्जकॅपमध्ये जाणे किंवा जेथे भविष्यात भांडवली लाभ मिळू शकेल, अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढवतो. म्हणून, बदलत्या बाजार गतिमानतेसह पोर्टफोलिओ संरेखित करण्याची गुंतवणूकदाराला गरज भासत नाही. लार्जकॅपची मात्रा फ्लेक्सीकॅपमध्ये मल्टिकॅप फंडांपेक्षा अधिक असल्याने घसरणीच्या काळात मुदलाचे कमी नुकसान होते.२) मल्टीकॅप फंडमल्टीकॅप फंडात किमान २५ टक्के गुंतवणूक नेहमीच प्रत्येकी लार्ज, मिड आणि स्मॉलकॅपमध्ये राखण्याचे बंधन आहे. उर्वरित २५ टक्के गुंतवणूक निधी व्यवस्थापकाला आपल्या मर्जीने करता येते. हे त्रिभाजन पोर्टफोलिओचे वैविध्य अधोरेखित करते. तथापि, फ्लेक्झीकॅपच्या तुलनेत मिड आणि स्मॉलकॅपचे प्रमाण मल्टीकॅपमध्ये जास्त असल्याने फ्लेक्झीकॅपच्या तुलनेत अस्थिर असतात आणि तेजीत चांगले परतावे देणारे मानले जातात. परंतु हा फंड गट मंदीदरम्यान जास्त अस्थिर असतो.
३) लार्ज आणि मिडकॅप फंड
या फंड गटासाठी लार्जकॅप आणि मिडकॅपमध्ये प्रत्येकी किमान ३५ टक्के गुंतवणूक करणे सक्तीचे आहे. लार्जकॅप पोर्टफोलिओला स्थैर्य, तर मिडकॅप वृद्धी प्रदान करतात. स्थैर्य आणि वृद्धी यांचे संतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न असतो. सामान्यतः, हे फंड लार्ज-कॅप फंडांच्या तुलनेत अधिक परतावा देतात आणि मिडकॅप फंडांच्या तुलनेत काहीसे कमी अस्थिर असतात.
४) साहसी इक्विटी हायब्रीड (अग्रेसिव्ह इक्विटी हायब्रिड)
साहसी हायब्रिड ६५-८० टक्के इक्विटीमध्ये आणि उर्वरित रोख्यांत गुंतवणूक करतात. अनिवार्य रोखे गुंतवणूक शुद्ध इक्विटी फंडांच्या तुलनेत अस्थिरता कमी करतो. परंतु तरीही हा फंड गट दीर्घकालीन वृद्धिक्षम असतो. अनेक पहिल्यांदाच गुंतवणूक करणारे किंवा मध्यम-जोखीमांक असलेल्या गुंतवणूकदारांसाठी, म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू करण्याचा हा तर्कशुद्ध प्रारंभिक बिंदू आहे.
५) इक्विटी सेव्हिंग फंड (ईएसएस)
या योजना तीन घटकांचे मिश्रण करतात – अनहेज्ड इक्विटी, आर्बिट्राज (हेज्ड इक्विटी) आणि रोखे. हे मिश्रण अस्थिरतेला लक्षणीयरीत्या कमी करते (अर्थातच कमी परतावा देऊन), हा फंड गट इक्विटीसारखा कर कार्यक्षम असतो, कारण एकूण इक्विटी गुंतवणूक ६५ टक्क्यांपेक्षा अधिक असते. कर-कार्यक्षम, स्थिर-परतावा आणि इक्विटी गुंतवणूक असे तीन फायदे या फंडाच्या गुंतवणुकीतून मिळतात.
६) बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज / डायनॅमिक ॲसेट ॲलोकेशन फंड
या फंडांची गुंतवणूक व्यवस्थापित करण्याचे प्रत्येक फंड घराण्याचे स्वत:चे एक प्रारूप (मॅाडेल) असते. हे प्रारूप वापरून गुंतवणुकीत इक्विटीचे प्रमाण बदलत्या परिस्थितीनुसार कमी-अधिक होत असते. काही फंड घराणी मालमत्तेचे संतुलन आठवड्यातून दोन वेळा, तर काही आठवड्यातून एकदा करतात. कर कार्यक्षमता साधण्यासाठी समभाग अधिक डेरिव्हेटिव्हचे प्रमाण ६५ टक्के राखतात. मोठ्या आर्बिट्रेज आणि रोखे घटकामुळे, परतावा सामान्यतः इक्विटी फंडांपेक्षा कमी परंतु अस्थिरतासुद्धा कमी असते. परंतु जोखीम-परतावा गुणोत्तरात हे फंड सरस असतात.
७) कंझर्व्हेटिव्ह डेट हायब्रीड
हे फंड ७५-९०टक्के मालमत्ता रोख्यांत आणि शिल्लक इक्विटीमध्ये गुंतवणूक करतात. मालमत्तेचा मोठा वाटा रोख्यांत असल्याने गुंतवणुकीला स्थैर्य आणि एक लहान वाटा समभाग गुंतवणुकीत असल्याने महागाईपेक्षा थोडा अतिरिक्त परतावा मिळू शकतो. निवृत्तीच्याजवळ असलेल्या गुंतवणूकदारांसाठी किंवा मुद्दल संरक्षणाला प्राधान्य देणाऱ्यांसाठी हा चांगला फंड प्रकार आहे.
८) मल्टी-ॲसेट ॲलोकेशन फंड
हे फंड किमान आपली गुंतवणूक तीन मालमत्ता वर्गांमध्ये – इक्विटी, कर्ज आणि जिन्नस (जसे की सोने किंवा चांदी) – प्रत्येकी किमान १० टक्के अशी विभागतात. कारण या वर्गांत व्यस्त सहसंबंध (को-रिलेशन) असतो. साहजिकच या मालमत्ता एकदम घसरत नाहीत किंवा वाढत नाहीत. (जसे की सोने आणि समभाग). मल्टी ॲसेट फंड बहुतेकदा मंदीच्या काळात त्यांच्या रोखे आणि जिनसांमुळे चांगली कामगिरी करतात. ते शुद्ध इक्विटी फंडांपेक्षा लक्षणीयरीत्या कमी जोखीम घेतात.
९) पॅसिव्ह ॲसेट ॲलोकेटर फंड ऑफ फंड (एफओएफ)
हे एफओएफ इक्विटी, डेट आणि सोन्यामध्ये अंतर्निहित इंडेक्स फंड किंवा ईटीएफमधून गुंतवणूक करतात. त्यांचे वाटप पूर्वनिर्धारित नियमांनुसार (सक्रिय निर्णय कॉलशिवाय) आपोआप बदलत असते. पारदर्शकता, कमी खर्च आणि स्वयंचलितपणे पुनर्संतुलन (ऑटो-रिबॅलन्सिंग ) पसंत करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी, हे ‘फिल इट-शट इट अँड फॉरगेट इट’ सदाबहार पर्यायांपैकी एक आहेत.
१०) एनपीएस (राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना) – ऑटो चॉइस
जरी म्युच्युअल फंड नसला तरी राष्ट्रीय निवृत्ती वेट योजना (एनपीएस) एक सदाबहार निवृत्ती नियोजन साधन म्हणून उल्लेखनीय आहे. यात वयानुसार समभाग गुंतवणूक हळूहळू कमी होते आणि सरकारी रोखे आणि कॉर्पोरेट रोख्यांचे प्रमाण वाढते. जोखीम क्षमतेनुसार वेगवेगळे ट्रॅक (ॲग्रेसिव्ह एलसी७५, मॉडरेट एलसी५०, कंझर्व्हेटिव्ह एलसी२५) आहेत. निवृत्तीच्या वेळी, किमान ४० टक्के निधी वार्षिकी (ऍन्युइटी) खरेदी करण्यासाठी गुंतवावा लागतो, ज्यामुळे मासिक पेन्शन मिळते. उर्वरित रक्कम एकरकमी किंवा टप्प्याटप्प्याने काढता येते.
११) पीपीएफ (सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी)
शेअर बाजाराबाहेरील एक खरा दीर्घकालीन सदाहरित पर्याय आहे. सरकारच्या पाठिंब्याने, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफ सध्या कलम ‘८० सी’अंतर्गत पूर्णपणे करमुक्त असे सुमारे ७.१ टक्के व्याजदर देते. १५ वर्षांच्या मुदतपूर्ती कालावधी (लॉक-इन) सह परताव्याची हमी आणि जोखीम-मुक्त वाढ शोधणाऱ्या रूढीवादी गुंतवणूकदारांसाठी हा पर्याय विशेषतः आकर्षक आहे.
पुनर्संतुलनासाठी उपयुक्त नियमबदलः
भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने अलीकडेच काही नियम कडक केले आहेत. पोर्टफोलिओ वाटप मर्यादेबाहेर गेले (उदा. मल्टी-कॅपमध्ये मिड-कॅप २५ टक्क्यांखाली आले) तर मालमत्ता व्यवस्थापन कंपनीला (एएमसी) ७ व्यावसायिक दिवसांत पुन्हा संतुलन करणे बंधनकारक आहे (पूर्वी १ महिना मिळत होता). हा नियम इक्विटी, हायब्रिड आणि मल्टी-ॲसेट सर्वांवर लागू आहे. पॅसिव्ह ॲसेट अलोकेटरसाठी हा बदल विशेष फायदेशीर आहे, कारण त्यांच्या गुंतवणूकदारांना मालमत्ता वाटप कठोरपणे नियमबद्ध राहण्याची अपेक्षा असते. फंड आपल्या वैशिष्ट्याशी प्रामाणिक राहतील याची गुंतवणूकदारांना खात्री करून हा बदल सदाहरित वचनाला बळकटी देतो.
निष्कर्ष
इक्विटीमध्ये गतिमानपणे समायोजित होणाऱ्या फ्लेक्सी-कॅपपासून आणि विविध वर्गांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मल्टी-ॲसेट आणि पॅसिव्ह ‘एफओएफ’पासून अगदी लोकप्रिय ‘पीपीएफ’पर्यंत भारतीय गुंतवणूकदाराकडे कोजागिरी रात्रीच्या पौर्णिमेसारख्या शांत पर्यायांची कमतरता नाही. तुमची जोखीम घेण्याची क्षमता आणि गुंतवणुकीचा कालावधी यानुसार आपण योग्य निवड करू शकता. या कोजागरी पौर्णिमेला, तुमच्या पोर्टफोलिओलाही कायमस्वरूपी समृद्धीचा शांत, स्थिर प्रकाश लाभो.