मी म्युच्युअल फंडमध्ये गेल्या पाच वर्षापासून गुंतवणूक करतो आहे. दरवर्षी माझी गुंतवणूक किती टक्क्यांनी वाढली, हे माझा एजंट मला कळवतो. पण मी ज्या फंड योजनेत पैसे गुंतवले आहेत, त्याविषयी मला स्वतःला माहिती कुठून घेता येईल?

उत्तर – तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमध्ये तुम्हाला म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी यापेक्षा फंडात गुंतवणूक केलेली असून आता ती कशी वाढते आहे? किंवा त्यात नुकसान होते आहे का हे समजून घ्यायचे आहे असे लक्षात येते आहे.

एखादा फंड मागची पाच वर्ष उत्तम परतावा देतो आहे, म्हणून त्यात आपण पैसे गुंतवायचे नसतात. म्युच्यअल फंडात आपण जेव्हा पैसे गुंतवतो त्यावेळी आपल्याला किती वर्षासाठी पैसे ठेवायचे आहेत व आपली जोखीम घेण्याची तयारी किती आहे, या अनुषंगाने गुंतवणूक नियोजन केले पाहिले.

डिजिटल तंत्रज्ञानामुळे आता आपल्या गुंतवणुकीचा मागोवा घेणे अगदी सहज शक्य झाले आहे. तुम्ही ज्या फंडात पैसे गुंतवले आहेत, ते नेमके कशाप्रकारे आणि कुठे गुंतवले जात आहेत ? याविषयी संपूर्ण माहिती प्रत्येक महिन्याच्या अखेरीस म्युच्युअल फंड कंपन्यांना आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी लागते. यालाच ‘फॅक्ट शीट’ असे म्हणतात.

‘फॅक्ट शीट’ म्हणजे काय ?

फॅक्ट म्हणजे तथ्य ! तुमच्या गुंतवणुकीचे सर्व तपशील तुम्हाला ज्या पत्रकातून मिळतात ती फॅक्ट शीट. प्रत्येक म्युच्यअल फंड कंपनीच्या संकेतस्थळावर ही सुविधा मोफत उपलब्ध करून दिलेली असते. जर तुम्ही फंडाच्या ऑफिसमध्ये गेलात तर तुम्हाला त्याची प्रत वाचायला सुद्धा मिळवता येते.

फॅक्ट शीटमध्ये नेमके काय समजते ?

आपण जे पैसे म्युच्युअल फंड योजनेत गुंतवतो ते कुठे गुंतवायचे? याचा निर्णय निधी व्यवस्थापक आणि त्याचे संशोधक सहकारी घेत असतात. फॅक्ट शीटमध्ये तुमच्या निधी व्यवस्थापकाचे नाव आणि तो किती वर्षांपासून निधी व्यवस्थापित करत आहे आणि त्याचा एकूण या क्षेत्रातला अनुभव किती आहे, हे स्पष्टपणे लिहिलेले असते. त्यानंतर त्या फंडात किती रुपये गुंतवणूक केली गेली आहे (Assets Under Management) याची आकडेवारी असते.

फंडाने गुंतवणूकदारांकडून जमा केलेले पैसे कोणत्या कंपनीच्या शेअरमध्ये / सिक्युरिटीजमध्ये गुंतवले आहेत? याची तपशीलवार यादी तक्त्याच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळते. यात दोन प्रकारे माहितीचा अभ्यास करता येतो.

एकूण गुंतवणुकीपैकी आघाडीच्या दहा शेअरमध्ये किती रक्कम गुंतवली आहे? म्हणजेच टॉप टेन होल्डिंग पोर्टफोलिओमध्ये एकूण किती शेअरचा समावेश केला गेला आहे? काही निधी व्यवस्थापक आपल्या पोर्टफोलिओत गरजेनुसार शेअरची संख्या कमी-जास्त करतात. हा त्या निधी व्यवस्थापकाचा आणि फंड घराण्याचा निर्णय असतो. म्हणजे एखाद्या फंड योजनेत ३५ शेअर असू शकतात तर त्याच प्रकारच्या दुसऱ्या फंडात ७०-८० शेअरसुद्धा असू शकतात !

यापुढे एक महत्त्वाची माहिती आपल्याला मिळते ती म्हणजे तुमच्या फंडाने कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे? याचा स्पष्ट उल्लेख तक्त्याच्या किंवा आकृतीच्या मदतीने केलेला असतो. वाहन निर्मिती, रसायने, भांडवली वस्तू, संरक्षण, ग्राहकोपयोगी वस्तू (एफएमसीजी), बँका, वित्तीय संस्था, सेवाक्षेत्र या किंवा आणखी कोणत्या क्षेत्रात किती टक्के पोर्टफोलिओमधील गुंतवणूक आहे, यावरून फंडाचा कल आपल्याला स्पष्ट होतो.

जर फंड फ्लेक्झिकॅप किंवा मल्टीकॅप किंवा मल्टीऍसेट अलोकेशन या प्रकारचा असेल तर गुंतवणुकीपैकी किती टक्के शेअर लार्ज कॅप, मिडकॅप किंवा स्मॉल कॅप प्रकारात आहेत ? याचे गणित आपल्याला कळते. फंडाच्या उद्देशानुसार जर निधी व्यवस्थापकाने शेअरमध्ये असलेली गुंतवणूक कमी करून डेट अर्थात रोखेसंलग्न साधनांमध्ये गुंतवणूक वाढवली असेल किंवा सोन्यामधील गुंतवणूक वाढवली असेल तर त्याचाही अंदाज आपल्याला येतो.

काही वेळा फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये महत्त्वाचे बदल घडून येतात त्यावेळी तशी माहितीसुद्धा दिली जाते. म्हणजेच फंडाने गेल्या दोन-तीन महिन्यात कुठले शेअर पूर्णपणे विकून पोर्टफोलिओ नवीन शेअर घेतले आहेत का याचीही माहिती मिळते. काही फंड कंपन्या आपल्या फॅक्टशीटमध्ये शेअरमधील मागील महिन्यातील गुंतवणूक किती टक्के होती हे कंसात देतात. उदाहरणार्थ एचडीएफसी बँक तीन टक्के (२.४ टक्के) याचा अर्थ मागच्या महिन्यापेक्षा या महिन्यात पोर्टफोलिओत एचडीएफसी बँक या शेअरचा हिस्सा वाढला आहे.

आजकाल समाजमाध्यमे अधिक प्रभावी ठरत असल्यामुळे बहुतांश कंपन्यांचे यूट्यूब अकाउंटसुद्धा आहेत. त्यावरून गुंतवणूकदारांसाठी फंडविषयक माहिती देणारे व्हिडीओसुद्धा प्रसारित केले जातात.

फंडातील जोखीम

याव्यतिरिक्त फंडविषयक आणखी महत्त्वाची माहिती आपल्याला फॅक्टशीटमध्ये बघायला मिळते ती म्हणजे जोखीम आणि फंडाच्या स्थिरतेबाबतचे गुणोत्तर. अल्फा, बीटा आणि शार्प या तीन आकडेवारीवरून फंड किती स्थिर आहे याचा अंदाज येतो, अर्थात हा थोडा सखोल अभ्यास झाला.

दर महिन्याला म्युच्युअल फंड कंपन्यांकडून शेअर बाजाराचा महिन्याचा आढावा घेणारे माहितीपत्रक (न्यूज लेटर) प्रसारित केले जाते. आपल्याला पोर्टफोलिओविषयक शंका आहे आणि त्यासंबंधी सहज माहिती उपलब्ध नाही हे दिवस आता संपले आहेत! गरज आहे ती गुंतवणूकदारांनी दोन पावले पुढे जाऊन अभ्यास करण्याची.