प्रवीण देशपांडे
देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. वैद्यकीय सुविधा, सुधारित राहणीमान यामुळे आयुष्यमान वाढत आहे. वाढती महागाई, घटते व्याजदर, वाढता वैद्यकीय खर्च यामुळे ज्येष्ठ नागरिकांना प्रपंच करणे कठीण होत आहे. तसेच छोटे कुटुंब, परदेशात शिक्षणासाठी गेलेली आणि तेथेच स्थायिक झालेली मुले यामुळे बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना एकटे राहावे लागते. त्यांना मदत करण्यासाठी सरकारने अनेक योजना अमलात आणल्या आहेत जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी विमा, बचत योजना, वगैरे योजना आहेत. त्यांच्याकडे जास्त पैसा खेळता राहावा म्हणून प्राप्तिकर कायद्यात काही विशेष तरतुदी आहेत. इतर नागरिकांना मिळणाऱ्या सवलतीपेक्षा जास्त सवलती ज्येष्ठ नागरिकांना आहेत. त्यांना कायद्याच्या अनुपालनात सुद्धा काही सवलती दिलेल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्येष्ठ नागरिक कोणाला म्हणतात?

प्राप्तिकर कायद्यानुसार ज्येष्ठ नागरिक दोन प्रकारात विभागले आहेत. एक म्हणजे ज्या नागरिकांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे आणि ८० वर्षांपेक्षा कमी आहे असे ज्येष्ठ नागरिक आणि दुसरे म्हणजे अति ज्येष्ठ नागरिक, ज्यांचे वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे.

नागरिक ‘ज्येष्ठ’ कधी होतो?

करदात्याने आर्थिक वर्षात (त्या वर्षात कोणत्याही दिवशी) ६० वर्षे पूर्ण केली असतील तर तो त्या वर्षापासून ज्येष्ठ नागरिक होतो. परंतु केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने जुलै, २०१६ मध्ये जारी केलेल्या परिपत्रकानुसार ज्यांचा ६० वा वाढदिवस १ एप्रिल रोजी येतो त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण आदल्या दिवशी म्हणजे ३१ मार्च रोजी पूर्ण झाल्यामुळे त्या करदात्याला ज्येष्ठ नागरिकाचा दर्जा ३१ मार्च रोजी संपलेल्या वर्षात मिळतो.

आणखी वाचा-Money Mantra: ज्योती सीएनसी कंपनीचा आयपीओ येतोय; जाणून घ्या सर्वकाही

कमाल करमुक्त उत्पन्नाची मर्यादा काय आहे?

कमाल करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ लाख रुपये आणि अतिज्येष्ठ नागरिकांसाठी ५ लाख रुपये इतकी आहे. ही सवलत फक्त निवासी भारतीयांसाठीच आहे. करदाता अनिवासी भारतीय असेल आणि तो ज्येष्ठ किंवा अतिज्येष्ठ नागरिक असला तरी त्याच्यासाठी कमाल करमुक्त उत्पन्नाची मर्यादा २,५०,००० रुपये इतकीच आहे. ही मर्यादा जुनी करप्रणाली स्वीकारणाऱ्या करदात्यांसाठी आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षापासून नवीन करप्रणाली ही मूलभूत करप्रणाली आहे. अति-ज्येष्ठ नागरिक नवीन करप्रणालीनुसार कर भरणार असतील तर त्यांना ५ लाख रुपयांची कमाल करमुक्त उत्पन्नाची मर्यादा लागू होणार नाही. त्यांना इतर नागरिकांप्रमाणे ३ लाख रुपयांची कमाल करमुक्त उत्पन्नाची मर्यादा असेल.

वैद्यकीय खर्चाच्या अतिरिक्त वजावटी

वय वाढल्यानंतर वैद्यकीय उपचारांची जास्त गरज भासते आणि यावर होणाऱ्या खर्चात सुद्धा वाढ होते. मेडिक्लेम विमा असेल तर अशा खर्चाची भरपाई होते. कलम ८० डी नुसार करदात्याला मेडिक्लेम विमा हफ्त्याची २५,००० रुपयांपर्यंतची वजावट घेता येते. हा विमा ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल तर त्याची मर्यादा ५०,००० रुपये इतकी आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांनी मेडिक्लेम विमा घेतलेला नाही अशांसाठी ५०,००० रुपयांपर्यंतच्या केलेल्या वैद्यकीय खर्चाची वजावट उत्पन्नातून घेता येते. ही कलम ८० डी नुसार वैद्यकीय खर्चाची वजावट फक्त निवासी ज्येष्ठ नागरिकांनाच मिळते. या कलमानुसार उत्पन्नातून वजावट घेण्यासाठी हा खर्च रोखीने केल्यास या खर्चाची वजावट मिळत नाही.

ज्या निवासी भारतीयांनी स्वतःच्या किंवा त्यांच्यावर अवलंबून असणार्‍या व्यक्तींच्या काही ठराविक रोगांच्या निदानासाठी वैद्यकीय खर्च केला असेल आणि नियमांतर्गत नमूद केलेल्या विशेषज्ञाने त्यांना प्रिस्क्रिप्शन दिले असेल तर त्यांना कलम ८० डी.डी.बी अंतर्गत ४०,००० रुपयांपर्यंतच्या खर्चाची वजावट उत्पन्नातून मिळते. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही खर्चाची मर्यादा एक लाख रुपये इतकी आहे. या खर्चाची परतफेड, विमा कंपनी किंवा करदाता नोकरदार असेल आणि त्याच्या मालकाने केली असेल तर ही परतफेडीची रक्कम वजावटीतून कमी होते.

आणखी वाचा-Money Mantra : घरभाडे भत्ता करमुक्त करुन घेता येतो का?

व्याजावर अतिरिक्त वजावट

ज्येष्ठ नागरिकांना व्याजाच्या उत्पन्नावर अतिरिक्त वजावट मिळते. सामान्य नागरिकांना बचत खात्याच्या व्याजावर १०,००० रुपयांपर्यंतची कलम ८० टी.टी.ए. च्या अंतर्गत वजावट उत्पन्नातून मिळते. ज्येष्ठ नागरिकांना बँकेतून, पोस्ट ऑफीस किंवा सहकारी बॅंकेतून मिळालेल्या व्याजावर ५०,००० रुपयांपर्यंतची, कलम ८० टी.टी.बी. च्या अंतर्गत, वजावट उत्पन्नातून मिळते. ही वजावट फक्त बचत खात्याच्या व्याजावर नसून मुदत ठेवींच्या व्याजावर सुद्धा मिळते. ही सवलत फक्त निवासी भारतीयांसाठीच आहे.

उद्गम करासाठी (टी.डी.एस.) साठी जास्त मर्यादा

उद्गम कर कापला गेला तर ज्येष्ठ नागरिकांची रोकड सुलभता कमी होते आणि करपात्र उत्पन्न नसल्यास फक्त उद्गम कर कापला गेला म्हणून विवरणपत्र दाखल करावे लागते. हा त्रास कमी करण्यासाठी व्याजावर होणार्‍या उद्गम कराची मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त आहे. त्यांना बॅंकेतून, पोस्ट ऑफीस किंवा सहकारी बॅंकेतून मिळणार्‍या ५०,००० रुपयांपर्यंतच्या व्याजावर उद्गम कर कापला जात नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या एकूण उत्पन्नावर देय कर शून्य असेल तरच १५ एच हा फॉर्म ज्येष्ठ नागरिकांना (ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे) देता येतो जेणेकरून त्यांच्या उत्पन्नावर उद्गम कर कापला जाणार नाही. ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या बँकेतील मुदत आणि आवर्त ठेवींवरील व्याज ५०,००० रुपयांपेक्षा जास्त मिळत असल्यास आणि त्याने फॉर्म १५ एच बँकेला सादर केल्यास बँक त्यावर उद्गम कर कापत नाही. ही ५०,००० रुपयांची मर्यादा बँकेतील एक किंवा एका पेक्षा जास्त शाखेतील मुदत आणि आवर्त ठेवींवरील व्याजासाठी आहे.

विवरणपत्र दाखल करण्यापासून मुक्तता

ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वय ७५ वर्षांपेक्षा जास्त आहे, ज्यांना पेन्शन मिळते, ज्या बँकेतून पेन्शन मिळते त्याच बँकेतून व्याज मिळत असेल आणि बँकेने आपला उदगम कर १९४ पी या कलमानुसार कापला असेल तर आपल्याला विवरणपत्र दाखल करावे लागणार नाही. या सर्व अटींची पूर्तता होत असेल तर अशा ज्येष्ठ नागरिकांना विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक नाही. या अटींची पूर्तता न केल्यास विवरणपत्र भरावे लागेल.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What exemptions do senior citizens get under the income tax act mmdc mrj