सकाळी वर्तमानपत्र वाचताना चहा प्यायचा असतो? ‘अहो, लेखक महोदय रात्रीची उतरली नसल्यासारखे, असे काय विचारताय?’ असा तुमचा साहजिक प्रश्न असेल. अर्थात आपला विषय गुंतवणुकीचा असल्यामुळे फार संध्याकाळचे नियोजन वगैरे करू नका. पण गुंतवणुकीचा हा अपारंपरिक मार्ग थोडासा वेगळा असला तरीही विचार करण्याजोगा नक्कीच आहे. ज्यांना या विषयाची जाण आहे किंवा आवड आहे त्यांनी जरूर विचार करावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाइन किंवा व्हिस्कीमध्ये गुंतवणूक करताना तुमचे उद्दिष्ट निश्चित करणे गरजेचे आहे. जसे की, तुम्हाला वाइन फक्त आवडते की गुंतवणुकीसाठी तुम्ही ती विकत घेतली आहे. म्हणजे मग एखादी बाटली कधी उघडून प्यायली तरी काही दुःख वाटून घेऊ नका. कारण तुमचे उद्दिष्ट फक्त एक छंद म्हणून आहे.

हेही वाचा – यवतमाळ : काचेमुळे गोऱ्ह्याची जीभ कापली, पशुवैद्यकीय डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून पुन्हा जोडली

काही दिवसांपूर्वी हा विषय जरा वेगळ्याच कारणाने गाजत होता. वाणसामानाच्या दुकानात वाइन विकण्यास परवानगी देणारा निर्णय आपल्या राज्यात घेण्यात आला होता. मात्र आपण सोन्या-चांदीची आभूषणे विकत घेतो त्याप्रमाणे वाइनदेखील क्रयवस्तूच आहे. शिवाय जुने ते सोने ही म्हण वाइनला पूर्णपणे लागू पडते. परदेशात तर वाइनचे ‘स्टॉक मार्केट’सुद्धा आहेत. मग यात गुंतवणूक करण्यासाठी वाइन कुठून खरेदी कराव्यात याचीदेखील माहिती असावी. जसे की, विमानतळ किंवा परदेशातील चांगली दुकाने. आपल्याकडे नाशिकच्या वायनरी प्रसिद्ध आहेत.

कलात्मक वस्तू किंवा पुरातन नाण्याप्रमाणे वाइन साठवताना काळजी घ्यावी लागते. किती तापमान असावे, सूर्यप्रकाश किती पडावा किंवा अंधारात ठेवावी अशा गोष्टींचा विचार करावा लागतो. सोने-चांदी किंवा शेअर खरेदी करताना याचा विचार करावा लागत नाही. मात्र गेल्या काही वर्षांत विशेषतः परदेशात वाइनमधील गुंतवणूक रोखे किंवा सोन्यातील गुंतवणुकीपेक्षा अधिक फायदेशीर ठरली आहे. भारतात वाइन गुंतवणूक फारशी चलनात नाही. पण यामुळेच यातील गुंतवणूक विशेष परतावा देणारी ठरू शकते. एका अंदाजनुसार, वाइनची एक बाटली म्हणजेच त्यातील जुनी वाइन आतापर्यंत एक कोटी रुपयांपेक्षाही अधिक किमतीला विकली गेली आहे. तेव्हा तुमच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये याचादेखील विचार करायला हरकत नाही. अर्थात कायद्याच्या संमतीत राहूनच तुम्हाला वाइन साठवता येते. प्रत्येक राज्याचे कायदे वेगळे आहेत. महाराष्ट्रामध्ये बॉम्बे प्रोहिबिशन कायद्याअंतर्गत परवाना मिळवावा लागतो अन्यथा दंड किंवा कारावासदेखील होऊ शकतो.

हेही वाचा – “वंचितला ‘इंडिया’मध्ये न घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्रात तिरंगी लढती”, प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांचे विधान, म्हणाले…

परदेशात व्हिस्कीची मागणी जास्त असते आणि चांगल्यात चांगली व्हिस्की परदेशात बनवली जाते. व्हिस्कीचे वैशिष्ट्य म्हणजे ती बरेच दिवस चांगल्या लाकडाच्या पिंपात ठेवली जाते म्हणजे जी प्रक्रिया बनते त्यातून अतिशय सुंदर रसाळ व्हिस्की बनते. म्हणजे गुंतवणूक करताना त्या बाटलीमध्ये गुंतवणूक न करता चक्क पिंपातच गुंतवणूक करतात. म्हणजे आपल्याला जेवढे जास्त दिवस पाहिजे तेवढे दिवस डिस्टिलरीमध्ये ठेवता येते आणि तिचा प्रत्यक्ष ताबा न घेता ती खरेदी किंवा विक्री करता येऊ शकते.

गुंतवणूक करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे याचा बाजार आपल्या देशात संघटित नसल्यामुळे व्यवहार करताना काळजी घ्यावी लागते आणि तुमच्या गुंतवणुकीवरील परतावादेखील अनिश्चित असतो. जेवढी जास्त जोखीम तेवढा जास्त नफा, त्यामुळे प्रत्यक्ष पिऊन होणारी नशा गुंतवणूक करून होणाऱ्या नशेपेक्षा कमी की अधिक हे तुम्हीच ठरवा!

@AshishThatte

ashishpthatte@gmail.com

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When investing in wine or whiskey it is important to determine your goals print eco news ssb