Platinum prices outshine gold and silver rates in 2025 precious metals price rally : सोने आणि चांदीच्या दरांनी या वर्षात वेगळी चमक दाखवली असली तर प्लॅटिनमच्या किंमतींनी विशेष लक्ष वेधून घेतले आहे. प्लॅटिनम या मौल्यवान धातूच्या किंमतीने २०२५ मध्ये आतापर्यंत जवळपास ८० टक्क्यांची उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. या वर्षात सोन्याच्या दरांनी ५१ टक्के आणि चांदिच्या दरांनी ६८ टक्क्यांची वाढ नोंदवली, म्हणजेच प्लॅटिनमने या दोन्हींना मागे टाकले आहे. विशेष म्हणजे २०२५ हे वर्ष मौल्यवांन धातूंसाठी गेल्या सुमारे ५० वर्षांतील सर्वात मजबूत वर्षांपैकी एक ठरले आहे.
दरात मोठी वाढी होऊनही प्लॅटिनम अजूनही त्याच्या रेकॉर्ड उच्चांकांच्या २२५० डॉलर्स प्रति औंस किमतीच्या २८ टक्के कमी दराने ट्रेडिंग करत आहे. प्लॅटिनमने ही विक्रमी दर मे २००८ मध्ये गाठला होता. २०२३ आणि २०२४ मध्ये या धातूची किंमत दर वर्षी ८ टक्क्यांनी घसरली, तर २०२२ मध्ये यामध्ये माफक अशी १० टक्के वाढ झाली होती.
तज्ज्ञांच्या मते प्लॅटिनमच्या दरामध्ये झालेल्या मोठ्या वाढीचे कारण हे मोठी स्ट्रक्चरल पुरवठा तूट (structural supply deficit) आणि त्याबरोबर इंडस्ट्रीयल व गुंतवणुकीच्या मागणीत झालेली मोठी वाढ आहे, जी की तेजी कायम ठेवण्यासाठी अनुकूल बाब ठरली.
“प्लॅटिनम हे फक्त सोन्याची बरोबरी करत आहे. फार जुनी गोष्ट नाही, जेव्हा प्लॅटिनम हे सोन्यापेक्षा महाग होते. आता सोने जवळपास प्लॅटिनमपेक्षा तीन पट जास्त दराने ट्रेड होत आहे. ग्राहक सोन्याऐवजी प्लॅटिनमच्या दागिन्यांकडे वळत असल्याने, दागिन्यांच्या मागणीत बदल दिसत आहे. सध्याच्या खाणी उत्पादन वाढवण्यात अपयशी ठरल्याने पुरवठा देखील मर्यादीत आहे,” असे Pnetree Macroचे संस्थापक रितेश जैन यांनी सांगितले.
प्लॅटिनमच्या उत्पादनावर परिणाम
तज्ज्ञांच्या मते, जगातील सर्वात मोठा उत्पादक असलेल्या दक्षिण आफ्रिकेत पुरवठा साखळीत आलेल्या अनेक अडथळ्यांचा परिणाम म्हणून प्लॅटिनममध्ये झालेली वाढीत आणखी भर पडली. दक्षिण आफ्रिकेत झालेली अतिवृष्टी, वीज पुरवठा खंडीत होणे, पाण्याचा तुटवडा अशा समस्यांमुळे महत्त्वाच्या महिन्यांमध्ये उत्पादन दरवर्षी २४ टक्क्यांनी कमी झाले.
वर्ल्ड प्लॅटिनम इन्व्हेस्टमेंट कौन्सिलच्या मते, जागतिक बाजारपेठेते २०२५ मध्ये अंदाजे ८५०००० औंस तुटीचा सामना करावा लागत आहे, हा सलग तिसऱ्या वर्षी उत्पादनातील तुडवडा आहे. ज्यामुळे बाजारात कायमच असलेला प्लॅटिनमचा तुटवडा अधोरेखित होतो.
मागणीबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहकांचा प्लॅटिनमकडे कल वरचेवर वाढताना दिसत आहे. याचा कॅटालॅटिक कन्व्हर्टर्स आणि ग्रीन टेक्नोलॉजी अशा एकूण औद्यौगिक वापरात ७० टक्क्यांहून अधिक वाटा आहे. सोन्याच्या तुलनेत प्लॅटिनम बऱ्यापैकी कमी किंमतीत मिळत असल्याने चीनने त्याची आयात वाढवली आहे आणि पहिल्या तिमाहीत दागिने उत्पादन २६ टक्क्यांनी वाढवले आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. या सर्व बाबींचा प्लॅटिनमच्या किंमतीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.