RBI MPC Meeting Live : भारतीय रिझर्व्ह बँकेने आज (६ ऑगस्ट) सकाळी १० वाजता त्यांचं चलनविषयक धोरण (मॉनिटरी पॉलिसी) जाहीर केलं आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी यावेळी सांगितलं की आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. याचाच अर्थ रेपो दर ५.५० टक्क्यांवर कायम राहील.

यापूर्वी जून महिन्यात आरबीआयने जाहीर केलेल्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये रेपो दरात ०.५० टक्क्यांची कपात केली होती. तर, एप्रिलमधील पॉलिसीत ०.२५ टक्के कपात करण्यात आली होती. फेब्रुवारी महिन्यातही रेपो दरात घट झाली होती. सलग तीन धोरणांमध्ये रेपो दरांमध्ये घट केल्यानंतर यावेळी आरबीआयने रेपो दर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्जदारांचा अपेक्षाभंग

ज्यांचा गृहकर्जाचा हप्ता चालू आहे ते रेपो दरांत कपात होण्याची वाट पाहत असतात. कारण रेपो दरांत कपात झाल्यास कर्जाचा हप्ता (ईएमआय) कमी होतो. मात्र, यावेळी रेपो दर कमी न झाल्यामुळे कर्जदारांची निराशा झाली आहे.

ऑगस्ट महिन्यात रेपो दरांमध्ये कपात केली जाईल, अशी अपेक्षा अर्थविषयक तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र, आरबीआयने तसं केलेलं नाही. ४ ऑगस्ट रोजी आरबीआयची मॉनिटरी पॉलिसीसंदर्भातील बैठक सुरू झाली होती. तीन दिवसांच्या बैठकीनंतर आज आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बैठकीतील निर्णय जाहीर केले. संजय मल्होत्रा म्हणाले, “केंद्रीय बँकेचं विकासावर लक्ष राहील.” दुसऱ्या बाजूला रेपो दरांत कपात न झाल्यामुळे सध्याचे गृहकर्जदार निराश झाले आहेत. जे लोक पुढील काही दिवसांमध्ये घर किंवा कार खरेदीची तयारी करत होते, त्यांच्या देखील आरबीआयच्या रेपो दरांबाबतच्या निर्णयामुळे अपेक्षाभंग झाला आहे.

आरबीआयने रेपो दरांमध्ये कपात केल्यानंतर बँका गृहकर्ज, कार कर्जासह सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदरांमध्ये कपात करतात. त्यामुळे ग्राहकांसाठी कर्ज घेणं स्वस्त होतं. तर, विद्यमान कर्जदारांचा ईएमआय कमी होतो. यावर्षी आरबीआयने तीन वेळा रेपो रेटमध्ये कपात केली आहे. त्यामुळे गृहकर्ज व कारवरील कर्जाच्या ईएमआयमध्ये तीन वेळा घट झाली आहे. ग्राहकांना, कर्जदारांना ऑगस्टमध्ये देखील रेपो दर कमी होण्याची अपेक्षा होती. परंतु, आरबीआयने सर्वांचा अपेक्षाभंग केला आहे.