माझ्या दोन मित्रांच्या दोन नोकऱ्यांची कथा. एकाने दुसरीकडे नोकरीसाठी अर्ज केला. त्याच्या क्षेत्राचा आवाका लहान आणि स्पर्धा इतकी तीव्र की, त्याने दुसरीकडे अर्ज केलाय, हे त्याच्या ऑफिसमध्ये कळणं मुळीच कठीण नव्हतं. त्यामुळे त्याच्या ऑफिसच्या जवळ असलेल्या ‘त्या’ ऑफिसमध्ये मुलाखत द्यायला जाताना त्याची तारांबळ उडाली. त्याबद्दल कुणाला कळू न देण्याची काळजी त्याच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना घ्यावी लागली. नवी नोकरी मिळाल्यानंतर एका आठवडय़ात रुजू होण्याची ताकीद त्याला मिळाली. त्याला नवी नोकरी मिळाली, हे समजताच त्याच्या ऑफिसमध्ये वेगळी चर्चा रंगली. किती पगारवाढ मिळाली, कुठले पद, नोटीस पूर्ण केल्याशिवाय सोडणार नाही ना, अन्यथा त्याची भरपाई द्यावी लागेल इत्यादी इत्यादी. सध्याची नोकरी का सोडतोय आणि तिथल्या नोकरीमुळे त्याच्या भविष्याला कुठला आकार येणार, याकडे मात्र सर्वाचं दुर्लक्ष. पैसे मिळाल्यानंतर दोन दिवसांत ऑफिसने त्याला रिलीव्ह केलं. एक्झिट फॉर्मवर सर्व गोड गोड. कामाचा हॅण्डओव्हर इ. काही नाही.
दुसऱ्या एका मित्राची वेगळी तऱ्हा. नोकरी शोधताना दुसरीकडून ऑफर लेटर घेऊन इथे पगार वाढवायचा. मग परत नवीन पगारावर नवीन शोध सुरू. असं बार्गेनिंग करत, जिथे पैसे जास्त तिथे नोकरी करायची. दर दीड वर्षांनी नवा खेळ सुरू. या दोन्ही केसेसमध्ये दोघेही अगदी मनापासून कमिटमेन्ट देतात, दोन्हीही बाजूंना- सध्याच्या नोकरीला आणि नव्या नोकरीलाही.
आजकाल सुट्टी घेण्यासारख्या छोटय़ा गोष्टीपासून नोकरी बदलण्यासारख्या मोठय़ा गोष्टींपर्यंत कुठेही पारदर्शकता किंवा प्रामाणिकता राहिलेली दिसत नाही. ते तर जाऊ द्या, पण वरचेवर खोटं बोलणं, लपवणं, ऐन वेळेस शब्दाला फिरणं, हे आता दुर्गुण या प्रवर्गात मोडत नाहीत, हे कटू सत्य आहे. हे आजचं बाजारपेठीय तत्त्व बनलंय का?
या सर्वामुळे किंवा या सगळ्याचा एक वेगळा परिणाम आपल्या करिअर विश्वात पाहायला मिळतो. तो म्हणजे अलीकडे कुणीच कुणावर सहजासहजी विश्वास ठेवायला धजत नाही. मैत्री वगैरे तर सोडाच, पण ऑफिसमध्ये खेळकर, कामसू, प्रेरणादायक असे नातेसंबंध किंवा वातावरण राखणे कठीण बनलेय. ऑफिसच्या पार्टीमध्ये चार डोकी जमली की सारे आपल्याबद्दलच बोलत आहेत किंवा खलबतं सुरू आहेत, असा आपला समज होतो (जो बऱ्याचदा योग्यही असतो.) कधी आपण या बाजूला किंवा कधी त्या बाजूला, इतकाच काय तो फरक.
२६/११ नंतर हॉटेल ताजच्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्यांचे प्राण वाचविण्यासाठी बजावलेली नि:स्वार्थ कामगिरी ही हार्वर्डमध्ये अभ्यासाचा विषय ठरली. दीर्घकालीन इमान हे पैसाच काय, स्वत:च्या जिवापेक्षा अधिक प्रभावी ठरले. माणसं केवळ पैसा पाहून काम करतात, हा आज बळावत चाललेला सिद्धान्त फोल ठरला, पण हे इतकं दुर्मीळ असावं की त्यावर अभ्यास व्हावा आणि आश्चर्य व्यक्त व्हावं- हा आपला पराभव नव्हे का?
कामातून मिळणारे समाधान ही संकल्पना आता इतिहासजमा झाली, असं मानणारी तरुण पिढी वयाच्या २५-२६व्या वर्षी नोकरीत/ कामात आनंद मिळू शकतो, या संकल्पनेपासून दुरावली. ती आता पदोन्नती, पैसा, जीवनशैली या सर्वात कामातून मिळणाऱ्या समाधानाची उणीव भरून काढतेय का? असं खरंच शक्य आहे? मग मशीनसारखं काम करणं आणि नैतिकता दुय्यम होणं हे त्यांच्यासाठी स्वाभाविक बनतं.
अलीकडे महिला कर्मचारी आपण गरोदर असल्याचं ऑफिसमध्ये बरेच दिवस लपवून ठेवतात. पहिले तीन महिने ही बाब जाहीर करू नये, यातील पारंपरिक मुद्दा बाजूला ठेवला तरीही यामुळे आपल्याला वेगळं वागवतील, पदोन्नती वा पगारवाढ रोखतील, अशी भीती महिलांना वाटत असते. मात्र त्याच वेळेस महिलाही बाळंतपणाच्या रजेनंतर नोकरी सोडण्याचा किंवा त्याबाबतचा निर्णय कार्यालयाला वेळेवर न कळवण्याची घोडचूक करतात वा वरिष्ठांना त्याबाबत विश्वासात घेतात. या सगळ्याचा त्रास आणि तणाव दोन्ही बाजूंना होत नसेल का? याचा कामावर परिणाम होत नसेल का?
मी अनेकदा विचार करते, आपण स्वच्छ, सरळ वागलो तर काय होईल? साधं डेडलाइनचं घ्या. नाही, म्हणता येत नाही, म्हणून आपण वरिष्ठांना ‘हो’ म्हणतो आणि मग एफ.बी., ट्विटरच्या विळख्यातून मुक्त होऊन रात्री उशिरापर्यंत बसून कसंतरी काम पूर्ण करतो. तरी काम पूर्ण करायला उशीर झालेला असतो. मग तिने मेल उशिरा पाठवला, त्याने आकडेवारी चुकीची कळवली, कॉम्प्युटर क्रॅश झाला, अशी कारणं आपण पुढे करतो. त्यातून जर तुम्ही दोन किंवा अधिक बॉसेसना रिपोर्ट करत असाल तर हा पेच अधिकच वाढतो. त्याउलट, पहिल्यांदाच स्पष्ट बोललं तर? महात्मा गांधी म्हणायचे- नेहमी खरं बोला आणि अन्याय सहन करू नका. पण आपण नेमकं उलट करतो – अन्याय मग तो अधिक वेळ काम, रजा रद्द होणं, पदोन्नती वा प्रेझेन्टेशन यापैकी कुठलाही मुद्दा असो. आपण मूग गिळून गप्प बसतो. का? असुरक्षितता वा नोकरी जाण्याच्या भीतीपोटी असे करतो. अर्थात तुम्ही खरं बोलून जग बदलेल, असं नाहीच म्हणा. कारण अलीकडे ऑफिसमधल्या मीटिंगमध्ये एखाद्या धोरणात्मक निर्णयाला विरोध केला तर ते ऑफिसमध्ये पर्सनली घेतलं जातं, अहंकार दुखावतात. ‘इट्स नथिंग पर्सनल’ हे जितक्या वेळा सांगितलं जातं, त्यावरून याचा अंदाज येईल. अर्थात एखादी चूक निदर्शनास आणून देणे म्हणजे त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर, कुवतीवर घाला घालणं असं मानलं जातं.
गोविंदाच्या ‘पार्टनर’ सिनेमात भरगच्च मीटिंगमध्ये त्याच्या स्पष्टोक्तीमुळे बॉस आणि हिरोइन त्याच्यावर फिदा होते. मात्र हे केवळ हिंदी चित्रपटातच शोभून दिसतं, नाही का? खरंच असं केलं तर? विनोदाचा भाग सोडला तर स्पष्ट बोलण्याने आपल्या सर्वसाधारण विचारशक्तीला चालना मिळत असते. जोपर्यंत एखाद्या विषयावर उलटसुलट चर्चा होत नाही, वाद झडत नाही, तोपर्यंत प्रभावी मार्ग निघत नाही, हेही तितकंच खरं, नाही का? यामुळे अलीकडे आपापल्या करिअरमध्ये ‘मिडिओक्रसी’ वाढत्येय, हे तरी कोणी प्रामाणिकपणे कबूल करेल का? आणि त्याचा आपल्या व्यक्तिगत आयुष्यावर परिणाम होतोय का?
शेक्सपिअरने हॅम्लेटमधल्या एका सुनीतात लिहिलं होतं,
‘This above all: to thine own self be true, And it must follow, as the night the day, Thou canst not then be false to any man..’
म्हणजे सर्वप्रथम, सर्वात महत्त्वाचे आयुष्यात आहे, स्वत:चा सच्चेपणा- पूर्णपणे. आणि मग तुम्ही प्रत्येक माणसाशी सच्चे राहाल. आपण स्वत:शी एकनिष्ठ, स्पष्ट आणि सच्चे राहू शकतो का? तरच ते सच्चेपण ऑफिस, करिअर, समाज यात प्रतिबिंबित होऊ शकेल.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Dec 2012 रोजी प्रकाशित
कोलाहल : सत्याचे प्रयोग?
माझ्या दोन मित्रांच्या दोन नोकऱ्यांची कथा. एकाने दुसरीकडे नोकरीसाठी अर्ज केला. त्याच्या क्षेत्राचा आवाका लहान आणि स्पर्धा इतकी तीव्र की, त्याने दुसरीकडे अर्ज केलाय, हे त्याच्या ऑफिसमध्ये कळणं मुळीच कठीण नव्हतं. त्यामुळे त्याच्या ऑफिसच्या जवळ असलेल्या 'त्या' ऑफिसमध्ये मुलाखत द्यायला …

First published on: 03-12-2012 at 01:07 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolahalexperiment of truth