सुनील शेळगावकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा ही महाराष्ट्र गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यांमार्फत घेतल्या जाणाऱ्या इतर दुय्यम परीक्षा जसे की तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, मेगा भरती, सहकार खाते, म्हाडा यांसारख्या परीक्षांच्या अभ्यासक्रमाला जोडणारा दुवा आहे.

महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भूगोल हा विषय नेहमीच अवघड वाटतो. कारण भूगोलाचा अभ्यास विद्यार्थी नेहमीच गोल गोल, अर्धवट आणि वरवरचा करतात. भूगोल हा विषय कोणत्याही परीक्षेत पैकीच्या पैकी गुण देणारा विषय आहे.  हे गुण मिळवण्यासाठी आपणास त्या विषयाचा चौरस अभ्यास करावा लागतो. तो समजून घेण्यापूर्वी आपण या परीक्षेसाठी आयोगाने दिलेला  अभ्यासक्रम समजून घेणे गरजेचे आहे.

अभ्यासक्रम 

महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान विभाग, अक्षांश व रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.

अभ्यासक्रमाचे विश्लेषण:

पृथ्वी : या उपघटकाच्या अंतर्गत सौरमाला, ग्रह, उपग्रह ,ग्रहणे, भरती आणि  ओहोटी, भूरूपे, पृथ्वीचे अंतरंग, समुद्रे इत्यादीचा अभ्यास करावा लागतो.

जगातील विभाग व हवामान: या उपघटकाच्या अंतर्गत विविध खंड व त्याची  वैशिष्टय़े, जगातील प्रमुख देश व संदर्भीय अभ्यास जगातील विविध हवामान प्रदेश व गवताळ प्रदेश, उंच शिखरे व पर्वतरांगा, वाऱ्याची निर्मिती, तापमान व दाब पट्टे इत्यादी घटकांचा अभ्यास करावा लागतो.

अक्षांश व रेखांश: या उपघटकाच्या अंतर्गत अक्षांश व रेखांश संबंधित इत्थंभूत माहिती, स्थानिक वेळ व प्रमाण वेळ यासारख्या बाबीचा अभ्यास करावा लागतो.

इतर महत्त्वपूर्ण – याव्यतिरिक्त दिलेला अभ्यासक्रम अर्थात; महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे ,नद्या, उद्योगधंदे आणि इत्यादी या शब्दाचा केलेला उल्लेख याअंतर्गत इयत्ता चौथी ते बारावीदरम्यानच्या  शालेय व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अभ्यासक्रमात  देण्यात आलेला उपरोक्त बाबींचा संपूर्ण अभ्यास करावा.

भूगोलचा अभ्यास गोल गोल असा न करता चौरस असावा तो पुढीलप्रमाणे:

वाचन व मनन:

आपणास या परीक्षेसाठी देण्यात आलेल्या अभ्यासक्रमाचे वाचन आणि मनन करण्यासाठी बालभारतीची पुस्तके पुरेशी आहेत. आपल्या अभ्यासक्रमातील एखादा उपघटक इयत्ता चौथी ते बारावीपर्यंतचा पुस्तकातून क्रमाक्रमाने अभ्यासावा. तसेच संबंधित चालू माहितीसाठी महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल, योजना व लोकराज्य मासिक आणि भारत २०२२ (प्रकाशक सूचना व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार) तसेच कृषी विद्यापीठीय कृषी दैनंदिनी याचा आधार घ्यावा.

वाचन आणि मनन या अभ्यास प्रक्रिया पूर्ण झाल्यास परीक्षेची काठिण्यपातळी, परीक्षा योजना याप्रमाणे आपल्या विषयाचा परीघ आखावा.

नकाशा भरण

वाचलेली माहिती अ‍ॅटलास, शालेय पुस्तकातील नकाशे व आकृत्या यामार्फत चित्रबद्ध व नकाशाभिमुख पद्धतीने तयार करावी. निर्माण केलेले नकाशे यावर प्रश्न पत्रिकेनुसार प्रक्रिया करावी. उदा. नकाशातील एखादे ठिकाण दर्शविणे, सर्वात मोठे, सर्वात लहान यासारख्या  बाबी यादीकृत करणे, क्रमांक ठरविणे इत्यादी.

जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास

सारखे अभ्यासक्रम आणि सारख्याच काठिण्यपातळीच्या इतर स्पर्धा परीक्षा यांच्या झालेल्या जुन्या प्रश्नपत्रिका यांचा अभ्यास करावा. यातून आपणास अभ्यासक्रमातील बारकावे, अभ्यासक्रमाशिवाय परीक्षेत विचारले जाणारे इतर घटक, उपघटक, प्रश्न प्रकार जसे की गाळलेल्या जागा भरा, क्रमांक दर्शवा, जोडय़ा लावा, नदीकाठची शहरे, ठिकाणे, नद्यांचा संगम इत्यादी तसेच प्रश्नांची काठीण्यपातळी यासारख्या बाबी लक्षात येतात. या माहितीच्या आधारे आपणास या परीक्षेसाठी नेमके काय लक्षात ठेवावे व काय लक्षात ठेवू नये हे समजते.

सरावाचे महत्त्व

अभ्यासक्रमाप्रमाणे अभ्यास करणे आणि परीक्षा कक्षामध्ये पेपर हाताळणी या दोन्ही भिन्न भिन्न बाबी आहेत. परीक्षा कक्षात होणाऱ्या तांत्रिक चुका समजण्यासाठी तसेच आपल्या अभ्यासातील कच्चे दुवे शोधण्यासाठी सराव चाचण्या सोडवण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

उपरोक्त चतु:सूत्रीचा वापर केल्यास भूगोल या विषयात परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवणे सहज शक्य होते.

अभ्याससाहित्य

भूगोल या विषयाच्या अभ्यासासाठी सीमित अभ्यास साहित्य आवश्यक असते. आपल्या परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार बालभारतीची पाठय़पुस्तके वापरणे फायद्याचे ठरते. भूगोलच्या संदर्भातील ए.बी. सवदी सरांची पुस्तके अवांतर माहितीचा  अभ्यास करण्यासाठी वापरावे. नकाशा भरण्यासाठी कोणत्याही एका प्रकाशनाच्या अ‍ॅटलासची मदत घ्यावी. झालेल्या जुन्या प्रश्नपत्रिकेचा वापर प्रश्न प्रकार आणि प्रश्नांची काठिण्यपातळी समजण्यासाठी करावा, तसेच कोणीही परीक्षाभिमुख पद्धतीने काढलेल्या किमान पाच प्रश्नपत्रिका तांत्रिक चुका टाळण्यासाठी सोडवाव्यात. याव्यतिरिक्त आपणास इतर अभ्यास साहित्याची गरजच भासणार नाही. कोणत्याही परीक्षेत पैकीच्यापैकी गुण हा देणारा भूगोल हा विषय आहे. त्याची तुलना सोपा किंवा अवघड विषय/घटक म्हणून करणे धाडसाचे ठरेल. म्हणून हा चौरस अभ्यास आपणास नक्कीच यश मिळवून देईल यात शंका नाही.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc exam information in marathi mpsc exam preparation tips in marathi zws