वेळेचे व्यवस्थापन हे सरावाने शिकता येईल, असं कौशल्य आणि ज्ञानशाखा आहे. दैनंदिन सरावाने तुम्ही वेळेच्या व्यवस्थापनात सवरेत्कृष्ट बनू शकता. दिवसाची सुरुवात करण्याआधी तुम्ही दररोज कामांची यादी तयार करा. तुमची तातडीची कामे महत्त्वाच्या कामांपासून वेगळी काढून प्राधान्यक्रमानुसार लावा. तुमचं सर्वात महत्त्वाचं काम निवडा आणि त्यानंतर ताबडतोब त्यावर काम करायला लागा. ते काम १०० टक्के पूर्ण होईपर्यंत एकाग्र होण्याची सवय लावा.
एखादे महत्त्वाचे काम पूर्ण केल्यानंतर प्रत्येक वेळेस तुम्हाला आनंद, उत्साह आणि आत्मसन्मान उंचावल्याचा अनुभव येईल. तुम्हाला ऊर्जावान आणि शक्तिशाली वाटेल. आयुष्य अधिक नियंत्रणात आल्यासारखे वाटेल. तुम्हाला तुमचे पुढील काम सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळेल.
जेव्हा तुम्हाला तुमची गती कमी झाल्याचे जाणवेल किंवा चालढकल, उशीर करण्याची इच्छा होईल, तेव्हा स्वत:शी पुन:पुन्हा म्हणा, ‘हे आता करा! हे आताच करा! हे आताच करा!’ काम तातडीने करण्याची जाणीव विकसित करा. कृती करण्याबाबत आग्रही असा. तुमचे सर्वात महत्त्वाचे काम निवडण्याची, ते ताबडतोब सुरू करण्याची आणि ते पूर्ण होईपर्यंत चिकाटीने मागे लागण्याची शिस्त स्वत:ला लावा.
(गोल्स- ब्रायन ट्रेसी, साकेत प्रकाशन, पृष्ठे- २५६, किंमत- २२५ रु.)