नोकरीच्या ठिकाणी बॉसिझम म्हणजेच वर्चस्ववाद अनेक जणांना सहन करावा लागतो. वर्चस्ववाद ही एक नकारात्मक नेतृत्व शैली आहे असे म्हणावे लागेल. आपल्या पदाचा किंवा अधिकाराचा वापर ज्यावेळी समोरच्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा वर्चस्व गाजवण्यासाठी केला जातो त्यावेळी त्याला वर्चस्ववाद असे म्हटले जाते. वर्चस्व गाजवणे ही एक मनोवृत्ती आहे असे म्हणावे लागेल. समोरच्या व्यक्तीने मी म्हणेन तेव्हा आणि मी म्हणेन तसे वागले पाहिजे असा अट्टाहास वर्चस्ववादामध्ये बहुतेक वेळा दिसून येतो. वर्चस्ववाद ही एक एकांगी विचार पद्धती आहे असे मला नेहमीच वाटते, ज्यामध्ये मी म्हणेन तेच बरोबर आणि समोरच्याचे कायमच चूक अशी मनोधारणा पुष्कळदा दिसून येते. वर्चस्ववादामुळे कर्मचाऱ्यांची वाढ खुंटते त्याचबरोबर दिवसेंदिवस काम करण्याची प्रेरणा आणि उत्साह कमी होताना दिसून येतो. नोकरीतील वर्चस्ववादाचे दीर्घकालीन नकारात्मक परिणाम कर्मचाऱ्यांवर तसेच कंपनीच्या प्रगतीवर देखील होताना दिसून येतात.

बॉसिझम किंवा वर्चस्ववादाची प्रमुख वैशिष्ट्ये

● कर्मचाऱ्यांवर विश्वासाचा अभाव – आपल्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवणे अनेक जणांना अवघड जाते. ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक कृतीवर गरजेपेक्षा जास्त लक्ष दिले जाते त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक कृतीवर स्पष्टीकरण मागितले जाते.

● सूक्ष्म व्यवस्थापनाची मागणी – कंपनीतील कर्मचाऱ्यांनी त्यांची प्रत्येक माहिती व निरीक्षणे मला सतत कळवली पाहिजेत अशी मागणी असते. कर्मचाऱ्यांनी कुठलेही छोटे निर्णय घेताना मला विश्वासात घेतले पाहिजे असा आग्रह असतो त्याचबरोबर तुमच्या प्रत्येक हालचालींवर माझे बारीक लक्ष आहे याची कर्मचाऱ्यांना सतत जाणीव करून दिली जाते.

● भीती व दडपशाहीवर आधारित व्यवस्थापन – वर्चस्ववादावर आधारित व्यवस्थापनामुळे कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये सतत भीती व असुरक्षिततेची भावना निर्माण होताना दिसते. कर्मचारी सतत दडपणाखाली काम करताना दिसतात. आपले काहीतरी चुकेल व आपल्या चुकीला क्षमा नाही याचे अतिरिक्त दडपण कर्मचाऱ्यांवर येताना दिसते. एकंदरीतच कर्मचारी भीतीच्या छायेमध्ये काम करताना दिसतात.

● अभिप्राय न देणे – पुष्कळ कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कामाबद्दल कोणताही अभिप्राय दिला जात नाही व त्यांनी केलेल्या कामाबद्दल कर्मचाऱ्यांच्या मनात संदेह निर्माण होईल अशा पद्धतीने प्रतिसाद दिला जातो असा नकारात्मक दिलेला प्रतिसाद कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास कमी करण्यास कारणीभूत ठरतो. हळूहळू स्वत:मध्ये असलेल्या क्षमतांविषयी कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये संदेह निर्माण होऊ लागतो.

वर्चस्ववादाचे कर्मचाऱ्यांवर होणारे परिणाम

● वर्चस्ववादामुळे कर्मचाऱ्यांची काम करण्याची प्रेरणा कमी होताना दिसते त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर याचा नकारात्मक परिणाम होताना दिसतो.

● मानसिक खच्चीकरण. सततच्या टीकेमुळे व कितीही चांगले काम केले तरी त्याची दखल न घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होताना दिसते.

● मानसिक व शारीरिक थकवा ( Burnout) जाणवणे. आपण केलेल्या कामाची दखल न घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांना सतत ताणतणावाला सामोरे जावे लागते. कर्मचारी सतत तणावाखाली वावरताना दिसतात अशामुळे कालांतराने प्रचंड मानसिक व शारीरिक थकवा जाणवतो व कित्येकदा निराश देखील वाटू लागते.

● संघभावनेचा अभाव. सतत वर्चस्ववादाला सामोरे गेल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये हळूहळू संघ भावना कमी होऊ लागते कर्मचारी एकलकोंडे होताना दिसतात परस्परांमधील संवाद देखील कमी होताना दिसतो ज्यामुळे एकांगी विचारसरणी होऊ लागते आपल्याला सतत कुठल्या ना कुठल्या नकारात्मक टीकेला सामोरे जावे लागेल याची सतत मनामध्ये भीती जाणवू लागते.

कुटुंब व नातेसंबंधांवर होणारे परिणाम

सतत वर्चस्ववादाला सामोरे गेल्यामुळे कर्मचाऱ्यांचे परस्परांमधील नातेसंबंध देखील दुरावताना दिसतात एकमेकांबद्दल अविश्वासाची भावना निर्माण होताना दिसते व या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून कुटुंबातील वातावरण देखील काही वेळा बिघडताना दिसून येते. कारण कामाच्या ठिकाणी मिळालेली नकारात्मक ऊर्जा कुठल्या ना कुठल्या रूपाने घरातील व्यक्तींवर परिणाम करताना दिसून येते. सततची चिडचिड छोट्याछोट्या गोष्टींनी मूड जाणे अशी लक्षणे ही अनेक जणांमध्ये दिसून येतात.

एकंदरीतच वर्चस्ववाद हा स्वत:साठी आणि कंपनीसाठी हानिकारकच आहे हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. समोरच्या व्यक्तीवर वर्चस्व गाजवण्यापेक्षा त्याच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे हे कंपनी व कर्मचाऱ्यांच्या कायमच हिताचेच असते.

drmakarandthombare@gmail.com