● माझं २० वर्षे वय पूर्ण. २०२० मध्ये ९७ टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण झालो. पुढे २०२२ ला इयत्ता बारावी पीसीएमबी ८४.३ गुणांसह उत्तीर्ण झालो. २०२२ पासून ते आज पर्यंत नीट चे क्लास करत होतो कुठेही अॅडमिशन घेतली नाही. मागील एक वर्षापासून मानसरोग तज्ञाकडे ट्रीटमेंट चालू आहे. कधीपर्यंत चालेल सांगता येत नाही. नीट ला १६७ मार्क्स आल्यामुळे ते क्षेत्र सोडण्याचे ठरवले आहे. सीईटी- पीसीएम म्हणजेच इंजिनीयरिंगची परीक्षा दिलेली आहे. आता समोर दोनच ऑप्शन आहेत एक तर कॉम्प्युटर सायन्स इंजिनीयरिंग किंवा केमिकल इंजिनिअरिंगला अॅडमिशन घेऊन यूपीएससीची तयारी करणे किंवा फर्ग्युसन कॉलेजला बीएस्सी केमिस्ट्रीला अॅडमिशन घेऊन यूपीएससीची तयारी करणे. दोन्हीपैकी कुठला ऑप्शन निवडावा या संभ्रमात आहे. दोन्हीपैकी कुठेजरी अॅडमिशन घेतले तरी कॉलेज मात्र पुण्यातच हवे व यूपीएससीसाठीचा क्लास चाणक्य मंडळ, पुणे येथे लावण्याचे ठरवले आहे. आपणास काय वाटतं दोन्हीपैकी कुठला ऑप्शन चांगला राहील? —सार्थक

चुकीच्या अवास्तव अपेक्षांचा रस्ता धरल्यावर काय होते ते तुझा आज वरच्या साऱ्या प्रवासातून लक्षात येते. हे वाक्य नीट समजून घेण्याचा प्रयत्न कर. तसेच हे वाक्य घरच्यांनी समजून घेणे तितकेच गरजेचे आहे. एखाद्या परीक्षेत यश मिळेल या अपेक्षेने पुन्हा पुन्हा धडका घेत राहणे कायमच धोक्याचे असते. त्याचा मनावर खोलवर वाईट परिणाम होतो. मनोविकारतज्ञाकडे जावे लागणे, औषधे सुरू होणे हा त्याचा गंभीर दुष्परिणाम असतो. यातून बाहेर येण्याचा पहिला रस्ता शोधणे गरजेचे असते. या उलट अवास्तव अपेक्षा धरून तू पुढचे नियोजन करत आहेस. कॉलेज उत्तमच हवे, पुण्यातीलच हवे, स्पर्धा परीक्षांसाठीचा क्लास लावणार आहे. या साऱ्या अवास्तव अपेक्षा आहेत. दोन वर्षांपूर्वी बारावी झालेल्या मुलाला उत्तम कॉलेज तेही पुण्यातील मिळणे हे कठीण. नेमके उत्तर न देता मी तुला दोन रस्त्यांचा विचार सुचवत आहे. तुझ्याच गावी बीएस्सी पूर्ण करावे. ते करताना ७० टक्के गुण प्रत्येक परीक्षेत हे उद्दिष्ट साध्य झाले तरच स्पर्धा परीक्षांचा विचार सुरू होतो. तोवर अन्य कोणताही विचार करणे म्हणजे औषधे वाढवून स्वत:ची मानसिक धरसोड करून घेणे याला सुरुवात होऊ शकते. दुसरा रस्ता मुक्त विद्यापीठातून बीए करणे हा आहे. चिंता, दडपण बाजूला जाऊन त्यात तुला चांगले यश मिळेल. यंदाच्या वर्षी बारावीचा व जेईईचा निकाल लागला आहे. सीईटी, नीटचाही निकाल लागेल. हाती आलेल्या मार्कांमधून योग्य रस्ता निवडणे हे किती गरजेचे असते ते वरील उदाहरणातून अन्य वाचक व पालकांनी लक्षात घ्यावे. ज्या मिनिटाला स्वप्नरंजन सुरू होते तेव्हा वास्तव दूर दूर पळत जाते.

हेही वाचा : यूपीएससी सूत्र : इराणमधील चाबहार बंदराचे महत्त्व अन् झेनोट्रांसप्लांटेशन शस्त्रक्रिया, वाचा सविस्तर…

● माझ्या भावाने यावर्षी १० वी ची परीक्षा (महाराष्ट्र बोर्ड) दिलेली आहे. त्याला पुढे डेअरी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे. तर त्यामधे जाण्यासाठी कोणते मार्ग उपलब्ध आहेत? आपण १० वी नंतर लगेच डिप्लोमामधे प्रवेश घेऊ शकतो का? किंवा त्यात अजून कोणते कोर्स उपलब्ध आहेत आणि त्यासाठी काय शैक्षणिक पात्रता गरजेची आहे? याबाबत सविस्तर माहिती मिळावी. — तन्वी क्षीरसागर.

भाऊ म्हणतो मला डेअरी टेक्नॉलॉजीमधे करिअर करण्याची इच्छा आहे. भावाला डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये काम करणाऱ्या किमान तीन माणसांना पहिल्यांदा १५ जून पर्यंत भेटायला सांगा. इथे अनेक प्रकारची कामे असतात ती त्यांच्याकडूनच समजून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. अन्यथा कोर्स पूर्ण झाल्यावर हे आवडत नाही असे तो म्हणण्याची शक्यता भरपूर. एखादा वेगळा शब्द ऐकला की मुलांना त्याचे आकर्षण वाटते म्हणून हे सविस्तर लिहिले आहे. आपण विचारल्याप्रमाणे डिप्लोमा करून पदवीला जाणे योग्य का अयोग्य याचा विचार दहावीच्या गुणांवर करायला हवा. दहावीला शास्त्र व गणितात ७५ टक्के पेक्षा कमी गुण असतील तर डिप्लोमाचा विचार. अन्यथा अकरावी बारावी सायन्स पीसीएमबी करून हा रस्ता सुरू होतो. बारावीपर्यंतच्या क्लासेसचा खर्च भरपूर असतो तो डिप्लोमा करताना वाचतो हा एक वेगळा फायदा.