मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं की, अनेक कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. हे कंगोरे खरे किती, का खोटे याच वास्तव दाखवण्याचा हा ‘आरसा’. आजही काही शब्दांमागे समाजाची भूमिका, समज वेगळी असते. जसे की ड्रायव्हर. मात्र, वृत्तपत्रांत, वृत्त वाहिन्यांवर मेट्रो, रेल्वे चालक महिलांना मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे लहानपणी आकर्षक वाटणाऱ्या या क्षेत्राबाबत आता समजाचा दृष्टिकोन हळूहळू बदलत आहे.

समुद्र आणि रेल्वे या दोन गोष्टी न पाहिलेली अनेक मुले, माणसे असू शकतात. पण ज्यांनी या दोन गोष्टी पाहिल्या आहेत त्यांना आयुष्यभरात त्याचा विसर कधीही पडत नाही. पूर्ण वेगाने धावणारी रेल्वे गाडी लांबून पाहणे किंवा जवळ उभे राहून तिची धडधड ऐकणे याचा थरार अनुभवल्याशिवाय कळत नाही. एखाद्या छोट्या रेल्वे स्टेशनवर किंवा मुंबईतील उपनगरी रेल्वे स्टेशनवर उभे असताना त्याच प्लॅटफॉर्म वरून पूर्ण वेगाने जाणारी सुपर एक्स्प्रेस ज्यांना पहायला मिळाली आहे त्यांना त्या इंजिन ड्रायव्हरचा रुबाब पाहून नक्कीच आश्चर्य वाटत आले आहे. एखादी लांबच लांब निर्मनुष्य अशी मालगाडी लोको पायलट मदतनिसाला घेऊन चालवतो आणि शेपटातील अर्धवट उघड्या डब्याच्या कठड्याला धरून गार्ड निशाण दाखवत उभा असतो हे सुद्धा दृश्य मनात कायमचे ठसते. संपता न संपणाऱ्या मालगाडी डब्यांची ओळ संथ तालात समोरून जात राहते. एखाद्याने ते डबे मोजायचा प्रयत्न केला तरी तो कंटाळून जातो. अश्या बाबींमुळेच सर्व लहान मुलांच्या मनात पुढे इंजिन ड्रायव्हर होण्याचे स्वप्न पाहिले जात असावे. मात्र, यातील ‘ड्रायव्हर’ शब्दाच्या मागे असलेला वर्णभेद हळूहळू कळू लागतो व ते स्वप्न विरून जाते. हा वर्णभेद सगळ्यांच्या मनात इतका रुजलेला असतो की गावातल्या रिक्षावाल्यांना किंवा ओलाचे टॅक्सी ड्रायव्हरला सहजपणे एकारांती आणि तेही निनावी पुकारले जाते. मोठ्यांचे अनुकरण मुलेही करत राहतात. लोको पायलट या मालिकेतील पहिले दोन लेख वाचल्यानंतर एका प्राध्यापक वाचिकेने संदेशात लिहिले होते, ‘माझी मुलगी लहान होती तेव्हा तिने विचारले, आई अहो रिक्षावाले काका अस म्हणायला तू सांगतेस तर देवळा बाहेर बसलेल्या भिकाऱ्यांना पण अहो भिकारी काका असे म्हणायचे का? त्यावर त्यांनी स्वत:च उत्तर दिले होते की हा बदल माझ्यात घडवून आणायला मला वर्षे लागली. स्वाभाविकपणे मुलांच्या स्वप्नातल्या इंजिन ड्रायव्हर या संकल्पनेला खत पाणी घालण्याकरता समाजातील मोजकेच घटक तयार होतात.

हेही वाचा >>> नोकरीची संधी : हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडमधील संधी

सेवेचे स्वरूप

मुळात ही सेवा कशी दिली जाते, त्यात कोण काम करत असते, त्याचे स्वरूप काय याची अज्ञानमूलक अशी मनातील आढी निघाली तरच अनेक मुले मुली या क्षेत्राकडे वळतील. पुन्हा मुली या शब्दावरती अनेक वाचक अडखळणार आहेत. पण कोणतीही मुलगी या क्षेत्रात सहज प्रवेश करू शकते व असे काम करणाऱ्यांची संख्या वाढत आहे हेही इथेच नमूद करावेसे वाटते. काही शहरातील मेट्रो सेवांचे लोको पायलटचे काम खास मुलींकडे सोपवले आहे. हे उद्घाटनाच्या वेळच्या छायाचित्रातून वाचकांना आठवू शकेल. अनेक मुली पायलट बनतात, सैन्यात जातात, मर्चंट नेव्हीत कॅप्टन वा इंजिनीअर म्हणून यशस्वी काम करतात तसाच प्रकार येत्या काळात लोको पायलट संदर्भात होऊ शकतो. भारतात रेल्वेचे जाळे प्रचंड मोठे आहे. पण हे रेल्वेचे जाळे रोज चालते हालते ठेवण्यासाठी लोको पायलट आणि गार्ड यांना मानाचे स्थान आहे. लोको पायलट मदतनीसाच्या सहाय्याने विविध प्रकारच्या रेलगाड्या चालवत असतो. भारतात आज घटकेला एक लाखापेक्षा जास्त लोको पायलट कार्यरत आहेत. भारतीय रेल्वेच्या नोकरीत कंत्राटी कामगार सोडले तर १६ लाख कर्मचारी काम करतात. रोज १३ हजार प्रवासी गाड्यांतून कोट्यवधी प्रवाशांची येजा ‘सुखरूप’ करण्याचे काम या लोको पायलट वर सोपवलेले असते. यापेक्षाही मोठे आणि गरजेचे काम म्हणजे जीवनावश्यक वस्तूंची देशभरातील वाहतूक करून एका टोकाला तयार होत असलेल्या गोष्टी देशाच्या दुसऱ्या टोकाला पोचवण्याचे काम मालवाहतूक गाड्यातून केले जाते. दूध वाहतूक करणारी मालगाडी सहसा माहीत नसते. डिझेल, पेट्रोल, कोळसा, सिमेंट, गहू, तांदूळ इतकेच काय तर विविध मालाने भरलेले ७० ते १०० ट्रकसुद्धा पाच-सहाशे मैल दूरवर नेऊन सोडण्याचे काम गेल्या दशकात सुरू झालेल्या रो-रो रेल्वेने होते. यातील प्रत्येक रेल्वे गाडी चालवण्यासाठीचे कौशल्य वेगवेगळ्या पद्धतीत वापरावे लागते. घाटामध्ये मागून जोडलेल्या इंजिन ड्रायव्हरचे काम विलक्षण कौशल्याचे असते. तीच गोष्ट ‘वंदे भारत’सारख्या १३० किलोमीटर वेगाने जाणाऱ्या वा राजधानी गाडीचे सारथ्य करताना डोळ्यात तेल घालून काम करावे लागते. सिग्नल पाहता पाहता दिसेनासे होत असतात, त्यात चूक होऊ न देता सतत काम करत राहणे सोपे नाही. भरधाव वेगाने जाणाऱ्या राजधानी वरील पाट्या वाचणेही शक्य होत नाही तर ती चालवण्याचे काम किती जोखमीचे असेल हे लक्षात यावे.

परीक्षेतून निवड, प्रशिक्षण लोको पायलट बनण्यासाठी तीन पद्धतीतील शिक्षण चालते. इयत्ता दहावीनंतर दोन वर्षाचा आयटीआयचा तांत्रिकी अभ्यासक्रम चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असल्यास, बारावी शास्त्र व गणित घेऊन पास झालेला मुलगा वा मुलगी, दहावी नंतर तीन वर्षाचा मेकॅनिकल वा इलेक्ट्रिकल डिप्लोमा पूर्ण केलेला मुलगा वा मुलगी अखिल भारतीय स्वरूपाच्या घेतल्या जाणाऱ्या लोको पायलट परीक्षेला बसू शकतात. किमान वय १८ तर जास्तीत जास्त ३३ ही वयोमर्यादा असते. कॉम्प्युटरवर घेतली जाणारी प्राथमिक चाचणी व नंतर घेतली जाणारी तांत्रिक दुसरी चाचणी यातून निवड केली जाते. तोंडी मुलाखती नंतर निवडलेल्या सगळ्यांना वैद्याकीय तपासणीला सामोरे जावे लागते. यानंतर प्रशिक्षणाचा काळ सुरू होतो. कठोर प्रशिक्षणानंतर असिस्टंट लोको पायलट या पदावर पहिली नेमणूक होते. छोट्या पल्ल्याच्या मालगाड्या, नंतर लांब पल्ल्याच्या जोखमीची वाहतूक करणाऱ्या मालगाड्या, मोठ्या जंक्शनला शन्टींग करणाऱ्या इंजिनावर काम केल्यानंतर प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीला लोको पायलट म्हणून नेमणूक होते. मेल एक्स्प्रेस सारख्या दूरपल्याच्या गाड्यांवर नेमणूक होईस्तोवर तुमची १५ ते २० वर्षांची सेवा झालेली असते. सेवा काळात मिळणारा पगार सोडून अन्य भत्ते व मिळणाऱ्या पूरक सोयी एकत्रित केल्यास या काळात वार्षिक चार ते तीस लाख पगार मिळतो. या प्रवेश परीक्षांची तयारी चिकाटीने केल्यास त्यात यश मिळवणे अशक्य नसते. मात्र, याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. लोको पायलट व गार्ड यांच्या आठवड्याचे कामाचे तास, ठरावीक काळानंतर पूर्ण विश्रांतीचे तास, सुट्ट्यांचे वेळापत्रक, परगावी असताना विश्रांती कक्षातली सुविधा यावर कटाक्षाने नियंत्रण ठेवले जाते. कारण यांचे मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचे असते व त्यावरच तुमच्या आमच्या सारख्या सर्व प्रवाशांची सुरक्षा अवलंबून असते. (समाप्त)