शेती, शेती व्यवसाय आणि आधुनिक शेतीची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी बीएससी ऑनर्स कृषी हा एक उत्तम पर्याय आहे.
पदवी अभ्यासक्रम व पात्रता :
केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी प्रवेश अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवाराचे वय किमान सोळा वर्षे असावे. आर्हता परीक्षेमध्ये (बारावी विज्ञान) खुल्या उमेदवाराला ५० % पेक्षा कमी आणि आरक्षित प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांस ४० % पेक्षा कमी गुण नसावे. याचबरोबर सामायिक प्रवेश परीक्षेमध्ये किमान गुण ० पेक्षा जास्त असावेत.
नीट ही सामायिक प्रवेश परीक्षा तसेच जेईई सामायिक प्रवेश परीक्षा दिलेले विद्यार्थी सुद्धा प्रवेशासाठी पात्र आहेत.
यावर्षी राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल घोषित झाल्यानंतर विद्यार्थ्यांना agri2025.mahadbt.org या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येईल. एका उमेदवाराला एकापेक्षा जास्त प्रवेश अर्ज दाखल करता येणार नाही. त्यामुळे प्रवेश अर्जामध्ये भरण्यात आलेली पूर्ण माहिती बरोबर असल्याची खात्री केल्यानंतरच प्रवेश अर्ज दाखल करावा.
विद्यार्थ्यांना अर्जासोबत सर्व कागदपत्रे प्रवेश वेबसाईटला अपलोड करणे अनिवार्य आहे. कोणकोणती कागदपत्रे लागतात याची सविस्तर माहिती प्रवेश माहिती पुस्तिकेत दिलेली असते.
M कोटा U कोटा :
कृषी प्रवेश प्रक्रियेमध्ये M कोटा U कोटा याबाबत विद्यार्थ्यांची कायमच गफलत होत असते म्हणून आपण त्याची सविस्तर माहिती देत आहोत.
१. कृषी विद्यापीठ कोटा (U कोटा) याचा अर्थ ज्या उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र आहे. नसल्यास त्या उमेदवाराच्या महाविद्यालय/ शाळा सोडल्याच्या दाखल्यावर महाराष्ट्र राज्यातील जन्म ठिकाण आहे किंवा महाराष्ट्र राज्यात जन्म झाल्याचा सक्षम प्राधिकार्याकडील जन्म दाखला आहे आणि संबंधित कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील संस्थेतून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आहे. अशा उमेदवारांसाठी राखून ठेवलेल्या जागांना कृषी विद्यापीठ कोटा, U कोटा असे संबोधण्यात यावे.
२. महाराष्ट्र कोटा (M कोटा) याचा अर्थ ज्या उमेदवारांकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र आहे. नसल्यास त्या उमेदवारांच्या महाविद्यालय /शाळा सोडल्याच्या दाखल्यावर महाराष्ट्र राज्यातील जन्म ठिकाण आहे किंवा महाराष्ट्र राज्यात जन्म झाल्याचा सक्षम प्राधिकार्यांकडील जन्म दाखला आहे. अशा उमेदवारांसाठी राखून ठेवलेल्या जागांना महाराष्ट्र कोटा (M कोटा) असे समजण्यात यावे. यास्तव विद्यापीठ कोट्यातील उमेदवार महाराष्ट्र कोट्याकरिता सुद्धा पात्र आहेत.
३. बाहेरील राज्यातील उमेदवारासाठी कोटा (O.S. कोटा) याचा अर्थ प्रवेश घेण्यापूर्वी लगतच्या दहा वर्षे मुदतीमध्ये किमान तीन वर्षे ज्या उमेदवारांनी व ज्यांच्या आई-वडिलांनी महाराष्ट्रात निवास केला नसेल, अशा व्यक्ती आणि ज्या व्यक्तींनी महाराष्ट्र व्यतिरिक्त देशातील इतर राज्यांचे अधिवास प्रमाणपत्र धारण केलेले असेल, अशा उमेदवारांसाठी राखून ठेवलेल्या जागांना बाहेरील राज्यातील उमेदवारांसाठी कोटा (O.S. कोटा) असे संबोधण्यात यावे.
४. प्रवेश कार्यपद्धती :
१. उमेदवाराने प्रवेश प्रक्रिये संबंधी माहिती पुस्तिकेत दिलेला सर्व मजकूर काळजीपूर्वक वाचावा.
२. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, राज्यातील कृषी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविल.
३. सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेमध्ये (MHT-CET / JEE / NEET) संबंधित गटात (PCB / PCM ) प्राप्त झालेले पर्सेंटाईल व इतर अधिभार विचारात घेऊन प्रवेशाची गुणवत्ता निश्चित करण्यात येईल.
४. उमेदवाराने एकापेक्षा जास्त सामायिक प्रवेश परीक्षा दिलेल्या असल्यास / दोन्ही गटातून (PCB / PCM GROUP ) सामायिक प्रवेश परीक्षा दिलेली असल्यास लागू असलेल्या ज्या सामायिक प्रवेश परीक्षेत/ गटात जादा पर्सेंटाईल असतील त्या सामायिक प्रवेश परीक्षेचे /गटाचे पर्सेंटाईल विचारात घेण्यात येतील.
५. महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम १९८३ (४१) च्या कलम ५ मध्ये नमूद केल्यानुसार पदवी प्रवेशासाठी उमेदवार आणि त्यांच्या आई-वडिलांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य प्रवेश अर्ज दाखल करण्याच्या दिनांकाच्या दहा वर्षे पूर्वीच्या कालावधीत किमान तीन वर्षे असणे आवश्यक असून असे उमेदवार प्रवेशासाठी पात्र समजण्यात येतील. तथापि जे उमेदवार आणि त्यांच्या आई-वडिलांचे वास्तव्य मागील दहा वर्षांच्या कालावधीत ३ वर्षांपेक्षा कमी असेल असे उमेदवार राज्याबाहेरील उमेदवार म्हणून समजण्यात येतील व त्यांच्या करिता प्रवेश क्षमतेच्या दोन टक्क्यांपर्यंत जागा राखीव असतील.