गेल्या तीन आठवड्यांमधल्या लेखांमधून आपण वेगवेगळ्या खेळांबद्दल व्यक्तिमत्त्व चाचणीत काय प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पाहत आहोत. आजच्या लेखात आपण कबड्डी, खो-खो आणि हॉकी ह्या खेळांबद्दल काय प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पाहणार आहोत.

आतापर्यंत आम्ही टेनिस, टेबल टेनिस, बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केट बॉल, हॅन्ड बॉल याा खेळांबद्दलचे अपेक्षित आणि प्रत्यक्ष मुलाखतीत विचाल्या गेलेल्या प्रश्नांबद्दल लिहिलं आहे. आजच्या लेखात आपण कबड्डी, खो-खो आणि हॉकी ह्या खेळांबद्दल काय प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पाहणार आहोत. या पूर्वीच्या लेखांमध्ये आम्ही हे सांगितलंच आहे की कुठचाही क्रीडा प्रकार असो, काही कॉमन प्रश्न असतात. त्याची तयारी उमेदवारांनी करून ठेवलीच पाहिजे.

हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. त्यामुळे ह्या खेळाबद्दल, इतर खेळांपेक्षा वेगळ्या स्वरूपाचे प्रश्नही विचारले जाऊ शकतात. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ का आहे? क्रिकेटविषयी देशभरातले आकर्षण पाहता तुम्हाला असं वाटत नाही का की क्रिकेटच राष्ट्रीय खेळ असायला हवा? हॉकी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी देशात कोणते प्रयत्न सुरू आहेत? हॉकी खेळाचा सध्या ऱ्हास होत आहे का आणि या खेळाला पुनश्च सोन्याचे दिवस आणण्यासाठी कोणती पाऊले उचलाल? भारतीय हॉकी संघाला आजवर कोणते महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत? हॉकी खेळणाऱ्या काही प्रसिद्ध खेळाडूंची नावे सांगा? हॉकी खेळाशी संबंधित काही चित्रपट देखील आले आहेत, त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे आणि ‘चक दे इंडिया’ हा चित्रपट पाहिला का? दिल्लीमध्ये मेजर ध्यानचंद यांच्या नावाने स्टेडियम आहे, हे मेजर ध्यानचंद कोण होते? राष्ट्रीय खेळ दिवस भारतात का साजरा करतात? हॉकी खेळात पेनल्टी कॉर्नर आणि पेनल्टी स्ट्रोक यात काय फरक आहे? हॉकीच्या मैदानाचा आकार सांगा? तुम्ही हॉकी संघात कोणत्या पोझिशन वर खेळता? ओडिशा राज्यामध्ये हॉकीशी संबंधित काय प्रयत्न सुरू आहेत?

कबड्डी हा ऑलिम्पिक मध्ये खेळला जाणारा खेळ आहे का? कबड्डी या खेळाचा उगम कोणत्या देशात झाला? भारताव्यतिरिक्त आणखी कोणत्या देशांमध्ये कबड्डी खेळाला जातो? कबड्डी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? कबड्डीच्या टीम मध्ये किती खेळाडू असतात? या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटत? प्रो-कबड्डी लीग बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? भारताने कबड्डीच्या कोणत्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये यश मिळवलं आहे? कबड्डी खेळ ऑलिम्पिकचा हिस्सा बनण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे कबड्डी मधील वर्चस्व कमी होते आहे का? कबड्डीचा आशियायी पातळीवर खेळात केव्हा समावेश झाला? कबड्डी वर्ल्ड कप स्पर्धा केव्हा सुरू झाल्या? कबड्डी खेळाचे नियम, खेळाडू संख्या आणि मैदानाचा आकार याविषयी काय माहिती आहे?

खो-खो या खेळाचा उगम केव्हा आणि कोणत्या देशात झाला आहे? खो-खो च्या टीम मध्ये किती खेळाडू असतात? खो-खो हा खेळ ऑलिम्पिक मध्ये खेळला जातो का? बाळ गंगाधर टिळकांचा खो-खो शी काय संबंध आहे? खो-खो खेळासाठीच्या मैदानाचा आकार काय असतो? खो-खो खेळासंदर्भातल्या महत्त्वाच्या स्पर्धा कोणत्या आहेत? खो-खो ला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करू शकता? खो-खो स्पर्धकांना भारतात कोणते पुरस्कार दिले जातात? खो-खो खेळात कबड्डी सारखे प्रो-कबड्डी सामने किंवा एशियाड मध्ये समावेश का नाही? नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या खो-खो वर्ल्ड कप मध्ये पुरुष आणि महिला संघाचे विजेते कोण? कबड्डी आणि खो-खो खेळाला फारशा भांडवलाची आवश्यकता नाही तरी हे खेळ लोकप्रिय का नाहीत?

गेल्या काही लेखांमधून आपण बऱ्याचशा मैदानी खेळांबद्दल काय प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पाहिलं आहे. मैदानी खेळांबरोबर अनेक साहसी क्रीडाप्रकारही आहेत, याबद्दल माहिती पुढच्या काही लेखांमधून घेऊच.