डॉ, श्रीराम गीत  

मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं की, अनेक कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. हे कंगोरे खरे किती, का खोटे याच वास्तव दाखवण्याचा हा ‘आरसा’. मॉडेलिंग हे क्षेत्र जितकं आकर्षक तितकंच जीवनाचे अनेक पैलू सामोरे आणणारं. ग्लॉसी, सेलिब्रिटींचे जग किती कचकड्याचे असते हे रोजच पेज थ्री वर वाचायला मिळते. त्या जगाने आपल्या मुलीला ऑक्टोपस सारखा विळखा घातल्याने दु:खी झालेल्या पित्याचे म्हणणे…

मुलं टीनएज मध्ये येतात त्यावेळी घरात वादळ घेऊन येतात. काहसाताऱ्याजवळ एका छोट्या गावातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतल्या शिक्षकाचा मी मुलगा. आईने काही वर्षे बालवाडी शिक्षिका म्हणूनही काम केले. मोठी बहीण लवकर लग्न होऊन कोल्हापूरला दिलेली. शालेय शिक्षण सातारला झाल्यानंतर मी मुंबईला शिकायला आलो तो मुंबईकरच झालो. त्या काळात आयटी कंपन्या नव्याने उदयाला येत होत्या. माझी निवड करून माझी संपूर्ण करिअर ज्यांनी मार्गी लावली ते म्हणजे निरूताचे बाबा. माझ्या कंपनीचे ते एचआर हेड होते. तीन वर्षे मी कंपनीत स्थिरावल्या नंतर एका दिवशी त्यांनी घरी बोलावून निरूताशी ओळख करून दिली. जशी माझी करिअर त्यांनी लागी लावून दिली होती तीच गोष्ट त्यांनी निरूता कडून करवून घेतली होती.

हेही वाचा >>> यूपीएससीमध्ये मराठी यशवंतांच्या संख्येत घट

आपली मुलगी इंजिनीअर होणार नाही पण ती पायावर छान कशी उभी राहील याचे ते एक आदर्श ‘मॉडेल’ समजायला हरकत नाही. काय दुर्दैव आहे बघा, जो शब्द माझ्या मुली संदर्भात मला अजिबात आवडत नाही तो मॉडेल शब्द अगदी सहजपणे माझ्या पत्नीच्या करिअर संदर्भात मी वापरला. शरीराचा एखादा दुखरा भाग आंधळा झाल्यासारखा होऊन पुन्हा पुन्हा ठोकरा खातो आणि दु:ख खोलवर रुजत जाते तसे या मॉडेलिंग शब्दाचे माझ्यापुरते तरी झाले आहे.

ओढगस्तीत शिक्षण

माझे सारे लहानपण व त्यानंतरचे शिक्षण महिन्याच्या दोन तारखात थेंब थेंब मिळणाऱ्या पैशात बसवून झाले. हुशार असल्यामुळे फी माफी मिळाली. कमवा व शिका ही योजना आमच्या कॉलेजमध्ये असल्यामुळे बाबांकडून फार पैसे मागवण्याची वेळ मला आली नाही. ताईच्या लग्नाच्या खर्चातून बाहेर येता येता माझे मुंबईचे शिक्षण सुरू झालेले होते. मुंबईच्या चमकदार, विविध आकर्षणांनी भरलेल्या रंगील्या आयुष्याशी जुळवून घेणे विद्यार्थी म्हणून सुद्धा मला खूप कठीण गेले.

माझे कॉलेज माटुंग्याला मुंबईमध्ये होते. सुट्टीच्या दिवशी साधेसे धुवट कपडे घालून गेटवे ऑफ इंडियाला किंवा मरीन ड्राईव्हच्या नेकलेसला मित्रांबरोबर भटकायला गेलो तर दिसणाऱ्या मुंबईकर मुलींकडे मी व माझे गावाकडून आलेले मित्र चकीत नजरेने पहात रहात असू. त्यांच्या अंगावरचे तोटके कपडे, मित्र-मैत्रिणींचा आपापसात ओतू जाणारा उत्साह, सकारण किंवा विनाकारण एकमेकांना मारल्या जाणाऱ्या मिठ्या हे सारे हिंदी सिनेमातील पडद्यावर चालल्यासारखे दृश्य माझ्या मनावर कोरले गेलेले आहे. थिएटर मधले पडद्यावरचे जग आपले नव्हे हे माझे भान आजही जागेवर आहे. नोकरी लागल्यानंतर जेव्हा निरूशी लग्न झाले तेव्हा अशा जगात रुळलेली ती माझ्या घरात आली. तरीही तिच्या व्यवसायाचे सारे उद्याोग आणि त्यातील माणसे तिने घरापासून दूर ठेवले होते. अमिताच्या शाळेच्या निवडीपासून सगळ्या गोष्टी तिच्या हाती असल्याने त्यात मला फारसे कधी लक्ष घालावे लागले नाही. मात्र, निरू ज्या पद्धतीत वाढली होती त्याच पद्धतीत अमिताची वाटचाल सुरू होती हे मला कधीकधी खटकत असे. पेरेंट्स डे ला अमिताच्या शाळेत गेल्यानंतर हे जास्तच प्रकर्षाने मला जाणवे. यावर निरूने माझी अनेकदा समजूत घातली. पण ती साताऱ्याकडच्या शाळेच्या वातावरणाची थोड्या टिंगलीच्या सुरात केलेली भलावण स्वरुपात होती. ‘‘परीक्षेतले गुण हे सर्वस्व नाही तर सर्वांगीण विकास हेच खरे गुण असतात’’, हे तिचे आणि तिच्या आईचे लाडके वाक्य. अमिताच्या अभ्यासाबद्दल मी काही बोलण्याच्या आत हे वाक्य ऐकण्यातच माझी दहा वर्षे गेली. आता माझे कोणतेही वाक्य ऐकायला अमिता काही घरात नसते आणि निरूची अवस्था यातील काही ऐकण्यातली राहिलेली नाही.

हेही वाचा >>> मुंबईच्या TISS मध्ये ‘या’ पदासाठी भरती होणार! २८ एप्रिलआधी करा अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष

मॉडेलिंगचा किडा घरात शिरला

त्या दिवशीच्या प्रसंगात काय घडलं ते उडत उडत अमिताने मला दोन महिन्यांनी सांगितले. तेही मासिकात छापून आल्यानंतर. स्वत:ला आरशात बघताना सुद्धा प्रत्येकाच्या मनात कौतुक आणि आनंद असतो. एखादा फोटो पाहताना सुद्धा त्या फोटोतील ‘मी’ कसा दिसतो किंवा दिसते यावरच प्रत्येकाची नजर स्वाभाविकपणे खिळून राहते. सतत सेल्फी काढून इन्स्टाग्रामवर पोस्ट करायचा जमाना आहे. पण घरोघर जाणाऱ्या मासिकामध्ये अर्ध्या पानाचा आपल्या मुलीचा फोटो यावा किंवा असावा हे माझ्या संकल्पनेत चुकून सुद्धा बसणारे नव्हते. मी ते मासिक ऑफिसमध्ये पाहिले तेव्हा गाडी काढून तडक घरी आलो. निरूता समोर ते टाकले. मला जसा अमिताचे फोटो पाहून धक्का बसला होता तसा धक्का तर सोडाच पण निरूच्या नजरेमध्ये व देहबोली मध्ये कौतुक स्पष्ट दिसले. जेव्हा तिने नजर माझ्या चेहऱ्याकडे वळवली तेव्हा माझा उफाळून आलेला संताप तिला जाणवला. हे काय म्हणून तिला विचारले तर तिने चक्क कानावर हात ठेवले. आपल्या मुलीचे फोटो कोणी काढले, ते कोणी छापायला दिले, हे सारे तिला आई म्हणून सुद्धा माहीत नसावे यामुळे माझ्या संतापाचा विस्फोट झाला.

प्रश्नांचे मोहोळ

काम करायचे, मिळवायचे ते कोणा करता? जगण्याचे उद्दिष्ट कोणते? आई-वडिलांनी घालून दिलेली नैतिक मूल्ये मी मुंबईच्या मायावी नगरीत विसरून गेलो काय? अमिताचे पुढे काय होणार? तिच्याबद्दलची रंगवलेली आमची स्वप्ने हवेत विरणार काय? अशा साऱ्या प्रश्नांनी रोज रात्र मला खाऊन टाकत असे.

ग्लॉसी, सेलिब्रिटींचे जग किती कचकड्याचे असते हे रोजच पेज थ्री वर वाचायला मिळते. त्या जगाने अमिताला आता ऑक्टोपस सारखा विळखा घातला होता हे लवकरच माझ्या लक्षात आले. साध्याशा बीए सारख्या अभ्यासक्रमात ती नापास झाली याचे दु:ख तिच्या चेहऱ्यावर तर नव्हतेच. पण माझ्या तोंडावर अर्ध्या लाखाचे कॉन्ट्रॅक्ट मी कसे साइन केले आहे, हे तिने येऊन ऐकवले. मी रागावून तिला काही ऐकवणार त्या आधीच तिने थंडपणे सांगितले मी तासाभरात तुमचे घर सोडून जात आहे. तुमचे हा शब्द आजही मला लाजवतो.

हे कसले जिणे लाजीरवाणे

मानसिक आजारग्रस्त निरू, कंटाळवाणे आयटी मधले काम करत जिणे, नकोसे वाटणारे पण पाहायला लागणारे अमिताचे चमत्कारिक फोटो, देवा घरी गेलेल्या आई-वडिलांच्या सात्विक आठवणी यांचीच सोबत मला सतत असते.

अलीकडेच टीव्ही वरच्या सिरीयल मधून दिसलेल्या माहितीनुसार किमान आर्थिक स्थैर्याकडे माझी मुलगी पोहोचली असावी, हेच काय ते एकुलते एक समाधान.