लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्व चाचणीमध्ये वैकल्पिक विषयानुसार काय प्रश्न येऊ शकतात हे आपण गेल्या दोन लेखांमध्ये पाहिलं. उमेदवारांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या विषयांमध्ये आणखी एक लोकप्रिय विषय आहे गणित.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वसाधारणत: आयआयटीमधून इंजिनीअरिंग केलेले अथवा बीएससी, एमएससी डिग्री घेतलेले उमेदवार हा वैकल्पिक विषय घेतात. गणितासंबंधी काय प्रश्न विचारले जातात ते पाहूया. वैदिक काळातील महत्त्वाचे भारतीय गणितज्ञ आर्यभट्ट, वराहमिहीर, ब्रम्हगुप्त, भास्कराचार्य, पाणिनी यांच्या कार्याविषयी काय माहिती आहे? त्यांनी गणित विषयात काय योगदान दिले आहे? भारतात कोणी महत्त्वाच्या स्त्री गणितज्ञ होऊन गेल्या आहेत का? त्यांचे योगदान काय होते? राष्ट्रीय गणित दिवस का साजरा करतात? श्रीनिवास रामानुजन यांचे गणित विषयातील कोणते योगदान आहे? गणित या विषयासाठी नोबेल प्राईज आहे का? गणित विषयातील कामगिरीसाठी मिळणारी महत्वाची पारितोषिके कोणती? कुठच्या पुरस्काराला गणितातले नोबेल म्हटले जाते? गणित विषयाचा तुम्हाला प्रशासनात काय उपयोग आहे? गणित किंवा गणितज्ञ याबद्दल काही चित्रपट तुम्हाला माहीत आहेत का? बऱ्याच शाळकरी मुलांना गणिताची आवड नसते, त्यांना गणिताची भीतीही वाटते- ही नावड आणि भीती दूर करण्यासाठी काय करावे असे तुम्हाला वाटतं ? गणितज्ञ ह्या भूमिकेतून विश्व हे मर्यादित आहे की अमर्यादित आहे हे सांगा. ब्लॅक होल्स मर्यादित आहेत की अमर्यादित आहेत? सेंट्रल लिमिट थिअरम काय आहे? बायेस थिअरम काय आहे? काहीवेळा एखादा मॅथेमॅटिकल प्रॉब्लेम सोडवायला सांगू शकतात. परमेश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी गणितातल्या कुठच्या संकल्पनांचा दाखला दिला जातो? गणिताच्या आधारे परमेश्वराचे अस्तित्व सिद्ध करता येईल का?

● आरोग्यविषयक प्रश्न

एमबीबीएस डॉक्टर असणारे उमेदवार मेडिकल सायन्स हा वैकल्पिक विषय घेतात. या विषयावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पाहूया. एकूणच आरोग्य हा देशासाठी आणि देशातल्या नागरिकांसाठी महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे उपयोजित स्वरूपाचे प्रश्न जास्त विचारले जाऊ शकतात. कोविडनंतर एकूणच आरोग्याबद्दल जागरुकता वाढली आहे आणि त्यासंबंधी बरीच माहिती विविध ठिकाणी उपलब्ध आहे. मेडिकल सायन्स या विषयाचा प्रशासनात काय उपयोग आहे? तुमच्या जिल्ह्यातले तीन महत्त्वाचे आरोग्यविषयक प्रश्न कोणते? तुमच्या मते आपल्या देशासमोरच्या तीन महत्त्वाच्या आरोग्यविषयक समस्या कोणत्या? या समस्यांवर उपाय काय? भारत सरकारच्या आरोग्यविषयक योजना कोणत्या आहेत? या योजनांना कितपत यश मिळालं आहे ? केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात आरोग्य ह्या विषयावर किती कोटींची तरतूद असते? ड्रग आणि मेडिसिन यात काय फरक आहे? ताप कशामुळे येतो? ताप हा आजार आहे की ते लक्षण आहे? जेनेरिक मेडिसिन भारतात लोकप्रिय का नाहीत? आपण चीनकडून अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडिअंट्स खरेदी करतो आणि चीन हा देश भारताकडून जेनेरिक मेडिसिन का खरेदी करतो ? औषधांची आयात करतो की निर्यात करतो? व्हॅक्सिन डिप्लोमसी म्हणजे काय? भारताला फार्मसी ऑफ वर्ल्ड असे का संबोधले जाते? भारतात वैद्याकीय शिक्षण महागडे का आहे? डॉक्टर म्हणून कोविडच्या साथीने तुम्हाला काय शिकवलं? डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांवर उपाय काय? भारतात अँटिबायोटिक्सचा बेबंद वापर केला जातो हे खरे आहे का?

भारताला डायबिटीसची राजधानी म्हटले जाते , असे का? डायबिटीस हा आजार आहे का? मधुमेहाचे किती प्रकार आहेत? मधुमेहाला सायलेंट किलर का म्हणतात? इन्सुलिन रेझिस्टन्स आणि डायबिटीस हे सारखे आहेत का? आयुर्वेद, योगसाधना यांचा कितपत फायदा आहे? आयुष डॉक्टर मंडळींना अॅलोपथी प्रॅक्टिस करण्यासाठी परवानगी द्यावी की नाही? भारतात एक लाख लोकसंख्येमागे किती डॉक्टर्स आहेत? ब्रिज कोर्स काय आहे? आजकाल प्रसूतीसाठी मोठ्या प्रमाणावर सिझेरियन होतात, ह्याबद्दल तुमचं मत काय आहे? प्रसुतीपूर्व लिंग निदान चाचणीला बंदी घालणारा कायदा कितपत यशस्वी झाला आहे असे तुम्हाला वाटते? आजकाल युक्रेन,रशिया अशा देशात जाऊन वैद्याकीय शिक्षण घेण्याचे प्रमाण का वाढले आहे? तिथून डॉक्टर होऊन आलेल्या विद्यार्थ्यांना इथे भारतात लगेच प्रॅक्टिस सुरू करता येते का? भारतात झिका या आफ्रिकेतून आलेल्या रोगाची लागण राजस्थान आणि केरळ राज्यात कशी झाली? इबोला आणि झिका ही विषाणूची नावे कशी आली? डॉक्टरांजवळ किटमध्ये कोणत्या प्रकारची अत्यावश्यक औषधे असतात? २०३० पर्यंत भारतातून एचआयव्ही विषाणूचा पूर्णपणे बिमोड करण्यासाठी कोणती उपाययोजना केली जात आहे? मानवाचे रक्त आणि प्राण्याचे रक्त यात काय फरक असतो? भारतात दिवसेंदिवस मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या का वाढत आहे? आपल्या कडे तेवढ्या मोठ्या प्रमाणात मानसोपचार तज्ञ आहेत का? प्लासिबो इफेक्ट म्हणजे काय?

सध्या मोठ्या प्रमाणावर डॉक्टर आणि इंजिनीअर उमेदवार नागरी सेवा परीक्षा देत असतात त्यामुळे इंजिनीअरिंग शाखेबद्दलही बरेच प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्या प्रश्नांचा विचार पुढच्या लेखात आपण करूच.

यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन

नागरी सेवा परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल २२ एप्रिलला संघ लोकसेवा आयोगाने जाहीर केला. आनंदाची बाब अशी की महाराष्ट्रातल्या अर्चित डोंगरे या विद्यार्थ्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रातून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. आम्हाला याही गोष्टीचा विशेष आनंद आहे की आम्ही मार्गदर्शन केलेला शिवांश सुभाष जगडे हा पुण्याचा विद्यार्थी वयाच्या २२व्य वर्षी, पहिल्याच प्रयत्नात भारतात २६ व्या क्रमांकावर यशस्वी झाला आहे. मराठी टक्का निश्चितपणे वाढतो आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.

mmbips@gmail. com

supsdk@gmail. Com

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Questions on mathematics in the personality test of the civil services examination of the public service commission amy