Success Story : असं म्हणतात, जिद्द असेल तर सर्व काही मिळवता येते. कोणतेही यश मिळवण्यासाठी वयाचे बंधन नसते, त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. आज आपण अशाच एका २४ वर्षीय तरुणाविषयी जाणून घेणार आहोत ज्याने अत्यंत कमी वयात भरघोस यश मिळवले आहे. गुरुग्राममध्ये राहणाऱ्या युग भाटियाने वयाच्या २१ व्या वर्षी २०२० मध्ये Control Z नावाची कंपनी सुरू केली. ही कंपनी जुने स्मार्टफोन अगदी नवे बनवण्याचे काम करते. स्मार्टफोन फक्त बाहेरून नाही तर स्मार्टफोनच्या आतील भागसुद्धा ते बदलतात. जुन्या स्मार्टफोनला नवीन स्मार्टफोनमध्ये बदलण्याचे कंपनीचे ध्येय आहे.
युग भाटियाची ही कंपनी आता २५ कोटींचा टर्नओव्हर करत आहे. कंपनीने आता टार्गेट वाढवून १०० कोटी रुपये केले आहे. युगला मिळालेलं यश इतकं सोपं नव्हतं. आज आपण त्याच्या या प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Control Z कंपनीचे काम

दिल्ली युनिव्हर्सिटीमधून ड्रॉपआउट झालेला युग भाटिया आता Control Z चा सीईओ आहे. हे सर्व शक्य झालं, त्याने दाखवलेल्या धाडसामुळे. त्याने स्वत:चा बिझनेस सुरू करण्याचा विचार केला आणि प्रत्यक्षात उतरवला. त्याची ही कंपनी जुन्या स्मार्टफोनला नवीन बनवते. जेव्हा कोणताही जुना फोन त्यांच्याकडे येतो, तेव्हा ते त्या फोनची नीट तपासणी करतात. इंजिनिअर फोनची बॅटरी, कॅमेरा, डिस्प्लेसारखे महत्त्वाचे पार्ट्स नीट दुरुस्त करतात. कंपनी ८० टक्के जुन्या पार्टसचा वापर करण्याचा प्रयत्न करते. फोन बाहेरून चांगला दिसण्याबरोबर आतूनसुद्धा चांगलं काम करेल, यासाठी कंपनी काम करते.

कंपनी करते पर्यावरणाचे संरक्षण

युग भाटियाची कंपनी पर्यावरणाचेसुद्धा संरक्षण करत आहे. फोन बनवण्यासाठी कार्बनचे उत्सर्जन केले जाते, जे पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक आहे. कंपनी जुन्या फोनला नवीन बनवून विकते, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होते. कंपनीने आतापर्यंत ६०,००० फोन नवीन बनवून विकले आहेत, यामध्ये अॅपल आणि वनप्लस स्मार्टफोनचा समावेश सर्वात जास्त आहे. हे फोन नवीन फोनपेक्षा ६० टक्के कमी किमतीने विकले जातात. याचे ‘रिन्यू हब’ नावाचे रिपेयरिंग सेंटर गुरुग्राममध्ये आहे. हे सेंटर टेक्नोलॉजी आणि पर्यावरणाला लक्षात घेऊन बनवले आहे.

युग भाटियाला आता कंपनीचं टार्गेट वाढवायचं आहे. दरवर्षी सहा लाख फोन दुरुस्त करण्याची त्याची इच्छा आहे. यासाठी कंपनी रिसर्च डिपार्टमेंट सुरू करण्याचा विचार करत आहे, ज्याचा फायदा कंपनीला होऊ शकतो; यामुळे कंपनीला १०० कोटींचे टार्गेट पूर्ण करण्यास मदत होईल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yug bhatia started control z company at the age of 21 year old who coverts old smartphones into new read success story ndj