अंदमानच्या भेटीतला तो विलक्षण अनुभव.. अनुराधा गाइडचं तिथल्या पशू-प्राण्याशी असलेलं नातं.. त्यांच्यातले संवाद ऐकले आणि भारावलोच ..
महाकवी कालिदासाच्या ‘अभिज्ञान शाकुंतल’मधील कण्व मुनींच्या आश्रमातील हरिणांशी असलेल्या शकुंतलेच्या भावबंधाविषयी वाचलं होतं. मात्र माणसापासून चारहात लांबच राहणारी, पण प्राण्यांबरोबर तेच प्रेमाचे बंध आजही कोणीतरी ठेवून आहे. याचा विलक्षण अनुभव यायला अंदमानातील रॉस आयलंडवर पाऊल ठेवावं लागलं.
हिरव्या-निळ्या नितळ समुद्रानं वेढलेलं हे हिरवंगार बेट खरं तर प्रसिद्ध आहे तिथल्या ब्रिटिशकालीन इमारतींच्या भग्नावशेषांसाठी. चर्च आणि इतर अनेक इमारतींचे आज फक्त सांगाडे उरलेत. त्यात आजूबाजूची झाडं घुसून एक विलक्षण गूढ वातावरण तयार झालंय.
समोरच्या झाडावर बुलबुलचे दर्शन होताच माझ्या पक्षीप्रेमी नवऱ्याने कॅमेरा सरसावला. त्यावर ‘बुलबुल की फोटो चाहिये? रुकिये.’ म्हणून विशिष्ट आवाजात हाका मारीत तिने अनेक बुलबुल जमविले. ‘और किसे बुलाऊँ?’ म्हणत पुन्हा वेगळा आवाज काढला आणि क्षणात झाडावरून तुरुतुरू उतरणाऱ्या खारी हजर! त्यांना ‘यहाँ नहीं, उपर जाकर बैठों,’ असा आदेश दिल्याबरोबर त्यातील एक तुरुतुरू चढत वरच्या फांदीवर अगदी कॅमेऱ्याकडे टुकुटुकु बघत बसली.
ती सांगत असलेली माहिती ऐकत थोडं पुढे गेल्यावर चक्क एक मोर सामोरा आला. ‘अकेले क्यों आयें? और सब कहाँ हैं?’ असं तिने म्हटल्याबरोबर क्षणात चारपाच लांडोरी आणि तीनचार मोर आमच्याबरोबर चालू लागले. तिच्या हातातून ब्रेड खाणाऱ्या पक्ष्यांना आम्ही मात्र घाबरून खाली तुकडे टाकत होतो.
या सर्व प्रकाराने भारावून गेलेले आम्ही दिङ्मूढ होऊन पाहात राहिलो. माणसाने मुक्या ठरविलेल्या या मंडळींबरोबर वेळ घालवून आदल्या दिवशी सेल्युलर जेलमधील छळाच्या कहाण्या ऐकून आणि वीर सावरकरांची कोठडी पाहून आलेलं नैराश्य काही प्रमाणात कमी झालंच. पण एक विलक्षण अनुभव आमच्या गाठीशी बांधला गेला तो कायमचाच..
संग्रहित लेख, दिनांक 23rd Feb 2013 रोजी प्रकाशित
आधुनिक शकुंतला
अंदमानच्या भेटीतला तो विलक्षण अनुभव.. अनुराधा गाइडचं तिथल्या पशू-प्राण्याशी असलेलं नातं.. त्यांच्यातले संवाद ऐकले आणि भारावलोच ..महाकवी कालिदासाच्या 'अभिज्ञान शाकुंतल'मधील कण्व मुनींच्या आश्रमातील हरिणांशी असलेल्या शकुंतलेच्या भावबंधाविषयी वाचलं होतं. मात्र माणसापासून चारहात लांबच राहणारी, पण प्राण्यांबरोबर तेच प्रेमाचे बंध आजही …
First published on: 23-02-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An amazing experience of andaman tour