मला ‘राष्ट्रीय नाटय़ विद्यालयातला’ माझा शेवटचा दिवस आठवतो. आम्हा सर्वाच्या गाजलेल्या भूमिकांसारखी वेशभूषा, रंगभूषा करून ज्युनिअर्सनी आमच्यासाठी आगळी मिरवणूक काढली होती. त्या मिरवणुकीत अचानक मला मीच दिसले. ‘चेकोव्ह’च्या ‘सीगल’ नाटकातल्या ‘नीना’च्या रूपात. माझा तो ‘नीना’चा वेश मी स्वत: तयार केला होता.. त्या गुंजक्षणांचा तो गाऊन घालून कुणी दुसरीच माझ्याकडे बघून हसत त्या मिरवणुकीतून रंगमंचावर गेली आणि मला ‘संपणं’ कळलं.. विद्यालयातलं माझं ‘संपणं’. वाटलं, उद्या मी विद्यालयात नसेन पण ‘नीना’ असेल..  कुण्या अनिताचा शेवट ही माझी सुरुवात होती. आता माझा शेवट ही दुसऱ्या कुणाची सुरुवात आहे. ही जाणीव त्या क्षणी दु:खद वाटली. पण तिथूनच माझं मोठं होणं सुरू झालं असं वाटतं..
लहानपणी आवडणारी गोष्ट संपत आली की, आधीच वाईट वाटायला लागायचं आणि नावडती गोष्ट सुरूच होऊ नये असं वाटायचं. म्हणजे सुट्टी संपायच्या सहा दिवस आधीच ती संपत आलेली आहे याची खोल टोचणी सुरू झालेली असायची. ती एकेका दिवसानी तीव्र होत होत शाळा सुरू व्हायच्या आधीचे दोन दिवस काळवंडलेलेच जायचे किंवा आजी आजोळहून पुण्यातल्या घरी राहायला आल्या दिवशीच मी तिला विचारायचे, ‘‘तू कधी जाणारेस?’’ मोठं कुणीतरी दटावून म्हणायचं, ‘‘ए, असं विचारतात का?’’ असं वाटण्याची असोशी असायची. आजी जर म्हणाली, ‘‘आता चांगले चार दिवस इथंच आहे!’’ तर तिसऱ्या दिवसाच्या दुपारपासूनच मन काळवंडायला लागायचे. मग उरलेला दीड दिवस ‘आजी जाणार’चं दु:ख जाऊन येऊन असायचं आणि चौथ्या दिवशी शाळेतून यावं तर आजीची बॅग नसायचीच. शाळेत वाटून जायचं, ‘बदलला पण असेल कदाचित तिचा कार्यक्रम.. असेल ती घरी..’ पण घरी आल्यावर आजीची बॅग नसलेली रिकामी जागा आत खड्डा पाडायची.
मला आठवतं, लहानपणी खूप आवडणारं, जिवाभावाचं कुणी घरी आलं असेल तर ते निघणार म्हटल्यावर मला त्यांचा रागच यायला लागायचा, खूप राग. आता या रागाला समजावायला हळूहळू शिकते आहे. पण पूर्वी मी या ‘प्रेमाच्या’ रागाने कितीतरी सुंदर भेटींचे शेवट गढूळ करून घेतलेले आहेत. या गढूळ क्षणांनी मला शिकवलं आहे, आवडतं मुठीत ठेवायची जीवघेणी असोशी काही खरी नव्हे!
आवडतं पुस्तक मी बऱ्याच वेळा पूर्ण वाचूच शकलेली नाही. खूप कमी वेळा मी त्या पुस्तकाच्या शेवटच्या पानापर्यंत स्वत:ला जाऊ दिलं आहे. कारण ते पान वाचल्यावर ते पुस्तकही आवडत्या माणसासारखी बॅग घेऊन चालू लागेल, अशी भीती माझ्यातल्या एका छोटय़ा मुलीला वाटत असावी. नाहीतर कितीतरी आवडती पुस्तकं मी अशी अर्धीमुर्धी कशी सोडू शकेन.. कुठलंही पुस्तक वाचायला घेतलं की त्याचं नातं जुळायला लागतं. माणसासारखंच. कधी कधी त्याच्याहूनही घट्ट.. मग जसजशी पानं उलटायला लागतात तसतसं तुम्ही आणि पुस्तक एकमेकांचे व्हायला लागता. मग जीव गुंतायला लागतो. ‘कधी एकदा ते पुस्तक हातात घेते आहे’ अशी असोशी वाटायला लागते. मग त्याचा हात धरून ते नेईल तिकडे, फुटेल त्या वाटेनं भान हरपून चालताना एका क्षणी जाणवतं, ‘‘हे मला भयंकर आवडतं आहे!’’ आणि मग मी थांबते. म्हणजे दर दिवशी भराभर काम आटोपून झपाटय़ानं ते पुस्तक उघडून अधाशीपणा करणारी मी एके दिवशी अचानक ते उघडतच नाही.
मी या अवचित तुटण्याचा शोध घेत होते.. कदाचित असं असावं, माझ्यासाठी ते पुस्तक म्हणजेच आयुष्य होऊन बसलेलं असतं. मला वाटतं, ‘‘हे संपलं तर मी संपेन. हे संपलं तर सगळी मजाच संपेल. शिवाय पुन्हा इतकं काही आवडलंच नाही तर? नवीन नवीन आवडीचं शोधण्यात खूप धडपड आहे. त्यापेक्षा हे आहे हेच कवटाळते. अशा वेळी आवडीचे दुसरं पुस्तकही असू शकतं ही शक्यताच दिसत नाही मला. कधी कधी असंही वाटतं, मला आवडत नसतानाही माझी साथ सोडावी लागणाऱ्या माणसांचा त्या त्या वेळी आलेला राग मी या माझ्या आवडत्या पुस्तकांवर काढू पाहाते का.. त्यांची साथ अशी मध्येच सोडून.. मग मला तात्पुरतं जिंकल्यासारखं वाटतं का.. म्हणजे आवडत्या आजीला थांबवता आलं नाही तर आवडतं पुस्तक मी मध्ये थांबवलं आहे. त्याच्या माझ्या एकत्र प्रवासाचा शेवट लांबणीवर टाकून! माझ्या परिनं माझा एक हट्ट पुरवायला बघते का मी? बालहट्ट असला तरी? पण हीच मी स्वत:ला शिक्षाही देते आहे. आवडतं काबीज करण्याच्या या माझ्या अट्टहासामुळे कितीदा तरी आवडती गोष्ट संपण्याआधीच संपून गेल्यासारखी वाटलेली आहे. आता वाटतं, हे असं वाटणं स्वाभाविक पण त्याच्या अट्टहासानी खूप कोतं व्हायला होतं. भरभरून आवडतं काहीसे झोकून देऊन करत असताना, ‘हे आवडतं कधी ना कधी संपणार..’ हे मनात येताक्षणी ते भरभरून कोसळणं थांबून गोठून जायला होतं. शेवटचा, निरोप क्षण कितीही घाला घालणारा वाटला, तरी आवडत्या गोष्टीची साथ अशी मध्येच सोडणं काही खरं नव्हे. शिवाय पुस्तक उघडणं, न उघडणं हे माझ्या हातात आहे एक वेळ, त्याचा माझा प्रवास असा एका क्षणी मला हव्या त्या पानाशी ‘बुकमार्क’ घालून मी अर्धवट थांबवेनही, पण आयुष्य असं एखादा दिवस आवडला म्हणून त्याच्यापाशी ‘बुकमार्क’ घालून थांबवता येतं? आयुष्य कितीतरी ‘सुरुवातींनी’ आणि ‘शेवटांनी’ भरलेलं आहे. पण म्हणून ‘सुरुवात’ आणि ‘शेवटचं’ तेवढे महत्त्वाचे का..? त्या ‘सुरुवातींच्या’ आधी आणि ‘शेवटांच्या’नंतरही आयुष्य असतं.. त्याचं काय..?
मला ‘राष्ट्रीय नाटय़ विद्यालयातला’ माझा शेवटचा दिवस आठवतो. तिथले शेवटचे काही दिवस प्रत्येकासाठीच दडपणाचे असतात. तीन वर्षे विद्यालयात सुरक्षिततेत घालवलेली असतात. शिक्षकांनी प्रेम केलेले असतं. मित्र-मैत्रिणींनी प्रेम केलेले असतं आणि आता ते संचित होऊन बाहेर पडायची वेळ येऊन ठेपलेली असते. ‘कुठं जायचं, काम मिळेल का.. काय काय करायचं..? पैसे मिळवायचेत..’ अनेक ‘सुरुवातींची’ प्रश्नचिन्हं समोर उभी. गेली तीन वर्षे पुण्याहून या शाळेसाठी दिल्लीला यावं लागायचं, तेव्हा दरवेळी मन जड व्हायचं. तेव्हा पुण्याला कवटाळावंसं वाटायचं. पण आता विद्यालय सोडायची वेळ आली, तेव्हा विद्यालयाला कवटाळावंसं वाटायला लागतं. ‘आवडतं’ आणि ‘नावडतं’ पण किती सापेक्ष असतं! तर त्या दिवशी विद्यालयातला शेवटचा दिवस म्हणून मी विद्यालयभर नुसतीच फिरत होते. चहाच्या टपरीवर बसून बघ, कॉश्च्यूम डिपार्टमेंटमधल्या आवडत्या कौर मॅडमना मिठी मारून रडून घे, असे उद्योग चालू होते. संध्याकाळी निरोप समारंभ होता म्हणून तयार व्हायला हॉस्टेलला निघाले तर वाटेत कॉरिडोअरमध्ये रॉबिन दास! माझे विद्यालयातले सगळ्यात आवडते सर! सर जगावेगळे! ते कुठल्या क्षणी काय विचारतील याचा नेम नाही. पण ते जो कुठला प्रश्न विचारतील तो तुम्हाला आतून खडबडून हलवणार हे नक्की. कॉरिडोअरमध्ये फक्त ते आणि मी. सर समोर आले आणि अचानक मला म्हणाले, ‘‘तुमने ‘आय अ‍ॅम ओके यू आर ओके’ ये किताब पढी है? पढो!’’ मला वाटलं होतं सर माझ्या या ‘शेवटच्या’ दिवसाविषयी काहीतरी बोलतील पण सरांनी वेगळंच विचारलं. मला अचानक म्हणाले, ‘‘तुम यहाँ क्यो आई? विद्यालयमे?’’ मी दचकलेच. आता माझी जायची वेळ आली आहे आणि सर आत्ता हे काय विचारतायेत.. मी एकदम घाबरून पोपटासारखी उत्तरले, ‘‘क्यूँकी मुझे अ‍ॅक्टिंग अच्छी लगती है।’’ ते मंद हसून म्हणाले, ‘‘जल्दबाजी मत करो, सोचो।’’ आणि निघून गेले. मला मागून ओरडून विचारावंसं वाटतं, ‘‘म्हणजे काय सर?’’ मी शेवटापाशी उभी आहे आणि हा माणूस मला ‘सुरुवाती’पाशी काय नेतो आहे? एकदम राग आला. असं काय करतात ही लोकं? बाबा आठवले. कुठलंही गणित त्यांना विचारलं की, त्या धडय़ाच्या सुरुवातीपाशी घेऊन जायचे मला. राग यायचा. ‘किती वेळ घालवतात’ वाटायचं. इथल्या इथे सांगा ना. मागे काय जायचं? म्हणून ‘शेवट’ आवडत नाही असा. ‘शेवटा’पाशी ताळा घ्यावा लागतो. ‘सुरुवाती’पासून मोठं व्हावं लागतं. त्याचा त्रास होतो. सर निघून गेल्यावर आतून हलायला झालं. म्हणजे काय म्हणायचं होतं सरांना? चुकलं आहे का सगळं आयुष्य माझं? मन कालवलं. पण रडव्या भाबडेपणातून बाहेर येऊन विचारही करायला लागलं.
संध्याकाळी आम्हाला निरोप देण्यासाठी आमच्या ज्युनिअर्सनी ग्रँड सोहळा ठेवला होता. आम्हाला सगळ्यांना डोळे बांधून विद्यालयाच्या प्रमुख प्रवेशद्वाराशी नेण्यात आलं. डोळ्यावरची पट्टी काढली तर समोर चक्क एक महाकाय हत्ती! एक एक करून आम्हाला त्या हत्तीवरून विद्यालयाच्या मागच्या दाराशी वाजतगाजत नेण्यात आलं. मग तिथे खाली उतरवलं तेव्हा इतक्या उंचावरून जमिनीवर पाय ठेवताना मला वाटलं हीच सुरुवात आहे. तीन वर्षे विद्यालयात वाजतगाजत हत्तीवर बसून तरंगत गेलीत. आता हत्तीवरून खाली उतरून जमिनीवर पाय टेकायची वेळ आली आहे. आम्हाला ओवाळून ‘अभिमंच’ नावाच्या विद्यालयाच्या थिएटरमध्ये नेण्यात आलं. गेल्या तीन वर्षांतली आमची बरीचशी नाटकं आम्ही याच रंगमंचावर केलेली. आम्ही तिसऱ्या वर्षांचे सगळे विद्यार्थी ‘अभिमंच’मध्ये प्रेक्षकांच्या खुच्र्यावर बसतो तोच ‘अभिमंच’च्या दाराशी अचानक ढोल-ताशांचा गजर सुरू झाला. मुख्य दरवाजातून एक मिरवणूक आत येत होती. ती पुढे पुढे येत रंगमंचाच्या दिशेने जात असताना तिसऱ्या वर्षांतला आमच्यातला प्रत्येक जण थोडासा दचकायला लागला. प्रत्येकाला वाटलं, आपणच त्या मिरवणुकीत आहोत, कारण गेल्या तीन वर्षांतल्या आम्हा सर्वाच्या गाजलेल्या भूमिकांसारखी वेशभूषा, रंगभूषा करून ज्युनिअर्सनी आमच्यासाठी हा आगळी मिरवणूक काढली होती. त्या मिरवणुकीत अचानक मला मीच दिसले. ‘चेकोव्ह’च्या ‘सीगल’ नाटकातल्या ‘नीना’च्या रूपात. माझा तो ‘नीना’चा वेश मी स्वत: तयार केला होता. मूळ खादीचा गाऊन होता, पण ‘सीगल’ पक्षी मनात ठेवून मी कॉश्च्यूम डिपार्टमेंटच्या कौर मॅडमना त्या गाऊनला कमरेपाशी बाजूला, पंखासारखे दिसतील असे दोन गुलाबी जॉर्जेटचे तुकडे लावायला सांगितले होते. विद्यालयाच्या मागच्या रस्त्यावर गुंजांची झाडं होती. त्या गुंजा गोळा करून गाऊनच्या गळ्याभोवती चिकटवल्या होत्या. तो गाऊन घालून खूप आरसे लावलेल्या आमच्या अभिनयाच्या वर्गात प्रत्येक आरशात बघून अगणित वेळा करून पाहिलेली ती ‘नीना’ची शेवटची वाक्यं.. त्यातलं जवळ जवळ प्रत्येक वाक्य चेकोव्हनी अर्धवट सोडलेलं आहे. त्या अर्धवट वाक्यांचा शेवट काय असेल यावर विचार करण्यात घालवलेले किती किती ‘नीनामय’ क्षण.. त्या गुंजक्षणांचा तो गाऊन घालून कुणी दुसरीच माझ्याकडे बघून हसत त्या मिरवणुकीतून रंगमंचावर गेली आणि मला ‘संपणं’ कळलं. विद्यालयातलं माझं ‘संपणं’. वाटलं, उद्या मी विद्यालयात नसेन पण ‘नीना’ असेल. ‘सीगल’ नाटक पुन्हा होईल तेव्हा ती दुसरी कुणी कदाचित याच वेशभूषेत तिच्या तिच्या रस्त्यांनी जाईल आणि तिची ‘नीना’ जिवंत करेल. मग एकदम वाटलं, मी त्या गाऊनला ‘माझा’ म्हणते. तो ‘माझा’ कसा एकटीचा? तो मुळात होता ना कॉश्च्यूम डिपार्टमेंटमध्ये एका हँगरवर.. मी त्याला माझ्या पद्धतीने सजवला फक्त. पण तो हँगरवरून काढत असताना कौर मॅडम म्हणाल्या होत्या, ‘‘ये गाऊन अनिता पहनी थी, ऑफिलिया बनी ती तब..’’  हे मी कशी विसरले? कुण्या अनिताचा शेवट ही माझी सुरुवात होती. आता माझा शेवट ही दुसऱ्या कुणाची सुरुवात आहे. ही जाणीव त्या क्षणी दु:खद वाटली. पण तिथूनच माझं मोठं होणं सुरू झालं असं वाटतं. पुण्याहून दिल्लीला शिकायला येताना पुण्याचा शेवट ही दिल्लीची सुरुवात, आता दिल्लीचा शेवट ही मुंबईची सुरुवात.
त्या दिवशीचा निरोप समारंभ संपल्यावर रात्री झोप येईना. रात्री एक वाजता हॉस्टेल बाहेरच्या मेसपाशी आले. मेस बाहेर एक मोठं झाड आहे. त्या झाडाची एरवी भीती वाटायची. त्याला लटकून कुण्या मुलींनी आत्महत्या केली होती म्हणे. आज नाही वाटली भीती. त्या कातर रात्री तिथलं सगळंच आपलंसं आणि प्रेमळ वाटत होते. त्या झाडासमोर एक एकटा बाक होता दगडी. त्याच्यावर बसले. त्या बाकाला त्या तीन वर्षांतलं माझं किती काय काय माहीत होतं.. वाटत होतं, पुन्हा मला या बाकाच्या इतकं जवळ मनानं वाटू शकणार नाही आहे.. काही वर्षांनी पुन्हा येथे येईन, तेव्हा येथे बसेनही कदाचित. पण तेव्हा ‘या भवतालाचं’ आणि माझं ‘असं’ नातं नसेल. त्या बाकाशेजारी एक कुंडी होती. त्या कुंडीतल्या झाडाची पानं मला खूप आवडायची. त्या रात्री, त्या बाकावर बसून मी त्या पानांना हळूच स्पर्श केला. वाटलं, हे सगळं आत्ता इथेच, या क्षणापाशी.. थांबवता येईल.. या खुणेच्या पानापाशी.. आवडतं पुस्तक आवडत्या क्षणापाशी थांबवल्यासारखं.. वाटतं, हे सगळं इथून नेता येणार नाही, पण मी हे कधीच विसरणार नाही. हे सगळं फार सुंदर होतं. ही रात्र, या हिरव्यागार पानाचा स्पर्श मी कायम लक्षात ठेवेन. त्या स्पर्शाच्या आठवणीत मला ती तीन वर्षे पुसट का होईना भेटत राहतील. आता या सगळ्यांकडे बघताना वाटतं विद्यालयातली तीन वर्षे संपतात म्हणजे छत्तीस महिने. तीन गुणिले तीनशे पासष्ट दिवस.. गुणिले चोवीस तास.. गुणिले साठ मिनिटं.. गुणिले साठ क्षण.. संपतात, पण क्षण संपतात कुठे.. ते तर पुढे पुढे जात राहतात. शेवटी हे क्षणच खरे. तो तो क्षण. त्या त्या वेळचा आपल्या ‘मोठं’ होण्यात कामी येणारा तो प्रत्येक क्षण..
परवा माथेरानला एक पक्षी दिसला. अगदी छोटासा. अंगठय़ाहूनही छोटा. तो एक क्षणही एका जागी थांबत नव्हता. चिवचिवत, चित्कारत इथून तिथे प्रत्येक क्षणी. त्याचा पंखांना आतल्या बाजूनी निळाशार रंग होता. त्याचं इवलं डोकं चकाकणाऱ्या मोरपंखी रंगाचं होते. तो भिरभिरत असताना निळ्या थरथरीवर मोरपंखी ठिपका थिरकताना दिसत होता. तो खूप सुंदर होता. तो जिथे जिथे जात होता, तिथे तिथे माझे डोळे त्याचा वेध घेत होते. तो दिसेनासा झाला तर मी उठून शोधून त्याचा माग घेत होते. आत्ता वाटतं आहे, येणारा प्रत्येक क्षण हा त्या पक्ष्यासारखा आहे. खूप सुंदर, पण क्षणात उडणारा. तो दिसतो आहे तोच त्याला डोळ्यात साठवत राहाणं हेच खरं!