रेणू दांडेकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशभरातल्या प्रयोगशीलतेचा वसा घेतलेल्या अपारंपरिक शाळा मी प्रत्यक्ष पाहिल्या. या शाळा उभारणारी माणसं द्रष्टी, झपाटलेली आहेत. पाश्चात्त्य शैक्षणिक प्रारूपांनी प्रभावित न होता पाहिलं तर आपल्या मातीत किती चांगलं वेगळं घडतं याचा या शाळा दाखला आहेत. अनेक समस्यांना तोंड देत उभ्या असलेल्या या शाळा सर्वार्थाने ‘शैक्षणिक प्रयोगशाळा’ आहेत..

गेलं वर्षभर आपण देशभरातील ‘सृजनाच्या नव्या वाटा’ चोखाळणाऱ्या शाळांना भेटी देतोय. आपण सगळे जण एकत्रित ही शिकण्याची पायवाट चालत आहोत. या अनेक पायवाटा नव्याने निर्माण झालेल्या आहेत. ज्यांनी या वाटा निर्माण केल्या ती माणसे ‘वेगळी’ होतीच पण आपण निदान चालू या तरी, असं वाटलं आणि वर्षभर भारतातल्या अनेक राज्यांच्या भेटी घेतल्या, शाळा पाहिल्या, अनुभवल्या.

या शाळांमध्ये एरवी सगळीकडे आढळणाऱ्या ठरावीक सुविधांचा अभाव होता, मात्र इथली मुलं खऱ्या अर्थाने ‘शिकत’ होती. त्यांना शिकवणारे विशिष्ट ध्येयाने शिकवत होते. मात्र त्यांना आपण शिक्षक म्हणायचं का? असा प्रश्न पडतो. कारण इथली मुलं शिक्षकांना ‘सर, बाई, मॅडम, टीचर’ म्हणत नाहीत तर ते मुलांसाठी ‘दीदी, भय्या, दादा, अक्का, अण्णा, दा-दी’ असतात. नि इथे कुणीच ‘ए पोरी, ए मुली, ए पोरा’ असं बोलवत नाही. सगळ्यांना सगळ्यांची नावं माहीत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे इमारती होत्या, पण त्याही आपल्यासारख्या वर्गखोल्या असणाऱ्या नव्हत्या. प्रत्येक इमारतीला स्वत:चं अस्तित्व, वेगळेपण होतं. कारण त्या विचार करून उभ्या केलेल्या होत्या. शिवाय इमारतींचा वापरही अगदी कमी केला जात होता. शांतिनिकेतनमधील ‘पाठोभवन’ येथे फक्त इतिहास, प्रयोगशाळा यांनाच इमारत होती. ‘कौसानी’ ते अगदी ‘मरुदम’पर्यंत प्रत्येक इमारतीचा बाज वेगळा होता. ‘पूवीधाम’ची इमारत वेगळी, ‘मुस्कान’ची वेगळी. ‘पूवीधाम’ला तर साहित्या नावाची एक मुलगी अभ्यास करत भारतभर फिरत होती, ती भेटली.

पुन्हा एकदा शाळांचे संदर्भ देतेय नि तिथल्या प्रमुख व्यक्तींचेही. शाळा आणि तिथल्या प्रमुख व्यक्ती यांना उजाळा देताना नावं समोर येतात ती अशी, ‘लक्ष्मीआश्रम’ (कौसानी, उत्तराखंड – डेव्हीड मामा), ‘पाठोभवन’ (शांतिनिकेतन, प. बंगाल – प्राचार्य डॉ. बुद्धदीपा), ‘दिगंतर’ (जयपूर, राजस्थान – रीना दास, रोहित धनकर), ‘बोधशिक्षासमिती’ (जयपूर, राजस्थान – योगेंद्रजी), ‘शिक्षांतर’ (उदयपूर, राजस्थान – विधी आणि मनीष जैन), ‘पूवीधाम’ (कोडलगाव, तमिळनाडू – मीनाक्षी अक्का), ‘इमलीमहुआ’ (बालेगापारा, छत्तीसगड – प्रयाग जोशी), ‘आधारशीला’ (साकड, मध्य प्रदेश – जयश्री अमित), ‘सच की पाठशाला (तुघलक वाला, पंजाब – स्वर्णसिंग) ‘मरुदम’ (कनथबुडी, तमिळनाडू – पौर्णिमा अक्का आणि अरुण अण्णा) ‘द गुड हाव्‍‌र्हेस्ट स्कूल’ (पश्चिम गाव, उत्तर प्रदेश -अनिश अशिता’) ‘मुस्कान’ (मध्य प्रदेश, भोपाळ – शिवानी तलेजा) ‘मीरांबिका’  (दिल्ली -तारादीदी)

या सगळ्यांचे शाळा म्हणून आढळलेले वेगळेपण लक्षात घेणे मला महत्त्वाचे वाटते. चला शाळा सुरू करूया, असं ठरवत कुणीच ती सुरू केलेली नाही. प्रत्येक शाळेच्या निर्मितीमागे असणाऱ्या माणसांनी एकूण शिक्षणाचाच पूर्णत: वेगळा विचार केलेला आहे. ‘शाळा कशासाठी?’ असा पहिला प्रश्न त्यांना पडला. त्याचे ज्याने त्याने उत्तर शोधले, ते ठामपणे मांडलेही. यातल्या ‘कौसानी’, आणि ‘पाठोभवन’ या दोन शाळा जवळजवळ ५० वर्षांपूर्वीच्या आहेत. बाकी जवळजवळ सर्व शाळा या ३०-३५ वर्षांपूर्वीपासून ते गेल्या ५-६ वर्षांत सुरू झाल्या आहेत. यापैकी कोणतीही शाळा शासनाचे अनुदान घेत नाही आणि भरमसाठ शुल्कही आकारत नाही. काही शाळांना वेगवेगळ्या कंपन्यांच्या ‘सीएसआर’ अर्थात, कॉपरेरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमधून निधी मिळतोय. त्यात ‘दिगंतर’, ‘बोधशिक्षा समिती’, ‘मुस्कान’ ही नावं घेता येतील. काहींना इमारतीसाठी निधी मिळतोय. अनेक शाळांच्या इमारती हवेशीर, वेगळ्या आकाराच्या आहेत. जवळजवळ सर्व शाळांच्या अवतीभवती अत्यंत संपन्न निसर्ग आहे. ‘कौसानी’तून तर हिमालयाची शिखरं दिसतात.

या शाळांनी केलेला विचार समजून घेतला असता काही गोष्टी जाणवतात. जवळजवळ प्रत्येक शाळेला पूर्वीची प्रचलित शिक्षण प्रणाली, शिक्षणाचं स्वरूप याबद्दल निराशा आहे. गुणांच्या मागे धावणारे पालक आणि मुलं पाहून त्यांना खंत  वाटत आहे. परीक्षेच्या रहाटगाडग्यात अडकलेली नि त्यातून बाहेर पडणारी मुलं असं इतर शाळांचं कारखानेवजा स्वरूप त्यांच्यासाठी चीड आणणारं आहे. मग वेगळं काय करायचं? याचा शोध घेत कुणी महात्मा गांधींच्या विचारांचा अभ्यास केला, कुणी रवींद्रनाथांचा, कुणी जे. कृष्णमूर्तीचा अभ्यास केला. पण यांचं लेबल लावलेलं नाही. ज्यांना त्यांचा विचार त्या शाळेच्या रूपाने दिसतो नि व्यक्त होतो त्याबद्दल आक्षेपही नाही. निसर्गापासून लांब चाललेल्या मुलांच्या जडणघडणीत किती प्रकारच्या उणिवा दिसतात. म्हणूनच अनेक शाळा निसर्गाच्या कुशीत वसल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रात्यक्षिक करत शिकणं याला महत्त्व दिलं आहे. निसर्ग जपणं, जोपासणं आणि वाढवण्यातून हा अनुभव मिळतो. म्हणूनच मुलांची मातीशी नाळ जोडायचा प्रयत्न या शाळा कसोशीने करतात. प्रत्येकाने स्वत:ची कामं स्वत: करणं यात स्वयंसेवा, स्वयंअनुभव, स्वयंशिस्त नि स्वच्छता, सर्वच गोष्टी साध्य होतात.

आपली तत्त्वं, भूमिका, विचार, यावर या सर्व शाळा ठाम आहेत. या शाळांची स्वत:ची जमीन आहे आणि मुलं यातून त्यांच्यासाठीचं उत्पन्न घेतात. यातल्या अनेक शाळा निवासी आहेत. ‘सर्वाना सारखं,’ असं निवासाचं तत्त्व आहे. शाळा चालवणारे त्याच परिसरात बरेच जण राहतात. आणि त्यांची मुलंही याच शाळेत शिकतात. माध्यमांचा प्रश्न कुणाच्याच बाबतीत नाही. सोय म्हणून अनेकांनी इंग्रजी माध्यम घेतलंय, सोय म्हणून कुणी हिंदी माध्यम ठेवलंय. अनेक शाळांतील मुलं तळागाळातील, वंचित समाजातील, सामाजिक प्रश्नांनी होरपळलेली आहेत. त्यामुळे समाज मानसिकता बदलणं, समाजातले प्रश्न सोडवण्यासाठी मुलांना सक्षम करणं हासुद्धा शाळांचा हेतू आहे. आधी आपली आचारसंहिता, विचारप्रणाली, रचना यांचा विचार या सर्व ठिकाणच्या माणसांनी केला. अनेक समस्यांना तोंड देत या शाळा सुरू आहेत. आजूबाजूला झालेल्या सामाजिक बदलांचाही फटका या शाळांना बसलाच. शिक्षणातील आधुनिकीकरणाचं फसवं मोहजाल त्यांनाही मोहात टाकतच आहे.

आरटीई (राइट टू एजुकेशन) मुळे अनेकांना आपलं तांत्रिक स्वरूप बदलावं लागलं. आधी कोणीही शिकवण्याची इच्छा असलेली व्यक्ती शाळेत येऊन मुलांना आपल्याजवळचं कौशल्य शिकवत होती. आता अनेक शाळांनी बी. एड्., डी. एड्. झालेले शिक्षक नेमलेत, पण अध्यापन पद्धत, कामाची पद्धत, शाळेसाठी द्यावा लागणारा वेळ, वेतन, हे त्या त्या संस्थांच्या पद्धतीप्रमाणेच आहे. सर्व शाळांतील शिक्षक अध्यापनाच्या वेळांव्यतिरिक्त दोन तास तर जादाचे देतातच. वेगळं काम करायची ऊर्मी, उत्साह त्यांच्यात आहे. मिळणारा पगार आणि काम यांचं प्रमाण सरकारी नियमाप्रमाणे नसूनही शिक्षक समाधानी आहेत. इतकंच नाही तर काही शिक्षक अजिबातच मानधनही घेत नाहीत. दर वर्षांला पगारवाढ, सुट्टय़ा, असं सगळं असूनही वेगळं काम आपल्या मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये घडत नाही याचं वाईट वाटलं. इथे काम करणाऱ्या सर्वच ‘दा-दी-अक्का-अण्णा’ यांच्याबद्दल कृतज्ञता वाटते. सकस, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण रचना आणि प्रयोगशील, उत्साही शिक्षक या सगळ्या गोष्टी खूप प्रेरणादायी होत्या.

आणखी एक ठळक आणि वैशिष्टय़पूर्ण गोष्ट मला जाणवली. ही सगळी माणसं वेगळ्या निश्चयाने, अडचणींनी डगमगून न जाता, सर्व वेळ काही नवीन करण्याच्या प्रयत्नात आहेत. एका बाजूने समाजाला नवं काही देताना जुन्याचा प्रचंड रेटा असतो. त्याला तोंड देणं, एका बाजूला आर्थिक गणितं जुळवणं, दुसरीकडे भेट देणाऱ्यांना सर्व काही समजावून देत त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं, अशा सर्व बाजूंनी लढाई सुरू आहे. सतत पाश्चात्त्य शैक्षणिक प्रारूपांनी प्रभावित न होता पाहिलं तर आपल्या मातीत किती चांगलं वेगळं घडतं याचा या शाळा दाखला आहेत. मी सर्वत्रच अनुभवत होते की, ही माणसं द्रष्टी, झपाटलेली आहेत. शिक्षणप्रणालीतील आवश्यक त्या सर्व बदलांची ती दखल घेत आहेत. त्यांचे शैक्षणिक प्रयोग हे एक ध्यासपर्व आहे. मळलेली वाट कंटाळवाणी वाटणाऱ्यांनी निदान एकदा तरी या वाटेवरून प्रवास करावा. ही सगळी माणसं सहकुटुंब काम करतायत. अनिश-अशिता, पौर्णिमा-अरुण, विधी-मनीष, रिना-रोहित, डेव्हिड मामा- मामी, मीनाक्षी अक्का, जयश्री-अमित, असे पती-पत्नी कार्यमग्न आहेत. प्रत्यक्ष पाहिलं तर यातले कोणीच पूर्वाश्रमीचे शिक्षक नाहीत. बहुतेक जण अभियंते आहेत, कुणी आर्किटेक्ट तर कुणी आयटी क्षेत्रातलं आहे. सगळ्यांनी आपलं पूर्वीचं काम सोडत सृजनाची नवी वाट निर्माण केली आहे. यांना शिकवायची ‘मेथडॉलॉजी’ कुठे बी.एड्.-डी.एड्. अध्यापनशास्त्राच्या महाविद्यालयात नाही आढळली. यांनी स्वत:चा अभ्यासक्रम तयार केला. तो कुणीही पाहावा इतका पारदर्शक आहे. या शाळांतल्या कोणत्याही गटात आपण बसू शकण्याइतकी निर्भीडता, स्पष्टता आहे. प्रत्येक कृतीमागील प्रश्नाचं उत्तर द्यायला ही सर्व मंडळी उत्सुक आहेत. अर्थात, समोरच्या व्यक्तीची शिक्षणातली पतही ते पाहतच असणार. यांची मुलंही याच शाळांत शिकतात. विधी-मनीष यांचा सगळ्या ‘फॅक्टरी स्कूलिंग’लाच विरोध आहे. त्यांची मुलगी अशा शाळेत गेलीच नाही. ही सर्व माणसं आपलं स्वागत करायला उत्सुक आहेत. ‘दिगंतर’ने बनवलेली जवळजवळ २५-३० पुस्तकं मला विशेष वेगळी वाटली. त्यांचं भाषांतरही करायचं मी ठरवलं. ‘बोध’नेही काही पुस्तकं तयार केली आहेत. ‘मीरांबिका’ पालन करत असलेलं तत्त्वज्ञान योगी अरविंद यांचं आहे. ‘सच की पाठाशाला’ सत्याचे प्रयोग करतेय. ‘शिक्षांतर’ तर पूर्ण वेगळी आहे. ‘पाठोभवन’ आजच्या काळातही आपल्या विचारांवर ठाम राहून स्वातंत्र्य हे मूल्य जपतेय. ‘इमली महुआ’ शाळेची गरज संपलीय, असं लक्षात आल्यावर आपणहून थांबत ‘मुक्त शिक्षा केंद्र’ म्हणून सुरू आहे. ‘द गुड हार्वेस्ट स्कूल’, ‘आनंद निकेतन’, यांनी नव्याने प्रयोग सुरू केला आहे. तरी वेळोवेळी अनेकांकडून मतं आणि विचार घेऊन त्यांचं काम सुरू आहे.

एका बाजूला अनेक प्रकारच्या आपत्तींना तोंड देणं आणि दुसऱ्या बाजूला सतत नव्याचा शोध घेणं, परिस्थितीचा अभ्यास करणं, समाजातल्या बदलांना समजून घेणं, त्यानुसार पुढील रचना करणं, ही दोन टोकं असतात. तरीही याची जास्तीत जास्त जुळणी सुरू आहे.

ही सगळी प्रयोगशील माणसं तशी सगळी वयाने ३५-४० च्या पुढची. मात्र त्यांचा उत्साह अमाप आहे. सामाजिक कार्याची यांनी सुरू केलेल्या शाळा ही नवी दिशा आहे. सर्वानी अनुकरण करावी अशी.

(या लेखाचा उर्वरित भाग २८ डिसेंबरला)

renudandekar@gmail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Educational experiment school renu dandekar abn