आपण सारेच आपापल्या कुवतीनुसार स्वत:चा स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न करीत असतो, तसाच त्या म्हाताऱ्याने पण केला. उपेक्षिताचं, पण मानी आयुष्य जगला. माझं मन मांजरासारखं मला बोचकारू लागलं. त्याचा एवढा कळवळा होता तर त्या दिवशी मी फक्त दोनच फण्या का घेतल्या? त्याच्याकडल्या सगळ्या फण्या घेणं मला सहज शक्य होतं. पण नाही. गरज नसताना आपण नको तिथे हात आखडता घेतो आणि मग खंतावत बसतो..
त्यावेळी माझं वास्तव्य दादरला होतं आणि कार्यालय फोर्टला. सकाळचे आठ वाजले की दादर-ब्रिज गर्दीने ओसंडायचा. मुंग्यांसारखी खेटून, चिकटून चालणारी हजारो माणसं! ‘धबधबा तोय आदळे’ असा माणसांचा अविरत, अथक धबधबा सुरू असायचा. गंमत अशी की अवतीभोवती एवढी धोधो माणसं वाहत असताना जो तो ‘एक अकेला इस शहरमें’ असा आपल्यातच असायचा. ‘आपही आपमें मगन चला मैं’ असं म्हणत पुढे-पुढे चालायचा. चालायचा नाही चक्क धावायचा. त्या गर्दीत मी पण असायची. ‘पळा, पळा कोण पुढे पळे तो’ चा मंत्र जपत, धावत-धडपडत, आजूबाजूच्या लोकांना चुकवत, तर कधी त्यांच्यावर आदळत मी पुढे-पुढे सरकायची. त्या पळापळीत चार-दोन शेलक्या शिव्या कानफडात मारल्यागत माझ्या दिशेने भिरकावल्या जायच्या. ‘ए म्हशे, डोलं फुटलं काय तुजं? पाय दिलास ना xxx माज्या पायावर. म्हस मेली.’ हे नमनाचं वाक्य झालं की ‘इतना घाई हय तो जल्दी आनेका. पब्लीककु कायकु तकलीफ देनेका? राष्ट्रभाषा हिंदी कडाडायची आणि ‘सॉरी, सॉरी’ असं पुटपुटत मी पुढे जायची. एक गोष्ट अनुभवाने सांगते की खचाखच गर्दी माणसाला निर्लज्ज आणि धीट बनवते. ती चेंगट गर्दी आणि खानदानी शिव्यांचा माझ्यावर काहीही परिणाम होत नसे. त्या गदारोळात मला फक्त माझी ८.४० ची ‘टीरेन’ तेवढी दिसायची. नेमक्या शब्दात सांगायचं तर अर्जुनाला जसा पक्ष्याचा डोळा तसा मला माझा ‘जनाना डिब्बा’ तेवढा दिसायचा. गर्दीचा हा गुंता आणि ‘दो नंबर की गाडी चार नंबरवर’ची प्रेमळ उद्घोषणा वगैरेच्या कोलांटय़ा आटपेपर्यंत ‘आली, आली’ चा गलका व्हायचा. नजरा त्या दिशेने वळायच्या. सारा प्लॅटफॉर्म कंबर बांधून एकसाथ कदम मिलाके हुश्शार व्हायचा आणि मग – हरहर महादेव! ‘सिट सलामत तो उडय़ा पचास’च्या धर्तीवर धडाधड उडय़ा मारून पब्लिक आत घुसायचं आणि ‘हे रोजचंच’ असं म्हणत ट्रेनबाई नसलेलं नाक उडवून मोठय़ा टेचात प्लॅटफॉर्म सोडायची. हुश्श! सुटलो एकदाचे.
त्या दिवशी मात्र असलं काहीही नव्हतं. नेहमीचा गोंधळ नाही की कालवा नाही. कारण त्या दिवशी शनिवार होता. होय, अगदी लख्खं आठवतंय. शनिवार असल्यामुळे एरव्ही दुथडी भरून वाहणारा दादर-ब्रिज काठाकाठाने बेतशीर वाहत होता आणि त्यामुळे एकमेकांवर न आदळता एखादीच्या खास हेअर-स्टाइलला धक्का मारण्याची जुर्रत न करता गर्दी शहाण्या बाळासारखी शिस्तीत चालत होती. मी पण नेहमीप्रमाणे धडधडत नव्हते; शांतपणे एका बाजूने चालले होते आणि अचानक मला ‘तो’ दिसला..
जगात असून नसल्यासारखा खाली मान घालून तो एका बाजूला बसला होता. अंगात लांब बाह्य़ांचा जुना-पुराणा फिक्कट हिरव्या रंगाचा स्वेटर आणि एकेकाळी पांढरा पण सध्या मळखाऊ राखाडी रंगाचा लेंगा. आपल्या थकल्या – काटकुळ्या देहाची मोळी करून तो शांत बसला होता. त्याच्या पुढय़ातल्या फटकुरावर ७-८ फण्या व १-२ कंगवे मान टाकल्यागत पडले होते. फण्यांची अवस्था त्याच्या सारखीच जुनी-पुराणी कशी तरीच वाटत होती. त्याच्या आजूबाजूला बसलेल्या इतर विक्रेत्यांकडल्या वस्तू कशा घासून-फुसून लखलखीत, चकाचक दिसत होत्या. स्वच्छ घासलेल्या दातांप्रमाणे गिऱ्हाईकाकडे बघून ‘टूथपेस्ट स्माइल’ दिल्यागत मस्त हसत होत्या. याच्या फण्या मात्र आंघोळ न केल्यागत ओशट, मेणचट वाटायच्या. त्याच्याकडे न बघितल्यासारखं करून मी पुढे गेले पण खरं सांगायचं तर त्याला बघितलं आणि काळजात कुठेतरी हललं एवढं निश्चित! त्यानंतर दरवेळी तिथून जाताना माझी नजर न चुकता त्याच्याकडे जायची. तो दिसला की मला हायसं वाटायचं आणि कधी दिसला नाही तर थोडय़ा वेळेपुरतं का होईना पण मी अस्वस्थ व्हायची. ब्रिज उतरेपर्यंत मन त्याच्या अवतीभोवती रेंगाळायचं.
त्याची एक गोष्ट मात्र विचित्र वाटायची की इतर विक्रेत्यांप्रमाणे तो कधीही आपला ‘माल’ विकण्याचा प्रयत्न करीत नसे. खाली मान घालून तो शांत बसून असायचा. कदाचित त्याच्या अंगात तेवढी ताकदही उरली नसावी कारण तो फारच थकला होता. बसल्या बसल्याच वाकला होता. कधी काळी मात्र तो चांगलाच उंचनीच असावा. त्याचा चेहराही इतरांसारखा लाचार वाटत नसे. चांगल्या घरातला असेल अन् काही कारणाने असा..! विचार मनात आला आणि झटदिशी मी त्याच्यापाशी गेले.
‘ही फणी केवढय़ाला?’ मी विचारलं.
‘दोन रुपये’ स्वच्छ मराठीत उत्तर आलं. मी पाच रुपये काढले आणि दोन फण्या घेतल्या. वरचा एक रुपया देण्यासाठी त्याने खिशात हात घातला.
‘राहू दे. नका देऊ’ मी म्हटलं आणि प्रथमच मान वर करून त्याने माझ्याकडे बघितलं.
सरळ धारदार नाक आणि थकलेली, पूर्णपणे विझलेली पण तरीही करारी नजर! मी चरकले. अपराध्यागत वाटू लागलं. नकळत का होईना पण बहुतेक मी त्याचा स्वाभिमान दुखावला असावा. काहीही न बोलता घाईघाईने मी चटदिशी पुढे सटकले. त्या दिवशी म्हाताऱ्याची ती नजर सतत माझा पाठलाग करीत होती. पर्समधल्या फण्या मी उगाचच चाचपून पाहिल्या. मळकट आकाशी अन् मातकट रंगाच्या त्या फण्या माझ्या काहीच उपयोगाच्या नव्हत्या. दोन दिवसांनी एका गरीब मुलीला मी त्या देऊन टाकल्या. त्यानंतर २-३ वर्षे तो म्हातारा तिथे तसाच बसलेला दिसायचा. दिवसेंदिवस तो, त्याचे कपडे अन् त्या फण्या थकत चालल्या होत्या, अधिकाधिक केविलवाण्या वाटत होत्या.
दररोज हजारो मुंबयकर त्याच्या समोरून जात-येत होते, पण कोणी कधीही त्याची दखल घेतली नाही. देवळाबाहेर बसलेल्या धडधाकट भिकाऱ्यांना आपण पैसे घालतो पण एका गरीब म्हाताऱ्याचा स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न कुणीही केला नाही. तो कुणालाच नको होता. जगाला काय पण त्याला स्वत:ला पण तो नकोसा झाला होता. कारण त्यानंतर लवकरच तो दिवस आला. म्हातारा गेला. मनाला चटका लावून गेला. चटका अशासाठी की जिवंत असताना त्याने कधीही कुणासमोर हात पसरला नाही. पण मृत्यूने मात्र त्याला हरवलं. आधीच वाकलेल्या म्हाताऱ्याला पार मोडून टाकलं. भीक मागायला भाग पाडलं. एका बाजूला तो म्हातारा मरून पडला होता आणि थोडय़ा अंतरावर एक फडकं पसरून ठेवलं होतं. फडकं स्वच्छ होते. विशेष म्हणजे आत्तापर्यंत त्याच्याकडे ढुंकूनही न पाहणारे मुंबयकर आज मात्र त्या फडक्यावर पैसे भिरकावत होते. काय बोलावं? बोलण्यासारखं काहीही उरलं नव्हतं.
एवढी र्वष झाली पण तो प्रसंग जसाच्या तसा माझ्या डोळ्यासमोर उभा आहे. आपण सारेच आपापल्या कुवतीनुसार स्वत:चा स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न करीत असतो, तसाच त्या म्हाताऱ्याने पण केला. उपेक्षिताचं पण मानी आयुष्य जगला आणि एकदिवस अगतिकपणे मरून गेला. गेला पण माझ्या मनाला मात्र कायमची रुखरुख लावून गेला. मांजरासारखं ते मला बोचकारू लागलं. त्याचा एवढा कळवळा होता तर त्यादिवशी मी फक्त दोनच फण्या का घेतल्या? त्याच्याकडल्या सगळ्या फण्या घेणं मला सहज शक्य होतं. पण नाही. गरज नसताना आपण नको तिथे हात आखडता घेतो आणि मग खंतावत बसतो. ती खंत, ती रुखरुख मध्येच कधीतरी डोकं वर काढते आणि उंदरासारखी कुरतडत राहते. आता त्यावर उपाय नाही.
‘मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा’ हे कुसुमाग्रजांचे शब्द फार मोठे आहेत, वलयांकित आहेत पण तसं जगणं मात्र महाकर्मकठीण! त्या शब्दांची किंमत अदा करणं वाटतं तेवढं सोपं नाही. म्हाताऱ्याने ती किंमत अदा केली होती. पण त्याचा मान राखणं आपल्याला जमलं नाही.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jun 2013 रोजी प्रकाशित
कणा
आपण सारेच आपापल्या कुवतीनुसार स्वत:चा स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न करीत असतो, तसाच त्या म्हाताऱ्याने पण केला. उपेक्षिताचं, पण मानी आयुष्य जगला. माझं मन मांजरासारखं मला बोचकारू लागलं. त्याचा एवढा कळवळा होता तर त्या दिवशी मी फक्त दोनच फण्या का घेतल्या?
First published on: 01-06-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Self respect of old age vendor