प्रयागराज : महाकुंभामध्ये यमुनेतील नौकानयनातून ४६ दिवसांत एक हजार कोटींची उलाढाल होईल. यात एक लाखावर जणांना रोजगार मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रयागराजमधील यमुना नदीतील ३० किमीच्या विस्तीर्ण पात्रात जवळपास दहा हजार नौका आहेत. याच्या माध्यमातून भाविकांना कुंभकाळात स्नान घडवले जाते. एका नौकेवर साधारण तिघे असतात. सध्या येथे लखनऊ तसेच वाराणसी परिसरातून नौका आणण्यात आल्या आहेत. प्रति नौका साधारणपणे दहा हजार रुपये आकारले जातात. एका नौकेच्या तीन फेऱ्या होतात. त्यांना तीस हजार रुपये मिळतात. आठ ते दहा जण यामध्ये बसतात. मात्र कुंभकाळातच व्यवसाय होतो. अन्य वेळी फारशी मागणी नसते असे स्थानिकांनी सांगितले. सध्या रोज एक कोटी भाविक संगमावर स्थान करतात. एआयच्या मदतीने भाविकांचा आकडा नोंदवला जात असल्याचे प्रसिद्धी खात्यातील अधिकाऱ्याने नमूद केले. संगमावर स्नान करणाऱ्यांपैकी रोज किमान दहा लाख भाविक स्नानासाठी नावेचा वापर करतात. सर्वच भाविकांना आथिर्कदृष्ट्या हे शक्य होत नाही.

नौकानयन करणाऱ्यांमध्ये सर्वसाधारणपणे निषाद समाजाचे अधिक असल्याचे स्थानिक स्वयंसेवक रोहित तिवारी याने नमूद केले. यामागे ऐतिहासिक दाखले आहेत. प्रयागराजमध्ये कुंभमुळे नौका चालवणाऱ्यांचा व्यवसाय तेजीत आहे. एरवी नौका चालवणारे तरुण शेती करतात. सध्या एका फेरीला दहा हजार मोजावे लागतात. मात्र हंगाम नसताना हजार ते बाराशे इतका खाली दर येतो.

संख्या मोजण्यासाठी ‘एआय’ची मदत

महाकुंभमध्ये आत्तापर्यंत साठ कोटी भाविकांनी प्रयागराजला भेट दिली. मात्र ही संख्या मोजण्यासाठी ‘एआय’ची मदत घेण्यात आली. बहुराष्ट्रीय कंपनीला हे काम देण्यात आले आहे. त्यांनी दिलेल्या आकड्याच्या आधारे हे मोजमाप केले जात असल्याचे एकात्मिक समन्वय केंद्राचे प्रमुख अमितकुमार यांनी स्पष्ट केले.

आम्हाला साधारण प्रत्येक फेरीला पाच हजार रुपये मिळतात. उर्वरित रक्कम मालकांना द्यावी लागते. – धर्मेंद्र, नौका चालवणारा

महाकुंभच्या काळात येथे विविध क्षेत्रांत रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. नौका चालविणारे बाहेरून येथे येतात. त्यामुळे येथील अर्थव्यवस्थेला गती मिळते. – रोहित तिवारी, स्थानिक स्वयंसेवक

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1000 crore turnover from yamuna boating ssb