नक्षलवाद्यांनी सोमवारी झारखंडमधील गिरदीह जिल्ह्य़ात अत्याधुनिक स्फोटकांच्या मदतीने (आईडी) स्फोट घडवला. त्यात बारा सुरक्षा जवान जखमी झाले. ते माओवाद्यांनी अपहरण केलेल्या इतर चार व्यक्तींचा शोध घेण्यासाठी जात असताना हा स्फोट घडवण्यात आला.
प्राथमिक माहितीनुसार गिरदीह जिल्ह्य़ात डोलकाटा येथे सात प्रगत स्फोटके लावण्यात आली होती. त्यांचा स्फोट झाला. राज्य पोलिसांचे चार सुरक्षा जवान व केंद्रीय राखीव पोलीस दलाचे आठ जवान यात जखमी झाले. दरम्यान आता या भागात आणखी सुरक्षा कुमक पाठवण्यात येत आहे असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
ज्या सुरक्षा जवानांच्या तुकडीवर हा हल्ला करण्यात आला त्यात राज्य पोलिसांचे जग्वार पथक व केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान यांचा समावेश होता.  
झारखंडचे पोलीस महासंचालक राजीव कुमार व केंद्रीय राखीव पोलीस दलांचे अधिकारी या भागात तळ ठोकून आहेत व ते शोध मोहीमही राबवित आहेत. चार व्यक्ती वाहनातून जात असताना बंडखोरांनी त्यांचे वाहन अडवून शनिवारी सायंकाळी त्यांचे अपहरण केले.  पारसनाथ येथे टेकडय़ांच्या पायथ्याशी असलेल्या नवकनिया भागात ही घटना घडली होती.