अमेरिकेसमवेत करण्यात आलेल्या सुरक्षा कराराच्या तरतुदीनुसार युद्धग्रस्त अफगाणिस्तानमध्ये १५ हजार परदेशी सैनिक राहू शकतात, असे अध्यक्ष हमीद करझाई यांनी गुरुवारी येथे सांगितले. मात्र, या करारावर पुढील वर्षी निवडणुका होईपर्यंत करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
द्विपक्षीय सुरक्षा करारासंबंधी विचारविनिमय करण्यासाठी विविध स्तरांवरील नामवंतांच्या परिषदेस येथे प्रारंभ झाला. अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या लष्कराच्या वास्तव्यासंबंधी या परिषदेत चर्चा होणार असून, त्यावेळी बोलताना करझाई यांनी आपली मते मांडली. अनेक महिन्यांच्या अत्यंत किचकट अशा वाटाघाटींनंतर या करारातील तरतुदींना उभय बाजूंनी मान्यता दिली आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी या परिषदेपूर्वी सांगितले. अफगाणिस्तानच्या ‘लोया जिग्रा’ मंडळाने सदर करारास मान्यता दिल्यानंतर अफगाणिस्तानच्या संसदेने त्यास मंजुरी देणे आवश्यक ठरते.
पुढील वर्षी ‘नाटो’चे सुमारे ७५ हजार सैन्य अफगाणिस्तानातून काढून घेण्यात आल्यानंतर अफगाणिस्तानचे एकूण भवितव्य ठरेल. करझाई यांचा वारसदार ठरविण्यासाठी अफगाणिस्तानात ५ एप्रिल रोजी निवडणुका होणार आहेत. त्यानंतर त्यांना पदत्याग करणे आवश्यकच ठरणार आहे.