मलेशियाच्या बेपत्ता विमानाचा ब्लॅक बॉक्स वेळेत मिळावा यासाठी शोधपथकांनी शुक्रवारी पाण्याखाली व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे. दोन अत्याधुनिक बोटींच्या सहाय्याने हिंदी महासागरात ब्लॅक बॉक्सचा शोध घेण्यात येत आहे. पुढील चार दिवसांत ब्लॅक बॉक्सची यंत्रणा कुचकामी होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्याचा शोध घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
ब्रिटिश रॉयल नौदलाचे एचएमएस एको आणि ऑस्टेलियाच्या नौदलाचे ओशन शिल्ड या जहाजांच्या मदतीने सागर तळात शुक्रवारी शोधमोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती ही तपास मोहीम राबवणाऱ्या पथकाचे प्रमुख निवृत्त हवाईदल प्रमुख अ‍ॅगस हौस्टन यांनी दिली. पाण्याखाली तब्बल २४० किमी अंतरावरील वस्तूंचा शोध घेऊ शकतील, अशी यंत्रणा या बोटींवर आहे. ८ मार्च रोजी बेपत्ता झालेल्या विमानाबाबत माहिती मिळवण्याच्या दृष्टीने ब्लॅक बॉक्सचा शोध युद्धपातळीवर हाती घेण्यात आला आहे.  १४ विमाने आणि नऊ जहाजांच्या मदतीने बेपत्ता मलेशियन विमानाचा शोध घेण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ब्लॅक बॉक्स शोधातील आव्हान-
ऑस्ट्रेलियन नौदलाचे ओशन फिल्ड हे जहाज ब्लॅक बॉक्स लोकेटर या यंत्रणेसह विमानाचा ढिगारा असण्याची शक्यता असणाऱ्या भागात शोधमोहीम राबवणार आहे. परंतु ब्लॅक बॉक्स सापडण्याची शक्यता कमी मानली जाते, कारण विमान नेमके कुठे कोसळले हे समजल्याशिवाय त्याचा ब्लॅक बॉक्स शोधणे अवघड असते. ओशन फिल्ड हे जहाज सोमवारी निघाले असून तीन दिवसांच्या प्रवासानंतर ते आता अपेक्षित ठिकाणी पोहोचत आहे. ब्रिटिश नौदलाचे जलवैज्ञानिक जहाज एमएमएस एको हे त्या भागात पोहोचले असून त्याला फ्लाइट डाटा रेकॉर्डरकडून संदेश मिळाल्याचा दावा करण्यात आला, पण त्यातील काही संदेश फसवे असू शकतात, कारण ते सागरी जिवांकडूनही येऊ शकतात. जहाजाचा आवाज व व्हेल माशांचा आवाज यामुळे संदेशात गोंधळ निर्माण होऊ शकतो.

मलेशिया बेपत्ता विमानाबाबतची महत्त्वाची माहिती लपवतोय
क्वालालम्पूर येथून बीजिंगला जाताना अचानक बेपत्ता झालेल्या विमानाबाबतची महत्त्वाची माहिती मलेशियाचे सरकार लपवत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अन्वर इब्राहिम यांनी केला आहे. बेपत्ता विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत असून, अद्याप हाती काहीच न लागल्यामुळे या प्रकरणाचा तपास आंतरराष्ट्रीय समितीमार्फत केला जावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. विमान बेपत्ता झाल्यानंतर ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली गेली. त्यामुळे सुरुवातीपासूनच संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकंदर परिस्थिती लक्षात घेता सरकारला याबाबत अधिक माहिती असल्याचे इब्राहिम यांनी  ब्रिटिश दैनिक टेलिग्राफशी बोलताना स्पष्ट केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 ships hunt for black boxes from missing jetliner