20 year old indian-origin woman raped in UK cops call it racially motivated crime news : गेल्या काही दिवसांत भारतीय वंशाच्या नागरिकांवर परदेशात वंशद्वेषातून प्रेरित हल्ले झाल्याच्या घटना वाढल्या आहेत. यादरम्यान आता युनायटेड किंगडम (UK) मधील वेस्ट मिडलँड्स येथे एका २० वर्षीय भारतीय वंशाच्या तरूणीवर कथितरित्या बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वेस्ट मिडलँड्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेवर तिच्या वांशिक ओळखीमुळे हा हल्ला करण्यात आला.

“तरूणीवरील हा हल्ला अत्यंत धक्कादायक होता आणि यासाठी जबाबदार व्यक्तीला अटक करण्याकरिता आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत,” असे या प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व करत असलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी रोनन टायरर यांनी रविवारी सांगितले.

ही घटना शनिवारी उजेडात आली जेव्हा एका महिलेवर लैंगिक अत्याचार करत हल्ला झाल्याची आणि ती रस्त्याच्या मध्यभागी अस्वस्थ होऊन बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस वॉल्सॉल येथील पार्क हॉल भागात दाखल झाले.

गुन्हेगाराला पकडण्यासाठी वेस्ट मिडलँड्स पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीचा फोटो देखील जारी केला आहे. आरोपीला शोधून काढण्यासाठी स्थानिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे, टायरेर पुढे म्हणाले, “हल्लेखोराला शक्य तितक्या लवकर ताब्यात घेण्यासाठी आमचे अधिकारी पुरावे गोळा करत आहेत आणि हल्लेखोराचे प्रोफाईल तयार करत आहेत. जर आम्ही अनेक बाबींचा तपास करत असलो तरी, त्या वेळी परिसरात कोणाही एका व्यक्तीला संशयास्पद हालचाली करताना पाहिले असल्यास, त्याने आम्हाला माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”

असे असू शकते की तुम्ही तेथून जात असाल आणि तुमच्याकडे डॅशकॅम फुटेज असेल किंवा तुमच्याकडे सीसीटीव्ही असेल जो अद्याप आम्हाला मिळालेला नाही. तुम्ही दिलेली माहिती आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा सुगावा असू शकते,” असेही ते म्हणाले.