ऑक्सफर्डने करोना व्हायरस विरोधात विकसित केलेली लस पहिल्या फेजमध्ये यशस्वी ठरल्यामुळे जगभरात सर्वांच्याच अपेक्षा उंचावल्या आहेत. उर्वरित दोन फेजचे टप्पेही या लसीने यशस्वीपणे पार करावेत, अशीच सर्वांची इच्छा आहे. कारण असे घडल्यास या लसीचे मोठया प्रमाणावर उत्पादन आणि सार्वत्रिक वापर सुरु होऊ शकतो. भारताची सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही संस्था या प्रकल्पात भागीदार आहे. त्यामुळे सर्व काही नियोजनानुसार झाले, तर भारतीयांनाही ही लस नोव्हेंबरपर्यंत मिळू शकते.

गुंतवणूकीचा निर्णय सोपा नव्हता
ऑक्सफर्डच्या लसीकडून आता सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. पण सुरुवातीला या लस प्रकल्पात गुंतवणूक करण्याचा निर्णय़ इतका सोपा नव्हता. या लसीची कुठलीही चाचणी झाली नव्हती, त्यावेळी सिरमने या प्रकल्पात २० कोटी डॉलर गुंतवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यासाठी त्यांना फक्त ३० मिनिट लागली. सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांनी एनडीटीव्हीला ही माहिती दिली. या निर्णयामध्ये व्यावसायिक धोका होता आणि आजही आहे. उर्वरित फेजमध्ये अपेक्षित रिझल्ट मिळाले नाहीत तर संपूर्ण स्टॉक नष्ट करावा लागू शकतो.

पहिल्या फेजचा काय आहे निष्कर्ष?
सोमवारी लॅन्सट जर्नलमध्ये या लसीच्या पहिल्या फेजच्या मानवी परीक्षणाचा अहवाल प्रसिद्ध झाला. वैद्यक क्षेत्रातील सर्वांचेच या अहवालाकडे लक्ष लागले होते. ऑक्सफर्डने विकसित केलेली ही लस मानवी शरीरात अँटीबॉडीजची निर्मिती करण्याबरोबरच रोगप्रतिकारक शक्तीला चालना देण्यात यशस्वी ठरली आहे तसेच या लसीने शरीरात किलर टी-सेल्सची निर्मिती सुद्धा केली तसेच गंभीर साईड इफेक्ट सुद्धा दिसलेले नाहीत.

भारतात सर्वांनाच ही लस देणे शक्य आहे ?
भारतात सर्वांनाच करोना व्हायरसची ही लस देण्यासाठी दोन वर्ष लागू शकतात असे सिरम इन्स्टिट्युटने सांगितले. सिरम इन्स्टिट्युट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे.