क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी भरल्याने अंदमान आणि निकोबार बेटांलगत अंदमानच्या समुद्रात रविवारी बोट उलटून २१ जण मृत्युमुखी पडले. २९ जणांना वाचविण्यात यश आले असून एकजण अद्याप बेपत्ता आहे. या बोटीतून ‘सावरकर दर्शना’साठी महाराष्ट्रातीलही काही सावरकरप्रेमी निघाले होते. त्यापैकी ठाण्यातील भोसेकर दाम्पत्याचा मृत्यू ओढवल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेप्रकरणी बोटीच्या मालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
अंदमानचे नायब राज्यपाल लेफ्ट. जन. (निवृत्त) ए. के. सिंग यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दुर्घटनाग्रस्त ‘अ‍ॅक्वा मरिन’ या बोटीची क्षमता केवळ २५ प्रवासी वाहून नेण्याची असताना त्या बोटीत ५१ प्रवासी कोंबले गेले होते. बोटीवर जीव वाचविण्यासाठीची साधने किंवा जीवरक्षक तैनात नसल्याचेही उघडकीस आले आहे. मृतांमध्ये आठ पुरुष व १३ महिलांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील तिघांचा, तामिळनाडूतील १६ जणांचा आणि पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेशातील प्रत्येकी एकाचा मृतांमध्ये समावेश आहे. बचावलेल्या २९ जणांपैकी सात जण महाराष्ट्रातले, १५ तामिळनाडूतले आणि दोन दिल्लीचे आहेत. पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेशातील प्रत्येकी एकाचाही बचावलेल्या समावेश आहे. सर्व २१ मृतांची ओळख पटली असून त्यांचे पार्थिव त्यांच्या राज्यांत पाठविण्यात आले असून, बचावलेले प्रवासीही त्यांच्या राज्यांकडे रवाना झाले आहेत.