भारत-पाकिस्तान सीमेवर मंगळवारी रात्री झालेल्या चकमकीनंतर भारतीय सीमा सुरक्षा दलाने(बीएसएफ) घटनास्थळावरून २१ ड्रग्जची पाकीटे जप्त केली आहे. याशिवाय, जीवंत काडतुसे देखील मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, ही काडतुसे पाकिस्तानात तयार झालेली आहेत. काडतुसांवर ‘मेड इन पाकिस्तान’ असे लिहीलेले आढळून आले आहे. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने यासंबंधीचा व्हिडिओ प्रसिद्ध केला असून, यामध्ये काडतुसांवर ‘मेड इन पाकिस्तान’ लिहील्याचे स्पष्ट दिसून येते.
बीएसएफ अधिकारी अनिल पालिवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटरी सेक्टरच्या नार्ली गावानजिक मंगळवारी रात्री भारतीय सुरक्षा दल आणि ड्रग्ज माफियांमध्ये चकमक उडाली. यात कोणतीही जीवीतहानी किंवा जखमी झालेले नसले तरी घटनास्थळावरून एक बंदुक, २१ हिरोईनची पाकीटे आणि जीवंत काडतुसांचे तीन खोके जप्त करण्यात आले आहेत. खोक्यांमध्ये असलेल्या काडतुसांवर ‘मेड इन पाकिस्तान’ लिहील्याचे उघड झाले आहे.