पोटनिवडणूक निकाल LIVE: उत्तप्रदेशमध्ये ‘सपा’च्या बालेकिल्ल्याला भाजापाचा सुरुंग, तर पंजाबमध्ये ‘अकाली दल’ विजयी

देशातील 3 लोकसभेच्या आणि ७ विधानसभेच्या जागांसाठी २३ जून रोजी मतदान घेण्यात आले होते.

by election of loksabha and vidhansabha
लोकसभा, विधानसभा पोटनिवडणूक

देशामधील सहा राज्यांतील लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या सात जागांसाठी २३ जून रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. आज या पोटनिवडणूकीचे निकाल जाहीर होत आहेत. त्रिपुरानंतर आता उत्तर प्रदेशमधील रामपूर लोकसभा जागेचा निकाल जाहीर झाला आहे. समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या रामपूर मतदारसंघात सपाचे आमदार असीम राजा यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपाचे उमेदवार घनश्याम सिंह लोधी यांनी असीम राजा यांचा पराभव केला आहे.

दुसरीकडे दिल्लीतील राजेंद्र नगर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आम आदमीचे उमेदवार दुर्गेश पाठक विजयी झाले आहेत. पाठक यांनी ११ हजार ५५५ मतांनी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला. त्रिपुरा विधानसभा पोटनिवडणुकीत त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा (Manik Saha) टाउन बारडोवली मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

पंजाबमध्ये आपला शिरोमणी अकाली दलाचा झटका

पंजाबमधील संगरुर लोकसभा मतदानसंघात शिरोमणी अकाली दलच्या सिमरनजीत सिंह मान यांनी विजय मिळवला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा हा मतदारसंघ होता. सिमरनजीत सिंह मान यांनी आपचे उमेदवार गुरमैल सिंह यांचा ७ हजार मतांनी पराभव केला आहे.

माणिक सहा यांना विजय मिळवणे आवश्यक
माणिक सहा यांना काँग्रेसच्या आशिष कुमार साहा यांचे आव्हान होते. मात्र निवडणुकीत माणिक साहा यांनी आशिष साहा यांचा ६,१०४ मतांनी पराभव करत विजय मिळवला. मुख्यमंत्री पदावर टिकून राहण्यासाठी माणिक सहा यांना विजय मिळवणे गरजेचे होते. तर उत्तर प्रदेशमध्ये आझमगड आणि रामपूर लोकसभा जागांवरही पोटनिवडणूक घेण्यात आली. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि सपाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांनी आमदारकी मिळाल्यानंतर खासदारपदाचा राजीनामा दिला होता.

पंजाब, आंध्र प्रदेश, झारखंड पोटनिवडणूक

तर भगवंत मान यांची पंजाबच्या मुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर संगरुर लोकसभेची जागा रिक्त होती. मात्र, पंजाबमध्ये या पोटनिवडणुकीत मतदारामध्ये जास्त उत्साह दिसून आला नाही. तर दिल्लीतील राजेंद्रनगर विधानसभेची पोटनिवडणूकही घेण्यात आली. आपचे राघव चड्ढा राज्यसभेवर गेल्याने तिथले पद रिक्त झाले होते. तर त्रिपुरामध्ये आगरतळा, टाउन बारडोवाली, सुरमा आणि जुबराजनगर या चार विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. तसेच आंध्र प्रदेशातील आत्मकुरू, झारखंडमधील मंदार विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली आहे.

कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान?
उत्तर प्रदेशमधील आझमगड आणि रामपूरमध्ये घेण्यात आलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीतल गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा कमी मतदान झाले. आझमगडमध्ये ४८.५८ टक्के तर रामपूरमध्ये केवळ ३९.०२ टक्के मतदान नोंदवण्यात आले. पंजाबमध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत मतदारांचा उत्साह दिसून आला नाही. तिथे केवळ ३६.४० टक्के मतदान झालं. तर दिल्ली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत केवळ ४३.७५ टक्के मतदान झालं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 3 lok sabha and 7 vidhan sabha bypolls results 2022 dpj

Next Story
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी