आपल्या विविध मागण्यांसाठी देशभरातील ५४ हजार पेट्रोल पंप चालकांनी दि. १३ ऑक्टोबर रोजी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. डिलर मार्जिन आणि कमिशन आणि पुरवठ्यातील तफावत तसेच पेट्रोलियम पदार्थांचा समावेश जीएसटीत करावा या मागणीसाठी पेट्रेाल पंप चालकांनी एकदिवसीय बंद पुकारला आहे.

दि. १२ रोजी मध्यरात्री बारा ते दि. १३ च्या मध्यरात्री १२ पर्यंत देशातील सर्व पेट्रोल पंप बंद राहतील. ऑल इंडिया पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अजय बन्सल यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारने जर आम्हाला योग्य प्रतिसाद दिला नाहीतर आम्ही २७ ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर जाऊ असा इशाराही त्यांनी दिला. तेल कंपन्या व सरकारच्या मनमानीविरोधात आम्ही बंद पुकारल्याचे सांगण्यात येते. देशातील युनायटेड पेट्रोलिय फ्रंटच्या पहिल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे फेडरेशन ऑफ महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितले. हा फ्रंट देशातील तीन राष्ट्रीय पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे संयुक्त व्यासपीठ आहे.