संपूर्ण देश २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा करत असत असताना उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यात एका ७० वर्षीय नराधमाने चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी नराधन आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. चार वर्षांची चिमुकली प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी गावातील पंचायतीमध्ये गेली असता आरोपीने तिचे अपहरण केले आणि निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित चिमुकली सध्या मऊ जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार घेत असून ती मृत्यूशी झुंज देत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलीस निरीक्षक रत्नेश कुमार सिंह यांनी मंगळवारी सांगितले की, आरोपी साधू यादव (७०) याला प्रधानपूर बाजार इथून ताब्यात घेण्यात आले आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (बलात्कार) आणि पोक्सो कायद्याअंतर्गत त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात सादर केल्यानंतर त्याला पोलीस कोठडी देण्यात आली. चिमुकलीची प्रकृती अतिशय नाजूक असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पीडित चिमुकलीच्या आईने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले की, २६ जानेवारी रोजी चिमुकली प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी पंचायत भवनाजवळ गेली होती. राष्ट्रगीतासाठी सर्व उभे राहिलेले असताना ७० वर्षीय आरोपीने मुलीला आमिष दाखवून निर्जन स्थळी नेऊन अत्याचार केले. मुलगी जेव्हा मोठ्याने रडू लागली तेव्हा तिची आई तिला शोधत आली आणि आईला बघून आरोपीने तिथून पळ काढला.

पीडित चिमुकलीला आरोपीच्या तावडीतून सोडविल्यानंतर रासरा गावातील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र त्यांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती केल्यानंतरही तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नव्हती. त्यामुळे तिला खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. आईच्या तक्रारीनंतर साधू यादव यास अटक करण्यात आली आहे. त्यावर २०१६ साली देखील फौजदारी खटले दाखल होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 70 year old man arrested for rape of 4 year old girl during republic day celebrations in up kvg